Homeकला"स्नेहाची रेसिपी" : समारोप

“स्नेहाची रेसिपी” : समारोप

“स्नेहाची रेसिपी” या स्वादिष्ट लेखमालेचा आज समारोप होत आहे. जेव्हा एखादी लेखमाला यशस्वीरित्या पूर्ण होते, त्यावेळेस एका डोळ्यात हसू तर दुसर्‍या डोळ्यात आसू अशी भाववस्था होत असते.
असो. स्नेहाताईनी आपल्याला वर्षभर छान मेजवानी दिली, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. आजचे धावपळीचे जीवन लक्षात घेऊन सर्व रेसिपी झटपट तयार होतील, अशाच त्या देत राहिल्या. शिवाय रसाळ भाषा, आटोपशीर मांडणी, लेखन सातत्य यामुळे ही लेखमाला वैशिष्टय़पूर्ण झाली.
स्नेहाताईनी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

“न्युज स्टोरी टुडे”…. नवोदिताना संधी उपलब्ध करुन देणारे एक उत्तम व्यासपीठ !
सर्वांत आधी न्युज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक श्री. देवेंद्र भुजबळजी आणि सौ.अलकाताई यांनी मला त्यांच्या पोर्टल वर माझ्या रेसिपीज सादर करण्यासाठी खास “स्नेहाची रेसिपी” नावाने एक छान व्यासपीठ उपलब्ध करून देऊन उत्तम संधी दिली. वेळोवेळी मार्गदर्शन सुद्धा केले. माझ्यातील कलेला वाव देऊन प्रोत्साहन दिले आणि रेसिपीज एकापेक्षा एक सुंदर , रंगीत अन् आकर्षक पद्धतीने प्रकाशित केल्या, त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते. ते नेहमीच नवनवीन कलाकारांना रत्नपारखी नजरेने हेरून त्यांना त्यांच्या या व्यासपीठावर योग्य संधी देतात आणि पैलू पाडून घडवतात. त्यामुळेच माझाही उत्साह वाढला, लेखनशैलीत छान बदल घडले ,मी पण खरंच उत्तम लिहू शकते असा आत्मविश्वास मिळाला. तसे आधी माझे लेखन सुरु होतेच, नियमित विविध साप्ताहिके, पाक्षिक, मासिकामधुन, दिवाळी अंकात रेसिपी, लेख, प्रवासवर्णने प्रसिद्ध होतात, पण यंदा आत्मविश्वास वाढल्यामुळे माझ्या हातुन भरपूर, दर्जेदार लेखन झाले, लेखनाला चांगली धार आली आणि या वर्षीच्या ४०+ दिवाळी अंकात माझे विविध साहित्य प्रकाशित झाले याचा आनंद वाटतो. त्याबद्दल मी त्यांची कायम ऋणी राहीन. माझे पती हेमंत मुसरीफ यांच्याही अनेक कविता त्यांनी आजवर या अंकातून प्रसिद्ध केल्या आहेत.

आज श्री रामनवमीच्या गोड रेसिपी सादर करून श्रीरामाचे नाव घेत माझ्यासारख्या अजून नवीन कलाकारांनासुद्धा संधी मिळावी म्हणून माझ्या ‘स्नेहाची रेसिपी’ सदराची गोड सांगता करत आहे. अर्थात आता मी लेख, प्रवासवर्णन, ललित वगैरे रूपातून या सुंदर पोर्टल वर भेटत राहीनच.
आपल्यासारख्या रसिक वाचकांचे मला उदंड प्रेम लाभले. माझ्या लेखनावर असेच प्रेम कायम राहू द्या ही विनंती. मी आपली व मा. भुजबळ दांपत्याची आभारी आहे. धन्यवाद.

“रामनवमी स्पेशल” रामाचा प्रसाद : आनंदोत्सवाला सुरुवात होते तोच हा नवीन वर्षाचा पाहिला महिना.. चैत्रमहिना. गुढीपाडवा झाला की सर्वांना वेध लागतात ते रामनवमीचे. म्हणजेच प्रभू श्रीरामचन्द्रान्च्या जन्माचा दिवस !
आता सर्व मंगलमय होणार याचा सर्वांना विश्वास वाटायला लागतो. मग गोड बनवले जाते. राममंदिरात, घरोघरी रामाचा जन्मोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. यावेळी डिंकवडा, सुंठवडा आणि खास पद्धतीने केलेला ‘रामाचा प्रसाद’ बनवतात आणि सर्वांना मोठ्ठया उत्साहात वाटतात. हा एक पारंपारीक पदार्थ असल्यामुळे कमी,सहज उपलब्ध असलेल्या स्वयंपाकघरातील वस्तु वापरून बनवलेला पण अत्यंत पौष्टीक, बनवायला सोपा आणि खायला सुरेख चवीचा पदार्थ आहे. खमंग भाजलेला हा गोड प्रसाद सर्वांनाच खूप आवडतो. चला आपणही तयारी6 करूया.

साहित्य :
4 वाट्या जाडसर कणिक म्हणजेच गव्हाचे पीठ, अडीच ते पावणे तीन वाट्या बारीक चिरलेला गूळ, दोन वाट्या साजूक तूप, पाव वाटी खिसून खमंग भाजलेले खोबरे, थोडेसे ड्रायफ्रुट्सचे काप, 8..10 वेलदोड्याची पावडर.

कृती :
प्रथम कढई गॅसवर ठेवून त्यात कणिक घालावी मग थोडे थोडे तूप घालत मंद आचेवर ती छान गुलाबी रंग येऊन खमंग वास येईपर्यंत मस्त परतून घ्यावी. ती गरम असतानाच त्यात गुळ घालावा व लगेंच गॅस बंद करावा. वेलची पावडर घालून छान एकजीव करून घ्यावी. कोणाला गुळ आवडत नसेल तर साखर घालावी, पण गुळामुळे चव जास्त खमंग लागते. प्रसाद नुसता तसाच ठेवायचा असेल तर अडीच वाट्या गुळ पुरतो पण जर त्याचे छोटे छोटे लाडू वळायचे असतील तर मात्र पावणे तीन वाट्या गुळ घालावा. म्हणजे लाडू छान वळले जातात. बाकी शिल्लक राहिलेले तूप गरम करुन वरून घालून लाडू वळावेत. लाडू न वळता केलेल्या रामाच्या या प्रसादाला फक्की असेही म्हणतात.
रामनवमीला रामाचा जन्म झाल्यावर सुंठवडा व डिंकवडा सुद्धा वाटतात. सुंठवडा म्हणजे सुंठेची एकदम बारीक पावडर करून त्यात दुप्पट पिठीसाखर घालतात व ती चिमूटभर देतात. डिन्कवडा करताना डिंक थोडा बारीक करून साजूक तुपात तळतात मग त्याची लाही होते, ती एकदक बारीक करून त्यात पिठीसाखर घालतात.
कोणी कोणी तुप गरम करून त्यात खारीक पूड व बदामाची जाडसर पूड व जायफळ – वेलची पूड सुद्धा घालतात. हा डिंक वडा सर्वांना आनंदाने वाटतात.

वैशिष्ट्य :
हा खमंग रामाचा प्रसाद खूप पौष्टिक असतो व हा भाजलेला असल्यामुळे रामनवमीला धान्यफराळ चालतो म्हणजेच भाजलेले सर्व पदार्थ चालतात त्यामुळे हा खाता येतो. डिंकवडा वेगळा न करता रामाच्या प्रसादातच घातला तरी चालतो उलट लाडू वळल्यास जास्त चवदार होतात. फक्त लाडु वळण्यासाठी थोडेसे तुप जास्त लागते. हे भरपूर दिवस टीकतात त्यामुळे आधी करून ठेवले तरी चालतात. प्रवासात, भुकेच्या वेळी हे लाडू छान कामी येतात आणि सर्वांना खूप आवडतात.अलीकडे बरेच लोक अधिक पौष्टीक बनवण्यासाठी त्यात मखाणे छान कुरकुरीत भाजून त्याची पावडर करून ती सुद्धा घालतात.

स्नेहा मुसरीफ

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ, पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments