जागतिक कविता दिनानिमित्त कला संस्कृती संचालनालय, गोवा आणि मनसा क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी येथील संस्कृती भवन सभागृहात नुकतेच कवयित्री संमेलन आयोजित करण्यात आले होते. कवयित्रींच्या मिळालेल्या भरभरून प्रतिसादामुळे हे संमेलन चांगलेच रंगतदार झाले.
कवी आपल्या भावना, कल्पना कवितेतून व्यक्त करत असतात, म्हणूनच विलियम वर्ड्सवर्थ यांनी म्हटले आहे की, कविता म्हणजे भावनांचा भरून वाहणारा प्रवाह असतो. साहित्याचा वारसा पुढे नेण्यासाठी नवीन पिढीला साहित्य क्षेत्राशी जोडून घेण्याची गरज आहे, असे मत गोवा कला संस्कृती संचालनालयाचे संचालक विवेक नाईक यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.

संस्कृती संचालनालयाचे उपसंचालक मिलिंद माटे म्हणाले की, कविता हे माध्यम अनेक साहित्य प्रकारात ताकदवान आहे. कविता कमीत कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करते. यावेळी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून मुंबई येथील ज्येष्ठ कवयित्री हेमांगी नेरकर व प्रा. प्रतिभा सराफ, जयश्री संगीतराव, गोमंतकीय ज्येष्ठ साहित्यिक -समीक्षक डॉ. प्रमदा देसाई व मनसाच्या प्रमुख कालिका बापट उपस्थित होत्या.
यावेळी मनसा साहित्यिक भावनुबंध सन्मान मुंबई येथील ज्येष्ठ कवयित्री जयश्री संगीतराव व सिंगापूर येथील ज्येष्ठ कवयित्री मोहना कारखानीस यांना प्रदान करण्यात आले. त्यांनी साहित्याचा हा सेतू असाच भक्कम राहू दे अशी सदिच्छा व्यक्त केली.

दुसऱ्या सत्रात “कवयित्री आणि कविता” या विषयावर प्रा. प्रतिभा सराफ व डॉ. प्रमदा देसाई यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. यावेळी सन्माननीय पाहुण्या म्हणून लेखिका मनस्विनी प्रभुणे उपस्थित होत्या. परिसंवादात महाराष्ट्रातील कवयित्री मंदा खंडारे, मेघना साने, सरिता पवार, मोहना कारखानीस व गोव्याच्या राधिका नागवेकर यांनी विवेचन केले.
प्रा. राधिका नागवेकर यांनी, चंद्रिका पाडगावकर, हर्षा शेट्ये व नयना आडारकर यांच्या कवितांवर भाष्य केले.
चंद्रिका आपल्या मराठी कोकणी कवितांतून मानवी जीवनातील अनुभवांना भिडतात. हरवलेल्या अस्तित्वाची जाणीव त्या व्यक्त करतात. सुंदर प्रतिमा त्या उभ्या करतात. हर्षा शेट्ये साध्या सोप्या भाषेत हरवलेले अस्तित्व मांडतात व वाचकांना अंतर्मुख करतात. नयना यांच्या कवितांतून स्त्रीविषयक जाणिवा दिसतात. स्त्रीवर लादलेली बंधने यावर त्या भाष्य करतात. या कविता वैविध्यपूर्ण आणि वेगळ्या आहेत.

मंदा खंडारे यांनी, विदर्भातील कवयित्रींच्या कवितांवर भाष्य केले. त्यांनी ज्योती लांजेवार, प्रभा गणोरकर, विजया मारोतकर, आशा पांडे यांच्या कवितांची वैशिष्ट्ये सांगितली.
मेघना साने म्हणाल्या, डॉ. निशिगंधा वाड ही बहुआयामी कवयित्री प्रतिमातूनच बोलते. शांता शेळके, शिरीष पै, प्रतिभा सराफ, मोहना कारखानीस यांच्या कवितांविषयी पण त्या बोलल्या.
मोहना कारखानीस यांनी, सिंगापूरच्या कवयित्री रुचा कुलकर्णी, प्रतिमा जोशी, सोनाली पाटील, नीला बर्वे आदींच्या कवितांविषयी सांगितले. त्या म्हणाल्या, त्यांच्या कविता नेहमीच्या विषयांपेक्षा वेगळ्या आहेत. त्या परदेशात असल्या तरी त्यांच्या कवितात इथलीच मूल्ये आहेत.
सरिता पवार यांनी तळ कोकणातील कवयित्री संध्या तांबे, उषा परब, वैशाली पंडित, शरयू आसोलकर, सुनंदा कांबळे, कल्पना बांदेकर, श्वेतल परब, स्नेहा कदम, रुपाली कदम यांच्या कवितांवर प्रभावी भाष्य केले व त्यातील आशय नेमकेपणाने स्पष्ट करून सांगितले.
मनस्विनी प्रभुणे म्हणाल्या, शब्दांना आकार, उकार देणे हे कवितेचे काम आहे. शिल्पकाराप्रमाणे कविता घडवावी लागते. उपमा, वृत्त, छंद, अलंकार याचा अभ्यास करून आलेली कविता वेगळी असते.
डॉ. प्रमदा देसाई यांनी सांगितले की, कमीत कमी शब्दात अनुभव उत्कटपणे मांडणे म्हणजे कविता. अनुभव समृद्ध तेवढी कविता संपन्न होते.
प्रतिभा सराफ म्हणाल्या, बोली भाषेतून लिहिलं पाहिजे त्यामुळे मराठी भाषा समृद्ध होईल. चांगल्या कविता ऐकून, वाचून जगण्याच्या जाणिवा प्रगल्भ होतात. आज कवितांतून महानगरीय जाणिवा जाणवत आहेत.
त्यानंतर मनसा सन्मान सोहळ्यात प्राचार्य रोशनी शिरवईकर, भारती नाईक, डॉ. स्नेहा महांबरे, डॉ. नीता तोरणे, चित्रा क्षीरसागर, अपूर्वा ग्रामोपाध्ये, अनुया शिरोडकर, सपना सामंत, कविता आमोणकर, आश्विनी जांबावलीकर, बिंदिया वस्त नाईक, श्रध्दा गवंडी, सुगंधा बोरकर, डॉ. रतन नाईक, मिलन शेणवी तळावलीकर व कमलाबाई फडते यांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा चे अध्यक्ष दशरथ परब, उद्योजिका दीपा तारकर व गोवा पर्यटन विकास महामंडळाचे उपव्यवस्थापक दीपक नार्वेकर उपस्थित होते.
दीपा तारकर यांनी सांगितले की, ज्यावेळी अमिताभ बच्चन यांचा पडता काळ होता त्यावेळी त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कवितांनी त्यांना सावरले, आत्मविश्वास दिला, ही कवितेची ताकद आहे. आपले कार्य निष्ठेने करणे याला कर्मयोग म्हणतात व तो आमच्या व्यवसायात राबवतो.
दीपक नार्वेकर म्हणाले, या या महोत्सवातून नवोदितांना ऊर्जा मिळेल.
दुपारच्या सत्रात कवितेचे आनंद गाणे हे सत्र झाले.यात कवयित्री डॉ.पल्लवी परूळेकर बनसोडे, गायिका तथा कवयित्री धनश्री देशपांडे गणात्रा यांचा सहभाग होता.

पुढच्या सत्रात “कवितेचा प्रासाद: बोल कवनांचे” हा मनसा काव्य महोत्सव पार पडला.यात ७५ हून अधिक कवयित्रींनी कविता सादर केल्या. अध्यक्ष जयश्री संगीतराव तर सहअध्यक्ष डॉ. अनिता तिळवे होत्या. सन्माननीय अतिथी म्हणून मेघना कुरुंदवाडकर, डॉ. गीता येर्लेकर, विद्या प्रभू (मुंबई), डॉ. स्वाती मोहरीकर (नागपूर), डॉ. स्वाती जोशी व दीपा ठाणेकर (मुंबई), या कवयित्री उपस्थित होत्या.
निसर्गरम्य गोव्यात रंगलेल्या या कवयित्री संमेलनाच्या गोड आठवणी घेऊन सर्व कवयित्री आनंदाने परतल्या.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
