कोणावाचून कोणाचे काही अडून राहात नाही तरी;
कोण कधी कसा कामी येईल; हे सांगू शकत नाही.
जन्म देऊन लेकराला; जरी माय गेली परलोकाला;
तरी मोठे होतेच ना ते; पारखे होते मात्र तिच्या मायेला !
असण्याची किंमत नसताना कळते,
आयते न मिळता संघर्ष करून मिळाले तरच;
त्याचे मोल कायम राहते.
एखादी गोष्ट वेळेला मिळाली नाही तरी;
घडायचे ते घडत असते,
वेळ वाट बघत नसते;
नसण्याची अन् गमावल्याची तीच किंमत असते !
योग्य ती कदर केली व्यक्ती अन् वस्तू असण्याची,
गमावल्यानंतर वेळ नाही येणार पश्चातापाची !
वाटल्या गोष्टी कितीही फुटकळ तरीही;
समजून उमजून सूक्ष्म विचार केला पाहिजे,
बोध घेतला तर ठीक;
नाहीतर स्वतःला कोसणे अटळ आहे !
झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही,
चुकीची मानसिकता धारण केलेल्या समोर;
कंठशोष करून काहीही उपयोग नाही.
वेड पांघरून पेडगावला जाणाऱ्यांना;
सारासार विचार करायचा नसतो,
त्रयस्थपणे विचार केल्याशिवाय;
दृष्टिकोन बदलत नसतो.
अहंकाराने मनाचा ताबा घेतला की;
भावनांच्या सगळ्या वाटा बंद होतात,
अहम्पणाची भूते मानगुटीवर बसल्यावर
बुद्धी खुंटवून टाकतात !
— रचना : सौ योगिनी पंडित. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
