Homeसाहित्यपुस्तक परिचय

पुस्तक परिचय

“रियाना”

“रियाना” ही कादंबरी वाचण्यासाठी हातात घेतली आणि अक्षरशः देहभान विसरून गेले. एका कार्पोरेट क्षेत्रात नोकरी करणा-या तरुणीने ही कादंबरी लिहिली आहे हे पुन्हा एक धक्का यंत्रातील नवल. लेखिका प्राची राजे हिने कादंबरीच्या सुरवातीलाच एक गूढ कथा उतारा प्रस्तावना स्वरुपात किंवा कादंबरीची ओळख म्हणून टाकला आहे. सवयीप्रमाणे मी प्रस्तावना, मनोगत आणि मधूराच्या मानसिकतेवर लिहिलेला गूढ उतारा वाचला आणि तिथेच कहानीमे दम है, अस वाटलं यात आश्चर्य ते काय ?

रियाना या कादंबरीची एकूणच मांडणी अफलातून आहे. आकर्षक आहे, ओढ लावणारी आहे. कादंबरीची भाषा, कथानक, कथेचा प्रवाह,कथा सांगणारी मांडणी पध्दत खूप सुरेख आहे. कादंबरी वाचताना लेखिका नवीन आहे, पहिलीच कादंबरी लिहिली आहे अशा कोणत्याही विचाराला तिथे थारा मिळत नाही इतक्या सरावलेल्या लेखिकेप्रमाणे प्राचीने संपूर्ण कादंबरीचा डोल, शिड तोललेल आहे. वाचकाला खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य तिच्या लेखनात आहे.

एका अत्यंत सोज्वळ कुटुंब, कष्टाला महत्व देऊन स्वकष्टाने, ताठ मानेने उभे असलेले इनामदारांचे कुटुंब. प्रतिभा आणि जयवंतराव इनामदार. जयवंतरावानी छोटासा व्यवसाय सुरु केला तर साथ देत प्रतिभाने डबे पोहोचवत, हाॅटेल व्यवसायात पाय रोवले. दोन साजिरी गोजिरी मुलं अनंत आणि प्रदिप गुणी निघतात. पण प्रतिभाला दोन मुलांनंतर तब्बल बारा पंधरा वर्षानी पुन्हा आई होण्याचा सुगावा लागतो. दुर्दैवाने बाळाला जन्म देऊन ती जग सोडून जाते. एकाकी पडलेले आबासाहेब गावाकडून गरीब घरातील परित्यक्ता पद्माताईस प्रतिभा निवास मधे बाळ सांभाळायला आणतात. सख्ख्या बहिणी प्रमाणे तिला घरची सगळी जबाबदारी देतात. पुढे आलेल्या सूनाही आत्यांना सासूचाच दर्जा देतात. सगळच आलबेल असतानाही काही घटना विचित्र घडत जातात आणि प्रतिभा निवास ढवळून काढतात.

अनंत आणि वृषाली यांना दोन मुले तर प्रदीप आणि मधुराला दोन मुली असतात. पण वृषालीला मुलींची हौस असते. स्वत:ची एक मुलगी असावी म्हणून ती प्रयत्न करते पण दैवदुर्विलास की तिचं नशिब तिला मुकी, बहिरी, मंद (चॅलेजड) मुलगी होते. थोडी मंद, बोलता, ऐकता न येणारी. वृषाली सोशल वर्कर असते. ती या मुलीला आपलसं करत नाही आणि पद्मा आत्याकडे रियानाला सोपवून स्वतः समाजकार्यात गुंतवून घेते. त्या मुलीवर रियानावर कोणते प्रसंग ओढवतात याच वर्णन लेखिका प्राची राजे हिने अतिशय समर्पक आणि भाषेचा तोल सांभाळत केलय.

लेखिका प्राची राजे

काही प्रसंग, घटना वाचताना लेखिकेने अतिशय सभ्य भाषेचा वापर करुनही प्रसंगाचं गांभीर्य राखले आणि वाचकांपर्यंत पोहोचवले आहे. गोरी, गोबरी गुलाबी रियाना आठ वर्षांचा वाढदिवस मजेत साजरा करते पण नंतर तिच्या यातना कळस गाठते.
तिला तुटक बोलता येते पण ऐकणारा कुणी नसतं. आजोबा खूप प्रेम करतात पण ती विद्ध पक्षिणीसारखी बंदिस्त खोलीत भितीने, यातनेने तळमळत असते. कोणत्या यातना ती भोगते हे कळण्यासाठी तुम्ही कादंबरी वाचलीच पाहिजे अशी ही उत्कंठावर्धक कादंबरी आहे.

रियानाच्या मृत्यूचे गूढ, मधूरा रियानाच्या काकीला होणारे भास, भावा भावांचा एकमेकांबद्दल झालेला गैरसमज, जोती या रियानाच्या केअरटेकरने सांगितलेल सत्य, पद्मा ताईने वासुदेव बरोबर रचलेले कारस्थान आणि आबासाहेबांचा गूढ मृत्यू या सगळ्या घटनांची साखळी कथेचा ओघ,प्रवाह अबाधित ठेवत कथा वेगाने पुढे सरकते आणि कथेची पकड अधिकच घट्ट करते. उत्सुकता, रहस्यमयता, हा कादंबरीच एक व्यवच्छेदक लक्षणं आहे.

रियानाने सहन केलेल्या यातना वाचताना अक्षरशः मन पिळवटून जाते. पण ती स्वतः पेक्षा शालूला वाचवण्यासाठी धडपडते हे वाचतानाही एका शुध्द आत्म्याला दंडवत घालावा वाटतो. तिच्या अनंत यातनांचा कर्ता तिचा सख्खा काका आहे हे पचायला जड जातंय पण सत्य कटू असतं याची प्रचिती येते.

या संपूर्ण कादंबरीत आई किती महत्त्वाची असते, नाती योग्य ठिकाणी योग्य वेळी पारखी असली तर कशाप्रकारे वेगळ्या वळणावर गोष्टी जातात हे लेखिकेने अतिशय समर्थपणे लिहिले आहे.मग ते नाते पतिपत्नीच असो वा आईमुलाच असो, जीवनाची दिशा योग्य ठरवण्यासाठी नाती महत्त्वाचा रोल बजावतात.

शाॅपिझम ने प्रकाशित केलेली ही कादंबरी वाचनीय आहे, एका कार्पोरेट क्षेत्रातील युवतीने पहिल्यांदा लिहिली कादंबरी वाचकाला विचार करायला भाग पाडते. कादंबरीतील संदर्भ, घटना, घटनेची लिंक, कथेचा जिवंतपणा, प्रवाह, कुठंही हरवलेला नाही.कथेतील गाभा, गूढ आपण वाचायलाच हवा म्हणून शेवट सांगत नाही.
कादंबरी सर्वांनी अवश्य वाचावी अशी आहे.

प्रा.मानसी जोशी.

— परीक्षण : प्रा.मानसी जोशी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments