अत्यंत प्रतिकूल हवामानातील, समुद्र सपाटीपासून ५३६४ मीटर उंचीवर पोहचत कोल्हापूरच्या ‘करवीर हायकर्स’ च्या सातजणांनी ‘एव्हरेस्ट बेस कँप मोहीम शनिवारी यशस्वी केली.
या मोहिमेत रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, त्यांच्या पत्नी तथा सहप्राध्यापिका डाॕ सुप्रिया सातपुते, मुरुम (धाराशिव) चे उद्योजक आप्पासाहेब मुंडासे, कोल्हापूरचे उद्योजक विशाल मेहता, समाज माध्यम प्रभावक पती पत्नी नुपूर आणि अक्षय मठकर सहभागी झाले होते.
ही मोहीम वयाच्या २१ व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणाऱ्या आणि जगातील मृत्यूचा पर्वत अशी ओळख असणाऱ्या ‘अन्नपूर्णा’ पर्वत सर करणाऱ्या जगातील सर्वात तरुण ठरलेल्या करवीर हायकर्सच्या कस्तुरी सावेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

गिर्यारोहकांचे हे पथक १५ मे रोजी काठमांडू येथे दाखल झाले. त्यानंतर काठमांडू ते जगातील सर्वात धोकादायक ओळख असणाऱ्या लुकला विमान तळावरून छोट्या विमान प्रवासानंतर प्रत्यक्षात एव्हरेस्ट बेस कँपकडे वाटचाल सुरु झाली. लुकला ते फाकडींग ते नामचे बाजार ते तेंगबोचे ते दिंगबोचे ते लोबुचे ते गोरकक्षेप ते एव्हरेस्ट बेस कँप असा हा ‘ट्रेक शनिवारी पूर्ण झाला. या पथकाने तिथे राष्ट्र ध्वज फडकवून आणि संविधानाची उद्देशिका प्रदर्शित करुन या यशस्वी मोहिमेची सांगता केली.
रात्री उणे १५ अंश सेल्सिअस तर दिवसा ४ ते ६ अंश सेल्सिअस तपमान, लोबूचे ते ‘इबीसी’ अतिशय जीवघेणा प्रवास ठरला. प्रतिकूल, खडतर वातावरण, दुर्गम रस्ता, हाडे गोठवणारे थंड वारे मानसिक आणि शारीरिक क्षमतेची कसोटी जागोजागी घेत होते. वाटेत येणाऱ्या अशा आव्हानांना शरीर आणि मन सक्षमपणाने सामोरे जावू शकते, हे या ट्रेकवरुन या पथकाने अनुभवले.

नेपाळमधील ‘पीक १५ अॕडव्हेंचर’ चे शेखर तमांग, योगेंद्र तमांग व प्रशांत तमांग यांनी या मोहिमेत मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावली.
या नेत्रदीपक कामगिरीबद्दल या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. न्युज स्टोरी टुडे परिवारातर्फे देखील या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
