सुर्य नारायण कोपला
काय सांगावेच त्याले
झय कितीक सोसावी
कायी समजेना मले !१!
माहय् जीव होते लायीलायी
वैयशाखी वनव्याने
जसा विस्तव पेटला
रानीवनी चहू बाजुने !२!
मुक्या पशु पक्षांना
चारा पाणी नसे जंगलात
रानीवनी फिरतसे
चारा पाण्याच्या शोधात !३!
नाले ओढे सुकले
कसे वाटते भकास
पाण्या वाचून तयांच्या
तोंडातून येई फेस !४!
रोहिणीची सुरूवात
झाली कोरडी कोरडी
शेतकऱ्याईले वाटे
वाट पाहानारे थोडी !५!
मिरूगही अर्धा गेला
नसे टिपूस पावसाचा
डोये ढगाकडे सगयांचे
देवा करू नकोरे गोचा !६!
पेरणी पाण्याचे हे दिसं
सोन्यासारखे आम्हाले
आता नकोरे अंत पाहू
बाबा साकडे घालतो तुले !७!
मनी धाकधूक वाटे
पुढे होईल कसे काय?
मेघराजालेच कायजी
हुंदके देई धरती माय !८!

— रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. 9869484800.
