दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. “निरोगी वार्धक्यासाठी योग” ही यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना ! ज्येष्ठांना विचार करण्यास प्रवृत्त करणारी आहे. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीत जितका गर्भितार्थ दडलेला आहे तितकाच निरोगी वार्धक्यासाठी योग या संकल्पनेत आहे.
योग म्हणजे जोडणे ! तन, मन आणि आत्मा यांना जोडण्यासाठी योग प्राणायाम करायचा असतो. पण तो केव्हापासून करायचा या विषयी आजही आपण गंभीर नाही आहोत. वयानुरुप शरीर कुरकुर करु लागले की, आपण थोडं थोडं हातपाय हलवायला सुरुवात करतो. पण याचा म्हणावा असा परिणाम होत नाही.

सरकार असो की, खाजगी आस्थापना, एखादा कर्मचारी सेवेत रुजू झाला की, त्याच्या निवृत्तीच्या काळात त्याला सन्मानाने जगता यावे यासाठी भविष्य निर्वाह निधी, आयुर्विमा या सारख्या योजनेतून त्याच्या चांगल्या भविष्याची तरतूद करीत असते. त्यालाच आपण गुंतवणूक म्हणतो. मुलांच्या शिक्षणासाठी आज केला जाणारा खर्च ही उद्याची गुंतवणूक असते. तो खर्च नसतो. तसेच आपल्या आरोग्याचे आहे. मी आजारी पडत नाही किंवा मला काही होत नाही म्हणजे मी निरोगी, निरामय आहे असे नाही.
आपले जीवन स्वास्थ्यपूर्ण असावे लागते. स्वास्थ्य कशाला म्हणावे ? शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या संतुलित, सक्रीय, संयमी, निरामय, निरोगी असणे म्हणजे उत्तम स्वास्थ्य होय. अशी व्यक्ती आनंदी, मनाने कणखर आणि कामसू असते. आपल्या जगण्यात समत्व साधता आलं पाहिजे. शरीर बदलत असते. क्षमता बदलतात. भूमिका बदलत असते. नाती, जबाबदाऱ्या व परिस्थिती ही बदलत असते. या बदलांना प्रत्येक टप्प्यावर सामोरे जावे लागते, ते ही न कुरकुरता, सजगपणे, समतोल साधावा लागतो. त्यासाठी आपलं जगणं ही निरोगी असावं लागतं.

‘जीवन ही एक कला आहे’ हे संतांनी सांगितलेच आहे. ही कला आत्मसात करण्यासाठी तरुण वयापासूनच गुंतवणूक करावी लागते. निरोगी स्वास्थ्यासाठी केवळ योगासने करणे नव्हे तर आपला आहार विहार, पुरेशी विश्रांती,विचाराची पध्दती, शिस्त, संयम आणि संतुलन साधता आले पाहिजे. संतुलित, पौष्टिक आहारासोबत नियमित योगासने, ध्यानधारणा केल्यास शरीराची लवचिकता, स्नायूंची ताकत आणि संतुलन टिकून राहण्यास मदत होते.
वाढत्या वयामुळे शारीरिक हालचालींवर मर्यादा पडतात. योगासनामुळे हे धोके कमी होण्यास मदत होते. प्राणायामामुळे श्वसन क्षमता सुदृढ बनते. हार्मोन्सचे संतुलन, चयापचायात सुधारणा झाल्याने रक्तदाब, मधुमेह सारखे आजाराचे तीव्र धोके कमी होण्यास मदत होते.

एकदा आर्ट ऑफ लिव्हिंगचे आदरणीय श्री श्री रविशंकरजी यांनी प्रश्न केला होता –
Who is our life partner ?
त्यांचं उत्तर, आपलं शरीर …!!
आपले शरीर निरोगी राहण्याकरता काही गोष्टी आपण ठरवून करायला हव्यात.
प्राणायाम …… फुफ्फुसासाठी
ध्यानधारणा …. मनासाठी
योगासने ……. शरीरासाठी
चालणं ……… हृदयासाठी
चांगलं अन्न …… आतड्यासाठी
चांगले विचार…..आत्म्यासाठी
चांगलं कर्म …… योग,
आपण कशासाठी जगत असतो आणि कसं जगावं हेही शिकवत असतो. हे जगणं कशासाठी ? श्रीमंत होण्यासाठी का ? नाही.
फक्त आनंद ! आनंद ! आनंदासाठी !! आपण रोजच भोजनाचा आनंद घेत असतो.
पण ते भोजन प्रसाद म्हणून ग्रहण करायचे असते. नाहीतर जेवण म्हणून औषधं घ्यावी लागतील. वेगात चालायचं असेल तर एकटंच चालायचं. पण दूरवर चालत जायचं असेल तर एकत्र चालावं, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक समस्या वाढत आहेत. मी आणि माझं यात समाज गुरफटतो आहे. जेष्ठ नागरिक कुटुंबापासून तुटत आहेत. वयोमानानुसार एकाकी, चिंता, नैराश्य, चिडचिडेपणा किंवा न्यूनगंड निर्माण होतो आहे.अशावेळी आधीपासूनच जगण्याला योगाची साथ असेल तर शरीराबरोबर मनही लवचिक राहण्यास मदत होते. योग स्वीकार, सजगता समत्व अन् समतोल शिकवतो. अल्झायमर, स्मृतीभ्रंश सारखे आजार त्यामुळे दूर राहतात.
आपल्या सर्वांसाठी सर्वात चांगले सहा डाॅक्टर आहेत.
1 ) सूर्यप्रकाश
2 ) विश्रांती
3 ) व्यायाम
4 ) योग्य आहार
5 ) आत्मविश्वास
6 ) मित्र…
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यांना सांभाळले पाहिजे. तरच आपण आरोग्यदायी जीवन जगू शकतो. या सहाही डाॅक्टरांची अनुभूती आपणास पदोपदी येत असते.फक्त दृष्टी आणि कान हवेत. जेव्हा आपण चंद्राची शीतलता अनुभवतो तेव्हा आपण देवाचं सौंदर्य पाहात असतो. जेव्हा आपण सूर्य पाहतो त्यावेळी देवाचे सामर्थ्य पाहात असतो. जेव्हा आपण आरशात पाहातो त्यावेळी त्या निर्मिकाची सर्वोत्कृष्ट कलाकृती पाहात असतो.म्हणून स्वतः वर विश्वास ठेवायचा.सर्वात महत्वाचे मैत्री… मैत्री, मित्रता एक हळुवार स्पंदन आहे.
ते आपल्या जगण्याला चैतन्य अन् संजीवन
देत असते.
“आम्ही मैत्रिणी” ग्रुप हीच संजीवनी अन् ऊर्जा घेत जगणं आनंदी, कृतार्थ, कृतज्ञ करीत उर्वरित आयुष्य जगायचा प्रयत्न करीत आहे.
त्यामुळेच या ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. पहाटे छानशी पावसाची सर येऊन गेल्याने वातावरण आल्हाददायी अन् प्रसन्न होते. अशा वातावरणात साजरा केलेला हा योगदिन कायमचा लक्षात राहील.
चला तर, नियमित योग करू या आणि आनंदी जीवन जगू या !

— लेखन : प्रभा वाडकर, लातूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
