“युगे अठ्ठावीस.”
वारी हा शब्द आषाढी आणि कार्तिकी या दोन मुहूर्तांशी जरी जोडल्या गेलेला असला, तरी मूळ वारीचा अर्थ ‘येरझारा’ असा होतो. आज खिडकीतून बाहेर बघताना मला वारीचे दृश्य दिसत आहे आणि सहज काही घटना, काही प्रसंग त्यानिमित्ताने आठवतात.
पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला नियमितपणे जाणे आणि ते देखील ठराविक मुहूर्त बघून म्हणजे, ‘आषाढी – कार्तिकी’ असे खास दिवस. याला वारी म्हणतात. परंतु मी वर उल्लेख केल्याप्रमाणे वारीचा अर्थ येरझारा असाही होतो. ठराविक मार्गाने ठराविक कालावधीत जेव्हा आपण येणे जाणे करतो तेव्हा त्याला वारी असे म्हणतात. देवीच्या एका आरतीत देखील “वारी वारी जन्ममरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी” ही ओळ याच जन्ममृत्यूच्या वारीबद्दल लिहिल्या गेली असावी.
पंढरीची वारी मी अजून तरी केलेली नाही. परंतु ज्याप्रमाणे प्रत्येक विठ्ठल भक्ताला एकदा तरी वारी करावीशी वाटते तशीच माझी देखील इच्छा आहे आणि म्हणूनच ही पंढरीची वारी जेव्हा घडेल तेव्हा घडेल, पण त्याआधी छोट्या वाऱ्या करून निदान वारीचा अनुभव घेता यावा म्हणून मी प्रयत्न करत होतो. अशातच माझ्या परिचयातील दोन जणांची भेट झाली. दोघेही माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांच्याशी बोलताना तिसऱ्या श्रावण सोमवारी त्रंबकेश्वर नगरीत ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा हा विषय निघाला.
ही देखील एक छोटीशी वारीच होती. प्रत्येक श्रावण सोमवारी शंकराचा एखाद्या ठराविक स्थानावर वास असतो असे त्यांनी मला सांगितले. त्यातील तिसरा श्रावण सोमवार हा ब्रह्मगिरी पर्वतावर असतो. या दिवशी सर्व शिवभक्त एकत्र येतात आणि मध्यरात्रीपासूनच या वारीला सुरुवात होते. ही ब्रह्मगिरीची संपूर्ण प्रदक्षिणा करायला सहा ते आठ तास लागतात. या वारीला जाण्याचा बेत त्यांनी आखला आणि एक अनुभव म्हणून मी त्यात सामील व्हायचे ठरवले.
सकाळी चार वाजता गंगेत स्नान करून या प्रदक्षिणेला आम्ही सुरुवात केली. यात सामील असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर वेगळे भाव मी अनुभवत होतो. प्रत्येकाला काही ना काही हवे होते. देवाला नेमके काय मागायचे हे मला आजपर्यंत कधीच समजले नाही. प्रदक्षिणा सुरू केल्यावर पंढरीच्या वारीचा विषय निघाला. यातील एकाने त्याला पंढरीची वारी करण्याची तीव्र इच्छा असल्याचे बोलून दाखवले. मात्र प्रत्येक वर्षी काही ना काही निमित्ताने तो वारीला जाऊ शकला नाही. ही व्यक्ती अकोला येथे राहते. अकोल्यापासून अगदी जवळच संत श्री गजानन महाराज यांचे मंदिर आहे. गजानन महाराज संस्थानातून दरवर्षी आषाढीला गजानन महाराजांची पालखी पंढरपुरास निघते. कितीतरी वेळा या पालखीसोबत पंढरपूरला जाण्याचा बेत त्याने आखला होता. पण काही ना काही विघ्न आले आणि त्याचा बेत तडीस गेलाच नाही. एक दोनदा तर अगदी शेगाव पर्यंत जाऊन केवळ पालखीचे दर्शन घेऊन त्याला परत यावे लागले.

जोपर्यंत विठ्ठल तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत तुम्हाला वारी घडत नाही. असे कोणीतरी त्याला सांगितले, त्यानंतर त्याने वारीचा विषय मनातून काढून टाकला आता जेव्हा विठ्ठल त्याला बोलवेल तेव्हाच तो वारी करणार होता. माझे दुसरे परिचित हे सर्व शांतपणे ऐकत होते. त्या दुसऱ्या परिचितांना लग्नानंतर बरीच वर्ष मूलबाळ नव्हते. गजानन महाराजांची पालखी जेव्हा आषाढीला निघाली तेव्हा त्यांनी सपत्नीक जाऊन पालखीचे दर्शन घेतले आणि विठ्ठलाला साकडे घातले, जर त्यांना मुल झाले तर वारी नक्की करू असे त्यांनी कबूल केले होते. योगायोगाने पुढील एका वर्षात त्यांच्या पत्नीला दिवस गेले आणि त्यांना पुत्र प्राप्ती झाली. मात्र वारीचा योग अजूनही आला नव्हता, आता जेव्हा हा विषय निघाला तेव्हा त्यामुळेच ते शांत झाले.
प्रदक्षिणेबरोबर हा विषय पुढे वाढत गेला. आज त्यांना मुलगा होऊन जवळपास आठ ते दहा वर्षे झाली होती. मधल्या काळात त्यांनी एक दोनदा प्रयत्न केले होते परंतु वारी शक्य झाली नाही. हळूहळू तो विषय विस्मृतीत गेला आणि गेल्या वर्षी त्यांच्या मुलाला एक भयंकर आजार असल्याचे समोर आले. मलाही ही माहिती नवीनच होती. त्या मुलाला रक्ताशी संबंधित आजार होता. ज्यामुळे त्याच्या शरीरात नवे रक्त तयार होत नव्हते, त्यासाठी गेले वर्षभर विविध उपचार सुरू होते. ही ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा हा देखील त्याचाच एक भाग होता.
मुंबई, नागपूर, आणि गेल्या महिन्यात अगदी चेन्नईच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पर्यंत त्यांनी सर्व प्रयत्न केले. चेन्नई येथील हॉस्पिटलमध्ये पंधरा दिवस विविध टेस्ट केल्या गेल्या आणि तिथल्या डॉक्टरांनी आता काहीही शक्य नाही असे निर्वाणीचे सांगितले. मुलाला घरीच राहू द्या, जे काही त्याचे शेवटचे दिवस आहेत ते त्याला आप्त स्वकियांबरोबर आनंदाने घालवू द्या असा सल्ला त्यांनी दिला. जेव्हा विज्ञान थकते तेव्हा अध्यात्म सुरू होते आणि त्याप्रमाणे या पती-पत्नीने जमेल तसे, जमेल तिथे देवदर्शन सुरू केले. दरम्यान ब्रह्मगिरीच्या वारीचा विषय निघाला आणि हे दोघे या ठिकाणी नाशिकला आले. माझ्याशी संपर्क झाला आणि मी आता त्यांच्याबरोबर या ठिकाणी जोडल्या गेलो होतो.
केवळ बोललेला नवस पूर्ण केला नाही म्हणून ईश्वर अशी शिक्षा देईल का ? यावर आम्हा तिघांचेही ‘नाही’ हेच मत पडले. प्रारब्ध आणि भोग हे कोणालाही चुकत नाही, फक्त हे नेमके कुणाचे हे आपल्याला न सुटणारे कोडे असते ! आज त्या मुलाला काय वेदना होत असतील या आम्ही समजू शकत नाही. पण त्याचबरोबर त्या मुलाचे तीळ तीळ मरणे बघताना त्याच्या आई-वडिलांना होणारे यातना यादेखील कोणी समजू शकत नाही. म्हणजे नेमके हे भोग कोणाचे हा प्रश्न पुन्हा अनुतरितच राहतो.
सुखाच्या, दुःखाच्या, आनंदाच्या, वेदनांच्या, अशा कितीतरी गप्पा, कितीतरी विषय आम्हा तिघांचे या प्रदक्षिणेत झाले. पण माझ्या मनात खोलवर रुतून बसला तो त्या मुलाचा विषय. आज एक असा बाप माझ्यासोबत होता ज्याला त्याचा मुलगा मरणार आहे हे माहीत होते. दररोज त्या मुलाचे तीळ तीळ मरण तो बघत होता. अध्यात्माच्या नावाखाली वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनाला जाताना तो त्या सत्यापासून पळत होता आणि हे गप्पांच्या ओघात त्याने कबूल देखील केले. त्या मुलाच्या समोर उभे राहण्याची आता त्याची हिंमत नाहीये, जे काही घडणार आहे माहित असताना ते त्याला स्वीकारता येत नाहीये. या वारीच्या निमित्ताने मुलाला सामोरे जाण्याचे बळ, ताकद मला दे ही एवढीच प्रार्थना असतो ईश्वरा पाशी करत होता.
प्रदक्षिणा पूर्ण झाली. पुन्हा गंगेचे स्नान करून ही प्रदक्षिणा पूर्ण करायची होती. पण मी गंगा स्नानाला गेलोच नाही. माझे ते दोन परिचित गंगास्नानाला गेले. पण मी मात्र गंगास्नान केले नाही. मला ही प्रदक्षिणा पूर्ण होऊच द्यायची नव्हती. मी सहज अनुभव घ्यायला या वारीला आलो होतो आणि ईश्वरा जवळ मला काहीच मागायचे नव्हते. ना कुठल्या इच्छा होत्या, ना कुठले बळ होते. मग ही वारी, ही प्रदक्षिणा अशीच असू द्यावी ही पूर्ण न करता अशीच खंडित ठेवावी असे मला वाटले. पुन्हा कधीतरी कुठल्याशा निमित्ताने ही वारी आपण पूर्ण करू असे मी मनातल्या मनात ठरवले.

तो दिवस सरला. आम्ही परत आमच्या रुटीनमध्ये जॉईन झालो. काही दिवस ही प्रदक्षिणा, त्यादरम्यान झालेल्या गप्पा, निघालेले विषय हे सर्व डोक्यात होते. पण नंतर रुटीनमध्ये रोजच्या कामांमध्ये या गोष्टी थोड्या विस्मृतीत गेल्या. तरी देखील कधी अचानक त्या मुलाचा, त्याच्या वडिलांचा, त्याच्या आईचा असे विचार मनात यायचे. मात्र कधी फोन करून याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्याची किंवा पुढे काय घडले हे जाणून घेण्याची हिंमत झाली नाही. आपण कितीही निर्मळ मनाने या गोष्टी विचारण्याचा प्रयत्न केला तरी समोरचा नेमका याला कसे घेईल हे आपण सांगू शकत नाही. आपल्या सहज चौकशीने उगाच कोणी दुखावल्या जाऊ नये असा विचार करून मी कधीही त्या परिचिताला संपर्क करून पुढे काय झाले हे विचारले नाही.
आज शेगावहून आषाढी करिता गजानन महाराजांची पालखी पंढरपुरासाठी निघाली आणि मला त्या दुसऱ्या परिचिताने फोन करून तू वारीला येऊ शकतो का असे विचारले. मी त्याला कोण कोण आहे वारीला असा प्रति प्रश्न केला. त्यावर ब्रह्मगिरीचेच आपण तिघे आणि त्या दुसऱ्याची पत्नी असे त्याने उत्तर दिले. उत्सुकता म्हणून मी यालाच त्यांच्या मुलाचे पुढे काय झाले असा प्रश्न केला. त्यावर, तो तर सहा महिन्यापूर्वीच वारला असे याने उत्तर दिले. मी माझे जमणार नाही असे त्याला उत्तर दिले. मुळात कारण म्हणजे नुकतंच मूल गमावलेल्या त्या जोडप्या पुढे जाण्याची आता माझी हिंमत नव्हती. मात्र मनात एक प्रश्न निर्माण झाला होता, ज्या मुलाच्या जन्मासाठी वारीचा नवस त्यांनी केला होता त्या मुलाच्या मृत्यूनंतर हे वारी का करत आहेत ?
काही दिवस गेले आणि मला काही कामानिमित्ताने अकोल्याला जावे लागले. मी मुद्दाम माझ्या त्या परिचितांकडे गेलो. हॉलमध्येच समोरील भिंतीवर त्या मुलाचा फोटो लावलेला होता. माझा तो मित्र आला. सहज इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मग न राहून मी त्याला विचारले मुलाच्या मृत्यू पश्चात तू वारीला का गेलास ? यावर त्याने जे उत्तर दिले त्याने मी सुन्न झालो….

जवळपास सर्वस्व गमावलेल्या या व्यक्तीने केलेल्या विचार मला अस्वस्थ करून गेले…. तो म्हणाला, ब्रह्मगिरीवरून परत आल्यावर त्याच्या मुलाची तब्येत अजूनच खालवली त्याला प्रचंड त्रास होऊ लागला आणि त्याचा तो त्रास बघवत नव्हता. आणि अशा वेळेला या पती-पत्नीने विठ्ठलाला एक साकडे घातले. “जे काही आमचे भोग असतील ते आम्ही नक्की भोगू. परंतु आम्ही वारीला येऊ या एका नवसापोटी तू हा मुलगा जो आमच्या पदरात घातलाय त्याला आता परत घे. त्याचा त्रास थांबव. त्याला मुक्ती दे आणि जर ही मुक्ती तू त्याला दिलीस तर आम्ही नक्की वारीला येऊ.” यानंतर आठच दिवसात तो मुलगा वारला आणि त्याच वेळेला या पती-पत्नीने ठरवले की निदान या मुलाच्या मोक्षाकरता जो नवस आपण बोललो आहोत तो आपण पूर्ण करूया. त्यामुळे या आषाढी वारीला हातातील सर्व कामे बाजूला सारून दोघे पती-पत्नी हा त्यांचा दुसरा नवस पूर्ण करायला वारीला गेले. विठ्ठल चरणी आपल्या त्या मुलाला मुक्ती दे असे मागणे त्यांनी मागितले. “त्याने जे दिले, ते त्याने परत घेतले आणि त्याकरताच आम्ही वारी केली.” त्याचे हे शब्द आताही माझ्या कानात घुमत आहे. घरी परत आल्यावर अचानक मनात विचार आला येत्या श्रावण महिन्यात तिसऱ्या श्रावण सोमवारी गंगा स्नान करून ती अर्धवट सोडलेली प्रदक्षिणा मी आता पूर्ण करणार आहे.
क्रमशः

— लेखन : किरण आचार्य. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
