“प्रस्तावना”
नमस्कार मंडळी.
आज पासून आपण दर मंगळवारी सृष्टी गुजराथी लिखित “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” ही लेखमाला सुरू करीत आहोत. मूळ ठाणेकर असलेल्या सृष्टी गुजराथी यांनी बीएस्सी आणि एम ए (Clinical Psychology) या पदव्या प्रथम श्रेणीत संपादन केल्या आहेत. त्यांना बासरी वादन आणि काव्य लेखनाची आवड असून त्यांचे ‘तुझ्याचसाठी’ हा चारोळीसंग्रह आणि ‘बाहुली आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, अशी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक काव्यसंमेलनांत त्यांनी कविता सादर केल्या आहेत. विविध शाळा- महाविद्यालयांतून त्यांना मार्गदर्शनपर व्याख्यानांसाठी निमंत्रित केल्या जाते. त्या विविध वृत्तपत्रांसाठी लेखन करीत असतात. सह्याद्री आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘हा खेळ शब्दांचा’; स्टार माझा वरील ‘गणेश प्रश्नमंजुषा’; साम वाहिनीवरील ‘शतदीप – शताब्दी दिवाळी अंकांची’ इत्यादी कार्यक्रमांसाठी, काही माहितीपटांसाठी, काही जाहिरातींसाठी त्यांनी संहिता लेखन केले आहे.
सृष्टी गुजराथी यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात स्वागत आहे. आजच्या पहिल्या भागात आपण वाचू या, *या लेखमालाची प्रस्तावना*.
— संपादन
विठ्ठलपंत कुलकर्ण्यांच्या चारही पोरांना समाजाने छळलं. संन्याशाची पोरं म्हणून हिणवलं. समाजाच्या दडपणामुळे, पोरांच्या कल्याणासाठी मातापित्यांनी जलसमाधी घेतली, तरी कुणाचे मन द्रवलं नाही. स्वतःला ब्रह्मज्ञानी आणि भक्त शिरोमणी म्हणवणाऱ्यांनाही या कोवळ्या पोरांतले ब्रह्मतत्व दिसलं नाही, तिथे सामान्यांची काय कथा ?
एका विशिष्ट चाकोरीत चालणाऱ्या समाजाला तसंही कर्म आणि धर्माचं मर्म कळत नसते. प्रचलित चौकटीबाहेर काहीही घडलं की विरोध होणारच. मग कर्त्याचा उद्देश – भाव किती का शुद्ध असेना, त्याला अग्निपरीक्षा द्यावीच लागणार. ज्ञानदेवादी भावंडानाही अशी परीक्षा द्यावीच लागली. या तापातून तावून सुलाखून पुढे त्यांचे चरित्र सुवर्णाहून अधिक झळाळून उठलं हे खरंच, पण हा प्रवास त्यांच्यासाठीही कधीच सोपा नव्हता.

ज्ञानदेवांसारखा बालयोगी, पण समाजाच्या सततच्या दूषणांनी एकदा त्यांचंही मन उद्विग्न झाले. गावातील काही कर्मठ लोकांनी त्या दिवशी ज्ञानेश्वरांना भिक्षा मिळूच दिली नाही, उलट अपमानित करून हाकलून दिले. कितीही जाणते असले तरी शेवटी बालरूपच ते. लोकांच्या अशा निर्दयी व्यवहाराने दुखावलेला ज्ञाना तडक घरी आला. त्याने झोपडीचे आणि मनाचंही दार लावून घेतले. या समाजापासून, इथल्या व्यवहारांपासून स्वतःला विलग करण्याच्या निश्चयाने एकांतवासी झाला.
निवृत्ती – सोपानाने हाक दिली, पण काहीच प्रतिसाद आला नाही. मौन गहिरे होऊ लागले तेव्हा पाठची बहीण आई झाली. अवघ्या १० वर्षांच्या मुक्ताईने दाराबाहेरूनच संवाद साधला. समजुतीच्या चार गोष्टी सांगत दार – ताटी उघडण्याची विनवणी केली, तेच हे ताटीचे अभंग …
एक ज्ञाना – एक मुक्ता आणि त्यांचा हा संवाद असा एका प्रसंगापुरता कसा सीमित असेल? संतांची शिकवण उद्धारक असतेच, पण त्यांचे जीवन चरित्रही बरेच काही शिकवून जाते. या दोन भावंडांची जीवन लीला आणि समाधीलाही ७०० वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी हा संवाद आजही जिवंत आहे. कारण हा निव्वळ दोन भावंडांमधील संवाद नाही, त्याहून खूप काही दडलंय यात. आजही आपल्याला मार्गदर्शन करणारे, अगदी कालातीत म्हणावे असे … तेच समजून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न … “ताटी उघडा ज्ञानेश्वरा”
क्रमशः

— लेखन : सृष्टी गुजराथी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
