‘भीमशिळा’
पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून जगभरातील शिवभक्त केदारनाथ धामाच्या दर्शनासाठी उत्सुक असतात. महादेवाच्या या पवित्र धामाशी निगडित अनेक अद्भूत कथा आणि चमत्कार भक्तांना थक्क करतात. असाच एक प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला आणि इतिहासात नोंदवला गेलेला चमत्कार म्हणजे केदारनाथ मंदिराच्या मागे उभी असलेली ‘भीमशिळा’.

जून २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या भीषण जलप्रलयात संपूर्ण केदारनाथ घाटी उद्ध्वस्त झाली होती. पुराचा प्रचंड वेग आणि डोंगरावरून वाहून येणारे महाकाय दगड-धोंडे मंदिराला नष्ट करण्यासाठी पुढे येत होते. परंतु, अगदी शेवटच्या क्षणी एक विशालकाय शिळा मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला येऊन थांबली. या शिळेने स्वतः ढाल बनून पुराच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह दोन दिशांना विभागून दिला, ज्यामुळे मुख्य मंदिराला आणि गर्भगृहाला साधा तडाही गेला नाही. पांडवांपैकी बलशाली भीमाने मंदिराचे रक्षण करण्यासाठी हा दगड ठेवला, अशी भावना निर्माण झाल्याने या शिळेला ‘भीमशिळा’ असे नाव पडले.आज बर्फाच्छादित वातावरणात आणि फुलांच्या माळांनी सजवलेली ही भीमशिळा ईश्वरी अस्तित्वाची आणि निसर्गाच्या चमत्काराची साक्ष देत उभी आहे.

केदारनाथच्या या ऐतिहासिक घटनेची आठवण नुकत्याच नेपाळमध्ये आलेल्या भीषण महाप्रलयामुळे पुन्हा एकदा ताजी झाली आहे. नेपाळमध्ये संततधार पावसामुळे आलेला महापूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. हिमालयाच्या या संवेदनशील पट्ट्यात निसर्गाचे बदलणारे रूप आणि मानवापुढील आव्हाने स्पष्टपणे दिसून येत आहेत.

नेपाळमधील पूर असो वा २०१३ चा केदारनाथ प्रलय, निसर्गाचे रौद्ररूप आपल्याला मानवी मर्यादांची जाणीव करून देते. अशा कठीण काळात जिथे आधुनिक विज्ञान आणि मानवी प्रयत्न थिटे पडतात, तिथे केदारनाथच्या ‘भीमशिळे’ सारख्या घटना भक्तांसाठी केवळ आशेचा किरण ठरत नाहीत, तर निसर्गाचा कोप आणि ईश्वरी शक्तीचा समतोल दर्शवणारा एक जिवंत पुरावा बनतात.

श्रावणमासाच्या पावन पर्वावर या भीमशिळेचे दर्शन घेणे म्हणजे केवळ एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होणे नसून, निसर्गाप्रती आदर आणि ईश्वराप्रती श्रद्धा अधिक दृढ करणे आहे.

— लेखन आणि छायाचित्रे : विजय होकर्णे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
