Homeकलाअमेरिका : बीएमएम संमेलन : ५

अमेरिका : बीएमएम संमेलन : ५

अमेरिकेत मराठीला चांगले दिवस आले आहेत असे मी मागच्या लेखात म्हटलं , त्याला आणखी एक कारण आहे. तुम्ही सांगा, तुमच्यापैकी किती जणांनी “संगीत शारदा” हे नाटक पाहिले आहे ? नाटक कदाचित पाहिले नसेल तुम्ही, पण त्यातले “म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयोमान..,,”  हे पद तरी, कुठे तरी वाचले, ऐकले असेल ना ?

पण तुम्हाला माहित आहे कां ? हे नाटक किती जुने आहे ते ? गोविंद बल्लाळ देवल ह्यांनी लिहिलेले हे नाटक १८९९ साली प्रथम रंगभूमीवर आले होते. ह्या नाटकामुळे “बालविवाह प्रतिबंधक कायदा असावा “ही चळवळ सुरू झाली.
खरं तर हे नाटक ५ अंकी आहे पण तरी इतके जुने नाटक बसवावे असे वाटणे, ते १ अंकी २ तास करणे आणि ह्या नाटकाचे संदर्भ कदाचित इथल्या तरूण पिढीला कळणारही नाहीत असे असतांना, त्या तरूण पिढीला घेऊनच हे नाटक स्टेजवर आणणे …हे किती धाडसाचे आहे ? ….त्या मागे “मराठीवरचे प्रेम“ हे कारण आहे असे आपण म्हटले तर ते चुकीचे  ठरणार नाही ना?

सियाटल मधल्या गुणी कलाकारांनी हे नाटक खूप सुरेख केले. या नाटकाचे दिग्दर्शक होते जयंत भोपटकर.
आणि कलाकार :
शीतल पटवर्धन बापट (शारदा), शुभंकर हिंगणे (कोदंड), जयंत भोपटकर (भुजंगनाथ), राहुल तारांबळे, दीपश्री जोगळेकर, अमित कुलकर्णी, अनिकेत सप्रे, स्नेहल पिटके – कुलकर्णी, अबीर, अमोल कोल्हे, अवधूत.

सर्वच गाणी छान म्हटली सर्वांनी. अगदी “वन्स मोअर” मिळवत. सर्व बायका नटून, थटून, त्या काळाप्रमाणे बोलतांना खूपच छान वाटले.  हल्ली डिजिटल क्रांतीमुळे नाटकासाठी सेट बनवावे लागत नाहीत. मागच्या पडद्यावर प्रोजेक्ट करून छान वातावरण निर्मिती करता येते. अर्थात ह्या सर्वालाच खूप मेहनत लागते आणि अनेक नवोदित कलाकारांनाही त्यामुळे संधी मिळते. जुने छान नाटक पहायची संधी दिल्याबद्दल, शारदा टीमचे आभार आणि कौतुक !

आणखी दोन सुरेख कार्यक्रम सियाटल मधील कलाकारांनी दिले आणि सर्वांची वहावा मिळवली .. एक होता सत्यजित लिमये ह्यांची संकल्पना असलेला वाद्यसंगम ! हा कार्यक्रम म्हणजे रसिकांसाठी मेजवानी होती. राग, ताल आणि वाद्य ह्यांचा सुरेल संगम या कार्यक्रमात होता. एकूण ४ राग घेतले होते… नायकी कानडा, यमन, कलिंगडा, भैरवी! संतूर, बासरी, संवादिनी, तबला, ऑक्टोपॅड, सिंथेसायझर ह्या वाद्यांच्या मदतीने हे राग उलगडण्यात आले. मग ह्या रागांवर आधारीत काही गाणी आणि गानमाला वाजवण्यात आले. सर्वच कलाकार कसलेले होते. त्यांची तयारी जबरदस्त होती. कोरस मधल्या कलाकारांनी दिलेली साथही पुरक होती. “शब्दांविना रंगलेली ही रागांची मैफिल” असे वर्णन या कार्यक्रमाचे करता येईल. ओळखीची गाणी, त्या गाण्यामागच्या काही कथा, माहिती …अमित आणि स्नेहल कुलकर्णी ह्या दांपत्याने केलेले संयमीत, योग्य निवेदन ह्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली.

दुसरा कार्यक्रम होता “रेडिओ मैत्री”. ही संकल्पनाच खूप छान होती. प्रेक्षकांमध्ये जेष्ठ नागरिक होते. रेडिओवरचे जुने ओळखीचे संगीत  ऐकून, एकदम खूष होऊन तेही गुणगुणायला लागले होते. जुन्या काळाच्या आठवणीत जाऊन टाळ्यांनी साथ देत होते. मोठे प्रसन्न वातावरण होते तिथे.

भारतात टिव्ही वर दिसणारे लाडके कलाकार साथीला होते, माईकचा थोडा प्रॅाब्लेम होता तरी त्यावर मात करणारे उत्साही रेडिओ जॅाकी होते, सियाटलचे स्टेज गाजवणारे नेहमीचे गायक कलाकार होते. मग काय ? … कार्यक्रम किती सुंदर झाला हे सांगायलाच नको. सगळे प्रेक्षक, रसिक अगदी तृप्त होऊन सभागृहातून बाहेर पडले. त्याबद्दल सर्व कलाकारांना खूप धन्यवाद !
क्रमशः

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments