तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागात मी 1988-89 या वर्षात मास्टर्सची पदवी संपादन केली. पदवीदान समारंभात मी माझ्या आई आणि पत्नीसह उपस्थित होतो. त्याकाळी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असत. त्यामुळे प्रा. सुधीर गव्हाणे सरांनी (त्यावेळी ते डॉक्टर झालेले नव्हते) आम्हाला त्यांच्या घरी चहा पानासाठी बोलाविले होते. आजची आपली कथा नायिका; मर्मबंधा गव्हाणे त्यावेळी अवघ्या दोन तीन वर्षांची असावी. गोड आणि खोडकर मर्मबंधाला बघून मी उस्फूर्तपणे माझ्या हातात असलेला पदवीदान समारंभात प्रदान करावयाचा गाऊन मर्मबंधाला घातला आणि एक छानसा फोटो काढला.

बोलता बोलता मर्मबंधा मोठी झाली. तिने तिच्या आवडीचे चित्रपट क्षेत्र निवडले. त्यातील पदवी प्राप्त केली आणि या क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले. पुढे शिष्यवृत्ती मिळवून ती अमेरिकेत जाऊन आली. तिची ही यशकथा या पोर्टल वर दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध झाली होती. ही यशकथा आपण पुढील लिंक ला क्लिक करून अवश्य वाचा.
न्यूज स्टोरी टुडे
२५.१.२०२५
चित्र सफर : ४३
“मर्मबंधा गव्हाणे”
✒️ देवेंद्र भुजबळ. 👇
https://newsstorytoday.com/चित्र-सफर-४३-2/
टीम एन एस टी ☎️ 9869484800
पुढे मी लिहिलेल्या “माध्यमभूषण” या पुस्तकात देखील मर्मबंधाची यश कथा समाविष्ट झाली.

आता मर्मबंधाने एक पाऊल पुढे टाकले असून “दिल का अलगोरीदम“ या हिंदी वेबसीरीजच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून उत्तम कामगिरी करून आपली प्रतिभा सिध्द केली आहे.
जेन जी चं भावविश्व मांडणारे कथानक व जेन जी चेच नवतरूण अभिनेते असणारी ही १० भागांची हिंदी वेब सीरीज़ यूट्यूबवर रीलीज केली जात आहे. तीन भाग या आधीच प्रदर्शित झाले असून उर्वरित ७ यापुढे भाग दर गुरूवारी संध्याकाळी साडेसातला प्रदर्शित होणार आहेत.

आजवर अवघ्या दहा दिवसांत दोन लाखांहून अधिक प्रेक्षकांनी ही सिरीज पाहून पसंती दिल्याने ही ताज्यातवान्या वास्तवदर्शी कथानकाची नव्या दमाची ही सिरीज चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
“दिल का अलगोरीदम“ याची संकल्पना, कथा – पटकथा, संवाद व दिग्दर्शन मर्मबंधा गव्हाणेचेच आहे. “फूटरी टेल्स ओरीजीनल“ या निर्माता अनुबब चितलांगिया यांच्या कंपनीने ही मालिका तयार केली आहे. याचा आकृतीबंधही “शॉर्ट ड्रामा” (लघुनाट्य) असा नवा आहे. पहिले तीन प्रसारित झाले आहेत व आजच्या नव्या जेन जी व जेन अल्फाची ही हळूवार पण आगळीवेगळी प्रेमकथा लक्षवेधी ठरते आहे.
मर्मबंधा गव्हाणेचे न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
