Homeलेखसंगती रंग : २८

संगती रंग : २८

ऋणानुबंध

आज एक अनोखा अनुभव शेअर करते आहे.
माझी लेखिका म्हणून ओळख व्हावी असं मला नेहमी वाटत होतं. पण एक भीती पण असायची. ती अशी की लेखिका तर म्हटलं पाहिजे, पण कोणी चिडवलं किंवा उपहासाने म्हटलं ‘काय लेखिकाबाई !’ की मनातून वाईट वाटत असे. भित्यापाठी ब्रह्मराक्षस ! माझा स्वभाव भित्रा असल्याने राक्षस मला पावलोपावली मिळत गेले आहेत. म्हणजे लेखिका म्हणायचं आणि ‘ कोण वाचतंय म्हणा हल्ली आणि त्यात मराठी !‘ असे हेटाळणीने ओथंबलेले उद्गार वर. हा बऱ्याच वेळचा अनुभव. (थोडं विषयांतर करते, इंग्रजी हेट ह्या शब्दावरून हेटाळणी हा शब्द आला काय हो ?) त्यात असे काय काय आठवते की स्मरणशक्ती शाप वाटावी !

तर राक्षसांबद्दल सांगत होते, असे सगळे राक्षस एका पारड्यात आणि दुसऱ्या पारड्यात देवदूत भेटले नुकतेच, ते असे की आताच्या काळात ते स्वप्न वाटावे.

मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती ह्या सगळ्याबद्दल आदर असणारे दांपत्य,श्री. जीवन व सौ.उज्वला कुलकर्णी.

श्री. कुलकर्णी माझे वाचक या नात्याने ‘पुन्हा नव्याने‘ च्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी आले होते. छान बुके घेऊन. ती त्यांच्याशी झालेली माझी पहिली प्रत्यक्ष भेट. त्यानंतर मान्यवरांची नावे घेऊन प्रकाशनसमारंभाचे भरपूर कौतुक त्यांनी फोनवर केले होते.

‘संगती रंग‘ दर गुरुवारी वाचतो असे म्हणाले होते मध्यंतरी.

‘गेल्या गुरुवारी स्टेटस पाहिले नाही, लेख पाठवता ?‘ असा मेसेज येत असे अधून मधून. ह्या वर्षी दिवाळी अंकात कुठे लिहिलं आहे ? आस्थेने विचारत.

‘या एकदा कोल्हापूरला’, असंही ते म्हणत. ‘महालक्ष्मीचे दर्शन घ्याल. नरसोबाच्या वाडीला आई वडील असतात, दत्तगुरूंचं दर्शनसुध्दा घेऊ.’

मी संकोचून जात असे. ओळख ना पाळख. वाचक असेल एखादा म्हणून काय ! शिवाय, ‘घरी या एकदा‘ असं म्हणणारे म्हणतात की, म्हणजे ते आपण खरं धरून चालतो का ?

दहा ऑगस्टला मला जीवन कुलकर्णी यांचा फोन आला, म्हणजे पंधरा वीस दिवसांपूर्वी. “मी एक प्लॅन केला आहे, चौदा ऑगस्टला सकाळी निघायचं. चार साडे चार वाजता कोल्हापूर ! छान स्टॉप घेत, जेव्हा चहा हवा नाश्ता हवा तेव्हा थांबू. मजेत जाऊ !”
“काहीतरीच काय !” मला खरंच वाटेना.
“आम्ही जातोच आहोत ना. तुम्ही या सोबत ह्या वेळी. उज्वलाशी बोला.”

ह्यावर काय बोलणार मी ?

कोल्हापूर ट्रिप मनोमन मी ठरवत असे. कोल्हापूरला मी खूप वेळा गेले पण आहे. गेल्या आठ नऊ वर्षांत मात्र जाणे झालेले नाही. मन अशांत असेल तेव्हा शांत होण्यासाठी मंदिरालगत असलेल्या पारावर बसलेली आहे, अशी मी कल्पना करते. मनाने तिथे पोचते. झुळुक यावी तसे वाटते मला तेव्हा.

माझे योग शिक्षक योगनिद्रेची सुरुवात करताना नेहमी सांगतात, आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करा. त्यांनी असे म्हटले की माझ्या डोळ्यांसमोर उभी रहाते महालक्ष्मी आणि तिथला परिसर. गुढगे थोडा त्रास देतात त्यामुळे खूप हळहळ वाटत असे. सामान उचलणे म्हणजे संकट. कसे जाणार मी कोल्हापूरला ? चांगली सोबत हवी. हल्ली ट्रॅफिकच्या बातम्या ऐकते आहे, त्यात मिसिंगलिंक बद्दल उलट सुलट मतं. रेल्वेचा प्रवास तर कठीण वाटतो, कारण मला ट्रेनमध्ये बसेपर्यंत इतकं असुरक्षित वाटतं…

मग कसं जमेल कोल्हापूर ? मला रुखरुख वाटत असे. इष्ट देवतेचं स्मरण करतानासुद्धा श्री. कुलकर्णी म्हणाले होते, ’या की कोल्हापूरला‘ हे कधीही आठवले नव्हते !!

अचानक ह्या लोकांना मला न्याव असं का बरं वाटतं असेल ? देवानंच हाक ऐकली बाई, असे आई किंवा आजी कधीतरी म्हणत असत. ते अनुभवत होते. मुंबई आणि मुंबईच्या आसपास वावरलेला माणूस, म्हणजे थोडक्यात गावापासून दूर आलेला माणूस निरपेक्ष, नि:स्वार्थ हे शब्द विसरू लागला आहे. मी त्यातलीच. त्यामुळे मी लगेच त्यांच्या प्रस्तावाला होकार दिला नाही ! पण मनाने मात्र कोल्हापूर गाठले होते.

त्यांनी पुन्हा फोन केला, “माझं शेड्युल बघा पटतं का, गेल्या गेल्या देवीचं दर्शन. अनायासे श्रावणी शुक्रवार आहे. म्हणजे असं बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी नरसोबाची वाडी. १४, १५, १६ तीन पूर्ण दिवस सुद्धा नाहीत. तेव्हढे दिवस खर्च नाही करू शकत तुम्ही ? सोळा ऑगस्टला संध्याकाळी सात पर्यंत परतू. पंधरा ऑगस्टची सुट्टी असते. मला फक्त १४ ची रजा टाकावी लागेल.”

मी गप्पच. “नाही म्हणण्याचं काय कारण आहे ? तुमचा काही वेगळा प्रोग्राम आहे ?”
आता ‘रजा हवी’ चा प्रश्न मला रिटायर्ड असल्याने नाही. जायचे तर होतेच किती दिवस मनात. महालक्ष्मी आणि शिवाय नरसोबाची वाडी लगेच दुसऱ्या दिवशी. मला सोबत हवी होती, श्रद्धा असलेल्या व्यक्तीची सोबत हवी होती. शिवाय माझ्याबद्दल आस्था असणारी ! आता तर जीवन आणि उज्वलाताईंची सोबत असणार होती. गाडी घराशी आणायला येणार, सोडायला येणार. इतकं समोर आलेलं देवाचं रूप नाकाराव असं वाटेना.

असेही वाटे, का करेल, कोणी असं नि:स्वार्थपणे ? एकविसाव्या शतकात ? विश्वास कसा ठेवावा ? वाचक म्हणून ?
काय करू ?
जितक्या जणांचे सल्ले घेईन तेव्हढी कन्फ्युज होईन. माझे मीच ठरवले जायचेच. ना कोणाला सांगितले, ना विचारले.

अमेरिकेत असलेल्या माझ्या मुलाच्या कानावर घातले की मी जाते आहे कोल्हापूर आणि वाडीला.

विशेष असे की त्याने, ‘अचानक काय ठरवलेस ?‘ किंवा ‘ओळख एकदा झाली आणि त्यांची सोबत काय घेतेस‘ वगैरे असे काहीही टोकले नाही. ही सुद्धा ईश्वरी कृपाच समजते मी. विश्वास बसणार नाही, शुक्रवारी पहाटे उठून आवरायला घेतले. उठल्यावर एक वाऱ्याची लहर यावी तसे मला एकाएकी निश्चिंत वाटले. मला तर महालक्ष्मी आणि दत्तगुरूंनी खास बोलावून घेतले आहे, काहीही त्रास होणार नाही. काहीही अडचण येणार नाही.

चौदा ऑगस्टला सकाळी साडे सहा वाजता निघालो आम्ही. त्यांचा श्रावणी शुक्रवारी उपवास असतो त्यामुळे उज्वलाताईंनी सकाळी उठून वरीची भगर करून आणली होती. खजुराची वडी, वेफर्स, चिवडा अशी रेलचेल होती.
”किती लाड करत आहात, मी स्वप्नात तर नाही ना ?“ मी अधूनमधून विचारत होते.
तुम्हाला चहा किंवा कॉफी हवी का, इडली डोसा खाऊन घेऊया का असे चालू होते.
”एव्हढं काय जपता तुम्ही ? मी काही व्ही.आय.पी नाही !” असे सांगावे लागले मला.

सातारा सोडल्यावर मी खनपटीलाच बसले. “तुम्ही का अगत्याने वागता इतके ? गेल्या जन्मीचे कोणी लागत असाल असे ठाम वाटते आहे मला.“
त्या दोघांनी सांगितले, “आम्ही काही वेगळे वागत नाही. नॉर्मल आहे आमचे वागणे !”

देवदूत समजले आहे मी ह्या दोघांना. हे पारडे जड झाले !

ट्रॅफिक किंवा कोणतीही अडचण न येता आम्ही वेळेत पोचलो. थोडा पाऊस होता, पण देवीला जायचं म्हणून साडी नेसली. श्रावणी शुक्रवार होता ना. अलोट गर्दी ! देवळाच्या प्रांगणात पाण्यामुळे चिकचिक झालेलं. माझ्या हे लक्षात आलंच नव्हतं. मग माझी पर्स, ओटीच सामान उज्वलाताई सांभाळत आहेत ! मी साडी सावरत जेमतेम. उस गोड आहे म्हणून कसा मुळासकट उपटून घेते आहे मी, असे वाटले. अपराधी वाटले.
“इथे रांगेत उभं राहताना छप्पर नसेल, पायाशी निसरडं झालं असेल हे माझ्या डोक्यात आलंच नाही बघा.”
“काय बिघडलं त्यामुळे ? उलट बरं झालं की. छान साडी नेसून देवीला भेटायला आलात !” उज्वलाताई.

माणसं इतकी चांगली सहज वागू शकतात ?
ठरल्याप्रमाणे पंधरा तारखेला नरसोबाची वाडी. मनासारखे दर्शन. जीवन यांचे बालपण तिथे गेले असल्याने भटजी, दुकानदार, सेवेकरी, भिक्षेकरी सगळेच त्यांना ओळखतात. त्यामुळे परक्या ठिकाणी परिसराची जी एक अनोळख जाणवत असते ती मला मुळीच जाणवली नाही. तीस वर्षांपूर्वी आले होते वाडीला. तेव्हा घाट नव्हता. घाट छान बांधला आहे आता. स्वच्छ आहे. नदी तुडुंब भरलेली. थोडा पाऊस रिमझिमत असल्याने प्रत्येक थेंबाची होडी तयार होत होती. कॅमेऱ्यात साठवले ते विहंगम दृश्य.

एकही गोष्ट अशी घडली नाही की नाराज व्हावे ! गैरसोय काडीचीही नाही. पाण्याची बाटली सुद्धा मला उचलू दिली नाही त्यांनी.

शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता सुरू हा सत्संग रविवारी संध्याकाळी संपला. कोल्हापूर आणि वाडी माझ्या नशिबात इतक्या छान पद्धतीने लिहिले होते. तर्क चालत नाही, ऋणानुबंध म्हणू शकतो.

नतमस्तक !
देवीने दृष्टांत दिला, स्वप्नात येऊन सांगितले. ह्या गोष्टीना मी इतके दिवस, इतकी वर्षे आख्यायिका मानत होते. माझी मनापासून केलेली इच्छा अशी फलद्रूप झाली.

शिवाय किती गोष्टी मिळाल्या ? श्रद्धा फक्त देवावरची दृढ झाली असे नाही, तर चांगुलपणा वरची श्रद्धा सुद्धा वाढली ! वेगळेच अलौकिक समाधान मिळाले. मी लिहिते ह्याचे फलित सुद्धा वाटते आहे हे मला.

ह्या अडीच दिवसात किती माणसे भेटली,काय काय लिहू ! त्यांची भेट, त्यांचे आदरातिथ्य हाही भाग्ययोगच. श्री. जीवन यांचा मित्र राजू ! अकारण आपलेपणा, अविश्वसनीय जिव्हाळा.

जीवन ह्यांचे आई वडील, उज्वला ह्यांचे आईवडील ही सगळी ठळक उठून दिसणारी कर्तृत्ववान मंडळी आहेत !
मी जे अनुभवले सारे अकल्पित.विलक्षण. सारे संस्मरणीय.
तूर्त इतकेच.
क्रमशः

वसुंधरा घाणेकर

— लेखन : वसुंधरा घाणेकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments