संगीत खुर्ची
बँकेत जॉब असेल तर बदली हा अटळ भाग. घराजवळ ब्रँच मिळणे हे भाग्य असते. कामासाठी लांब जावे लागणे कटकटीचेच असते. त्यात मुंबईजवळ उपनगरात राहणारे लोक असतात, ते फार वैतागत असतात. मुंबईत रोज जायचे पण तेथे तर घर घेता येत नाही. परवडत नाही. बाहेरगावी रहाणारे उपनगरवासियांना ‘मुंबईकर’ म्हणतात. पण ते खरे नाही.
उपनगरवासियांना वेळेत मस्टरवर सही करणे याचे प्रवास करताना दडपण असते. बायोमेट्रिकमुळे तर दडपण वाढले आहे. बँकेत पोचण्यासाठी ट्रेनचा प्रवास, त्या आधी रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी रिक्षा. रिक्षा मिळवण्यासाठी चालायचे. हवी ती ट्रेन गाठायलाच हवी. हे सगळे अजिबातच सोपे नाही. पण ट्रेनच्या प्रवासाचे वर्णन तर मी आज करणार नाहीये. घराजवळची ब्रँच नाही मिळाली तर सीएसटी जवळ असणाऱ्या फोर्ट परिसरातील ब्रँचेसना आपसूकच मागणी असायची. अजूनही असते.
डोंबिवली, कल्याण, ठाणे या उपनगरात राहणाऱ्या एम्प्लॉईजना एकतर आपण राहतो त्या गावात किंवा अशा सीएसटी जवळच्या ब्रँचेस हव्याच असायच्या. पण संगीत खुर्ची खेळताना खुर्च्या कमी असतील तर, खूप जणं आऊट व्हायची ठाम शक्यता असतेच ना. तसंच व्हायचं. हवी ती, सोयीची ब्रँच मिळणं अशक्य होतं.
सोयीची ब्रँच बदली करून मिळावी म्हणून प्रयत्न करत राहायचे. ती तर लॉटरीच असते. एकालाच लॉटरी मिळणार आणि २० ते २५ जण या लॉटरीसाठी प्रयत्न करणार ही किती अवघड शर्यत ! एक प्रकारची संगीत खुर्ची. त्या संगीत खुर्चीच्या खेळामध्ये इतके अवघड नसते जितके आमच्या बदलीच्या खेळात असते.
दुर्धर रोग असेल किंवा जन्मजात अपंगत्व असेल तर बदली घराजवळ करून मिळते. पण अर्थातच ती लॉटरी नाही. ते माणुसकीच्या नात्याने असलेले कर्तव्य आहे.
बाकी ह्या लॉटरी लागणाऱ्या भाग्यवान एम्प्लॉईंबद्दल काय बोलावे ! सोयीची बदली मिळण्यासाठी स्त्री कर्मचारी साहजिकच जास्ती धडपडतात. मग त्यासाठी कारणे शोधली जातात – गरोदर असणे, मूल लहान असणे, घरातले वृद्ध आजारी असणे, काही कौटुंबिक समस्या असणे अशी. तशी कारणे ती खरी असतातच, नसतात असे नाही. तसा अर्ज केला जातो. समस्येच्या जटिलतेनुसार अग्रक्रम ठरवावा अशी अपेक्षा असते. पण आपल्या देशात वशिलेबाजी, लांगुलचालन आणि अशा इतर गोष्टींना प्राधान्य दिले जाते असा मला खूपदा अनुभव आलेला आहे. ‘फेव्हर करणे‘ हा वाक्प्रचार मला बँकेत जॉब लागल्यावरच कळला.
मी डोंबिवलीला राहत असल्यामुळे मलापण जवळचीच ब्रँच पाहिजे होती. मी रीतसर अर्ज दिला होता. वेटिंग लिस्ट होती. अकरावा की तेरावा नंबर होता माझा. दहा अकरा वर्षांमध्ये हळूहळू सरकत तो पहिला झाला. आता लागणार माझा नंबर. अहाहा !! म्हणजे आता तिथे कुणी रिटायर्ड झालं, प्रमोशन घेऊन कुणी बदलून गेलं की मीच ! पण माझा नंबर पहिलाच राहिला. कितीतरी जण त्या जवळच्या ब्रँचमध्ये बदली होऊन चक्क घुसले. रुजू झाले. माझा नंबर कायम पहिलाच ! कधी सरकलाच नाही.
आम्हाला शाळेत एक धडा होता. वर्गात शिस्तशीर, गुणी विद्यार्थी असतात. अभ्यासात, नीट नेटकेपणात चमकणारे असतात सगळे. त्या धड्याचे शीर्षक होते. ‘आमचा वर्ग नेहमी पहिला.’
त्या चालीवर, वेटिंग लिस्टमध्ये माझा नंबर नेहमी पहिला !
एकदा तर मला सांगितले गेले, ”आपल्या युनियन लीडरचे आडनाव काय आहे ? त्याप्रमाणे ते तुझे करून घे. म्हणजे काम होईल.” ते खरे असेल असं नाही. पण ते खोटं होतं असंही म्हणता येत नाही. दाद लागत नव्हती हे खरं.
कितीतरी सरकारी कार्यालये, कंपन्या अशा आहेत की तेथे बदली हा विषयच नाही. मी मनाशी समजूत घालत असे की आपण तसेच समजायचे. बदली होईल, ती होतेच. पण अशीच घरापासून दूर. गैरसोयीची. सोयीची बदली ही लॉटरी आहे. व्यक्तिशः मला विचाराल तर माझ्या ३८ वर्षांच्या नोकरीमध्ये तीस एकतीस वर्षे सतत अडचणीची, गैरसोयीची ब्रँच मिळत गेली खरी. पण मागे वळून पाहताना असे जाणवते की, प्रवासाची यातायात असताना आणि ती असल्यामुळेच, अनेक व्यक्ती भेटल्या. त्यासाठी मला कृतज्ञच वाटते आता. बदलीसाठी केलेल्या खटपटी, राजकारण, छुपे युद्ध असे सगळे आठवते आणि आता त्याची गंमतच वाटते.

सरोज नावाची माझी मैत्रीण बदलीसाठी प्रयत्न करत होती. घरातल्या वातावरणामुळे गांजली होती ती. आमच्याबरोबर लंचटाईममध्ये नेहमी ती मन मोकळं करत असे. घरामध्ये विरोध पत्करून तिने लग्न केले होते. त्यामुळे तिला बिचारीला माहेरचा पाठिंबा नाही.
”माझा तोंड दाबून बुक्क्याचा मार होतो गं.“ हे तिचे नेहमीचे वाक्य. घरामध्ये सासू-सासरे खूप जाच करत असत. त्यांचाही लग्नाला विरोधच होता. निदान लग्न करायची परवानगी तरी मिळाली, या उपकाराच्या ओझ्याखाली तिचा नवरा दबलेला होता. सासू -सासऱ्यांच्या मागण्या सरोजसुद्धा अट्टाहासाने पुऱ्या करत असे. सासू सांगायची “आमटी करूनच जा बाई.”
नवरा म्हणायचा, “अगं तू केलेली आमटी बाबांना आवडते, म्हणून माझी आई कर सांगते.”
खरीच होती ती गोष्ट. सरोजच्या हाताला चव आहे.
पण ८.४७ सीएसटी डबल फास्ट पकडायची, आमटी करून ! म्हणजे असं बघा, कुकर लावून डाळ आधी शिजली पाहिजे. डाळ फोडणीला टाकून उकळी आल्याशिवाय कोथिंबीर घालायची नाही. मात्र, कोथिंबीर घालायचीच. ‘मस्ट’ आहे ती. कडक नियम. कोथिंबीर आयत्या वेळी उपस्थित करता येत नाही. त्याची व्यवस्था करावी लागते. आधीच आणून, निवडून टिकवावी लागते. आमटी झाल्यावर ती भांड्यात काढून ठेवायला हवी.
“आणि हो, कुकर विसळून ठेव. भातासाठी थोडे तांदूळसुद्धा काढून ठेव. केवढंसं मेलं आम्ही खाणार ते. म्हातारी माणसं आम्ही !”
सकाळी उठून फक्त आमटी का करायची आहे ? डब्यासाठी पोळी भाजी नको ? डब्यासाठी करायचे तर सासू -सासऱ्यांच्या पोळ्या कशा वगळायच्या ?
पोळीवाली बाई पोळ्या मनापासून करेल का ? सासूबाई तिला चालवून घेतील का ? उत्तर हेच, की ‘नाही !’ तिची परिस्थिती नवऱ्याला कळत होती. पण उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला बिचारा गप्प राहायचा. तिला त्रास होतो म्हणून वेगळे घर घ्यावे तर, वेगळे घर घेणे उपनगरामध्येसुद्धा इतके स्वस्त नसतेच. त्यात मूल झाल्यावर तिला तर अडकल्यासारखे वाटू लागले.
घराजवळ बदली तिने मागितली. कारण काय लिहिणार ? सासू त्रास देते, आई-वडिलांनी वाळीत टाकले आहे. असे ?
की असे लिहायचे, रोज मला आमटी करून निघावे लागते. घराजवळची ब्रँच द्या.
सरोज एवढं मात्र वरिष्ठांना सांगायला गेली, “अकरा वर्षे झाली. मी प्रवास करते आहे. मला काहीच अधिकार नाही का जवळची ब्रँच मागण्याचा ? लिस्टमध्ये आता माझा नंबर आहे.”
पण बिचारीची काही डाळ शिजली नाही, किंवा आमटी उकळली नाही असं म्हणूया. मग तिनं सासूच्या तब्येतीचे कारण सांगितलं. तसा बदलीसाठी तिने अर्ज दिला. (सासूची छ्ळीक मानसिक स्थिती बघता ते सर्वस्वी खोटं नव्हतंच !)
त्याचवेळी दुसऱ्या ठिकाणाहून शमिकाने अर्ज दाखल केला. त्याच त्या लॉटरी ब्रँचसाठी ! शमिकाचा नंबर सरोजच्या खूप मागे होता. दोघींचीही समस्या कौटुंबिकच होती.
पण शमिकाचा अर्ज पुढेपर्यंत पोहोचावा म्हणून युनियनच्या रिप्रेझेंटेटिव्हनी मनापासून प्रयत्न केले. यावर समर्थन असे दिले की, शमिका घटस्फोटीत आहे. दहा वर्षांची मुलगी आहे तिला. त्यात कोर्ट केससाठी तिला अधून मधून हजर राहावे लागते. ती लढते आहे तिला मदत करायला हवी !
जेव्हा कळले की शमिकासाठी युनियन लीडरपर्यंत दखल घेतली गेली आहे, आम्ही सगळ्या मैत्रिणी चकित झालो.
सरोज म्हणाली, ”छळापासून तिची सुटका झाली आहे. म्हणजे मी सगळं सोसून राहते आहे, म्हणून माझा कैवार कोणी घेणार नाही ? ” आम्ही नकळतच लंच ग्रुपमधल्या सगळ्याजणी हसलो ! सरोजदेखील.
सरोज आणि शमिका दोघीजणी खरं म्हणजे लढतच होत्या. कोणत्या समस्यांना समस्या म्हणायचे ? कोणत्या समस्या बदली घेतल्यामुळे कमी होऊ शकतात ? समस्यांचे अग्रक्रम लावून निर्णय द्यायला हवा. शिवाय एखादा मेंबर किती दिवस वेटिंग आहे, ह्याचा काही विचार असतो का ? काय माहीत ? त्यावेळी सरोज आणि शमिका दोघींपैकी कोणालाच ती ‘लॉटरी‘ ब्रँच मिळाली नाही. वेगळेच कोणीतरी, कोणाच्या तरी वशिल्याचे उपटले आणि सरोजचा नंबर पहिलाच राहिला !
जाता जाता एक अशी आठवण येते आहे. ती सांगते. आमच्या बँकेतल्या एका स्टाफची मुलगी स्पेशल चाईल्ड होती. त्या कारणाने तिला साहाजिकच घराजवळची ब्रँच मिळाली. नंतरचं हे लिहायलासुद्धा मला धजावत नाहीये. त्या स्पेशल चाइल्डचा अल्पवयात मृत्यू झाला. परंतु त्या कारणाने मिळालेली बदली तिने स्पेशल चाइल्डचा मृत्यू न कळवताच, कित्येक वर्षे तशीच ठेवली !
जेव्हा हे कळले तेव्हा फार वाईट वाटले. विचित्र वाटले. जणू स्वतःचे दुःख तिने विकले आणि सहानुभूती मिळवली अशी भावना झाली. आणखी कोणाचा जेन्युईन प्रॉब्लेम असेल तर त्याला सोयीची ब्रँच मिळावी असे तिला का वाटू नये ?
संगीत खुर्ची हा खेळच असा आहे, की जागा ‘आपण‘ पकडायची ! खुर्ची पकडणे हेच ध्येय असलेल्या अनेक व्यक्ती असतात आणि अशा व्यक्तींची धारणाच वेगळी असते. कोणतीही खुर्ची असो मग ती. नीती, दया, संस्कृती, सद्सद्विवेक, प्रामाणिकपणा यांची पायमल्ली झाली तरी त्याचे सोयर सुतक नसते, या खुर्ची बहाद्दरांना !
क्रमशः

— लेखन : वसुंधरा घाणेकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
