“जन्म-मृत्यू दाखला”
आयुष्य रिवाइंड करता येत नाही. आज वडील जाऊन एक महिना झाला. आजच्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. वेगळीच धावपळ सुरू होती. काही तास आधीपर्यंत कल्पनाही नव्हती की, आता आपले वडील आपल्याला कायमचे सोडून निघून जाणार आहेत.
माणूस गेला की एक वेगळीच पोकळी निर्माण होते, आणि ही पोकळी त्या जवळच्या काही व्यक्तींनाच जाणवते. काळ प्रत्येक गोष्टीवर उत्तर आहे. नक्कीच, आज मला जितक्या वेदना होत आहेत येत्या काही दिवसात या वेदना कमी होतील. हा असा अनुभव मी दुर्दैवाने या आधीही घेतला आहे. कॅलेंडरवर वर्षा मागे वर्ष सरत जातात. काळानुरूप थोड्या वेदना कमी होतात, पण पुन्हा असाच एखादा प्रसंग घडतो आणि सर्व जखमा पुन्हा ओल्या होतात.
2014, 2024, आणि आता 2026, माझ्या आयुष्यातील तीन महत्त्वाच्या व्यक्ती अशाच जखमा देऊन गेल्या. मृत्यू प्रत्येकाला अटळ आहे. आज मी आहे, पण मी अमरत्व घेऊन आलेलो नाही हे जरी अंतिम सत्य असले, तरी शेवटी आपण माणूस असल्याने, आणि आपल्याला भावना असल्याने, आपल्या प्रिय व्यक्तींचा मृत्यू हा वेदनादायी असतो.
सगळ्यात जास्त वेदना होतात त्या, जेव्हा आपण आपल्याच व्यक्तीच्या मृत्यूच्या दाखल्याचा अर्ज करतो त्यावेळी. जन्म-मृत्यू नोंद एकाच खिडकीवर असते. आज पुन्हा त्या खिडकीसमोरील रांगेत एक अर्ज घेऊन मी उभा आहे. माझ्याच वडिलांच्या मृत्यूच्या दाखल्याचा अर्ज. अर्जासोबत जी कागदपत्रे जोडावी लागली, ती वडिलांनी त्यांच्या खणात जपून ठेवली होती. त्या एकेका कागदाला घेऊन, तो अर्ज घेऊन मी रांगेत उभा होतो. आपण आयुष्यभर वेगवेगळी कागदपत्रे गोळा करतो, शेवटी त्याच कागदपत्रांच्या आधारे आता ही व्यक्ती नाही हे सिद्ध करावे लागते. अशावेळी सगळं शून्य वाटतं.
या रांगेत माझ्यासोबत काही आनंदी चेहरे देखील आहेत. हे जन्म दाखल्यासाठी उभे आहेत. मला आठवतं, माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळी मी जेव्हा जन्मदाखला घ्यायला गेलो होतो, तेव्हा तिचे नाव काय ठेवायचे याची फारशी चर्चा आमची झालेली नव्हती. फक्त मी आधीच तिचे नाव कादंबरी ठेवायचे हे ठरवलेले होते. आणि त्यामुळे कुणाशी काहीही चर्चा न करता मी जन्म दाखल्यावर तिचे कादंबरी हे नाव लिहून मोकळा झालो होतो. त्या दाखल्यावर वडिलांच्या नावासमोर जेव्हा माझे नाव लिहिले गेले, तेव्हा मला काय आनंद झाला होता. त्यावेळी सुद्धा रांगेत काहीजण नक्कीच मृत्यू दाखला काढायला उभे असतील. पण मनुष्य स्वभाव कसा असतो बघा, त्यावेळी माझ्या आनंदा पुढे मला इतर कोणीही दिसत नव्हतं. मी माझ्या मुलीच्या जन्माने इतका आनंदात होतो की, जगात अजूनही दुःख शिल्लक आहे हे मी विसरूनच गेलो होतो.

वडिलांच्या मृत्यूचा दाखला जेव्हा हातात आला तेव्हा मनात सहज विचार आला, याच व्यक्तीने माझ्या जन्माचा दाखला हातात घेतला असेल. त्यावेळी माझ्या जन्माचा त्यांना काय आनंद झाला असेल. नक्कीच, आपल्याला मुलगा झाला या आनंदात ते असतील. ज्या मुलाचा जन्म दाखला त्यांनी घेतला, आज तोच मी त्यांच्या मृत्यूचा दाखला घेऊन पुढील इतर सोपस्कार पूर्ण करणार होतो. उद्या माझ्या बाबतीत हेच घडणार आहे. मी ज्या माझ्या मुलांचे जन्म दाखले याच खिडकीतून घेतले, त्याच खिडकीत उद्या माझा दाखलाही माझी मुलं घेतील.
जन्म-मृत्यू दाखला एकाच खिडकीतून देण्यामागे नेमके लॉजिक काय आहे हे माहीत नाही. पण थोडा विचार केला असता मला असे वाटते की, खिडकीत बसलेल्या व्यक्तीला केवळ दुःखी, कष्टी, चेहरे दिसू नयेत, फक्त मृत्यू दाखले देऊन त्याला त्रास होऊ नये, म्हणून त्याच ठिकाणी जन्मदाखले दिले की, काही हसरे, आनंदी, चेहरे सुद्धा त्याला बघायला मिळत असतील. वातावरण थोडे हलकेफुलके व्हायला याने मदत होते, हे एक कारण असावे. शिवाय ज्या खिडकीतून जन्माला आलेल्या जीवाचा पहिला कागद, पहिले ऑफिशियल डॉक्युमेंट मिळते, त्याच ठिकाणी त्याचे शेवटचे ऑफिशियल डॉक्युमेंट तयार करून प्रवास संपला याची नोंद व्हावी असाही उद्देश असू शकतो. थोडक्यात खिडकीपासून खिडकीपर्यंतचा प्रवास त्याचा पूर्ण होत असावा.
माझ्या जन्मा आधीचा वडिलांचा प्रवास मला फक्त ऐकून माहित आहे. प्रत्येकाचे असेच असते. आपल्याला आपल्या आई वडिलांच्या आयुष्यात जेव्हा आपण प्रत्यक्ष जन्माला येतो त्यानंतर त्यांच्या आयुष्यात या घटना घडतात, जे काही आयुष्याचे चढ-उतार असतात, तेच आपण बघतो, अनुभवतो. त्यापूर्वीचे आयुष्य कधी त्यांच्याकडून, किंवा कधी इतरांकडून आपण ऐकलेले असते. मात्र त्याचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार नसतो.
आपण सोबत जे आयुष्य जगलेलो असतो त्यातील काही प्रसंग हे मनावर कोरलेले असतात. व्यक्ती गेली की हे प्रसंग अगदी ठळकपणे समोर येतात. आज वडील गेल्यावर मला आठवतात ते असेच काही प्रसंग आहेत. खास करून त्यांनी मला जे सायकलवरून फिरवले आहे ते प्रसंग खूप आठवतात. मी लहान असताना गावी, भाड्याने सायकल घेऊन वडील मला कुठे कुठे घेऊन जायचे. शिवाय सायकलच्या हँडलला एक टोपली लावून त्यात मला बसवायचे. मग रस्त्याने कडेला जी मोठी झाडे असतात त्या झाडांचे वर्णन ते करायचे. रोड झाड, पोट फुगलेले झाड, वाकडेतिकडे झाड, संपूर्ण रस्ता ते रनिंग कॉमेंट्री करायचे. आणि मी त्या झाडांकडे बघून त्यांची ही कॉमेंट्री एन्जॉय करायचो.
अगदी कॉलेजला असेपर्यंत मी वडिलांबरोबर डबल सीट सायकलने प्रवास केला आहे. वडिलांनी त्यांच्या आयुष्यात फक्त सायकल हे एकच वाहन वापरले. त्यांच्या सायकलवर मी, माझी बहीण, आई, इतकच काय तर त्यांची नात म्हणजे माझी मुलगी कादंबरी देखील बसली आहे. त्यांच्या या लाडक्या नातीला शाळेतून ने-आण करायला त्यावेळी त्यांनी नवीन सायकल घेतली होती. आबांबरोबर सायकलची राईड त्यांच्या नातीने सुद्धा एन्जॉय केली आहे. बाबा जेव्हा घरी यायचे तेव्हा ते सायकलची दोनदा बेल वाजवायचे आणि आम्ही लगेच बाबा आले म्हणून दार उघडायचो. बाबांची ही सायकलची बेल आता कधीच ऐकू येणार नाही. आणि आता अशी सायकलची राइड सुद्धा कधीच मिळणार नाही. काही गोष्टी या त्या व्यक्तींबरोबरच शक्य होतात. व्यक्ती गेली की सगळं संपलेलं असतं…

— लेखन : किरण आचार्य.
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
