पोर्ट तुतीकोरीन
तुतीकोरीन पोर्ट मध्ये पोहोचलो. शिप जेट्टीवर व्यवस्थित विसावली. दुसऱ्या दिवशी सक्काळ-सकाळी चहा पिताना मी मुकुंदना विचारलं, “बोटीबरोबर काल ते भालदार चोपदार कोण होते ?”
ही असं काहीच्या काहीच का विचारतेय असा भाव असलेल्या चेहऱ्याने ह्यांनी विचारलंच, *भालदार चोपदार ?*
मी म्हटलं, “अहो काल शिप पोर्ट मध्ये येताना तिला दोन्ही बाजूला दोन लहान बोटी बांधल्या होत्या ना, त्या !”
मुकुंद म्हणाले, “ते होय, त्या छोट्या बोटीना टग्ज – tugs – म्हणतात. एकापरीने मोठ्या शिपचे ते भालदार चोपदारच असतात.”
Maneuvering
मोकळ्या समुद्रातून जहाज बंदरात आणणे हे एक्सप्रेस वे वर वेगात मोकळेपणाने धावणाऱ्या कारला मार्केटमध्ये आणून गर्दीतून एखाद्या विशिष्ट दुकानासमोर नेऊन उभं करण्यासारखंच असतं.
महाकाय जहाजाचं प्रचंड वस्तुमान – mass, त्याचा संवेग – momentum ही तसाच प्रचंड ! त्यामुळे एवढा मोठा कार्गो घेऊन ही भली मोठी शिप बंदरातल्या इतर बोटींच्या गर्दीतून, समुद्रातल्या अडथळ्यातून जेट्टीला आणून लावणं हे फार जोखमीचं काम असतं.
बंदरात शिरलं की एका विशिष्ट channel – मार्गानेच शिपला जेट्टी पर्यंत न्यावं लागतं. त्याचवेळी इतर शिप्स, लहान पडाव, बोटी उभ्या असतात किंवा येत जात असतात. इथेही रहदारी सुरूच असते.

रस्त्यावर वाहनांना सूचना देण्यासाठी फलक असतात : धोक्याचे वळण, अपघात प्रवण क्षेत्र इत्यादी…
अशा प्रकारच्या सूचना जहाजांना देण्यासाठी port limits मध्ये मोठ्या गोल आकाराचे बॉय / बॉया – buoy जागोजागी अँकर करून उभे केलेले असतात.
शिप मोकळ्या समुद्रातून बंदरात आणणं आणि जेट्टी पर्यंत ती सुरक्षित घेऊन जाणं यासाठी वाटाड्या म्हणून किनाऱ्यावरून तज्ञ पायलट तर येतोच.
शिप एका सरळ रेषेतच पुढे जात असते. तिला डावी उजवीकडे वळायचे असेल तर खूप सावकाश वळवावे लागते. कारचं स्टिअरिंग वळवलं आणि झटक्यात कारने दिशा बदलली इतकं सोपं नसतं ते !
बंदरात जेट्टीला शिप समांतर आणावी लागते. कल्पना कर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या शिपला खेचत दक्षिणोत्तर दिशेत समांतर उभी करायची आहे ! त्यासाठी या झोनमध्ये तिच्या मागच्या आणि पुढच्या भागांना दोन टग्ज बांधले जातात. तेच हे तुझे भालदार चोपदार !
ते शिपला खेचत आणतात आणि सफाईदारपणे हळूच जेट्टीला समांतर आणून लावतात. जवळ येताच जहाजावरून किनाऱ्याकडे रोप्स फेकले जातात. ते बोलार्डना घट्ट बांधले की जहाज स्थिर होतं. मग टग्ज निघून जातात.
जहाजाच्या या सर्व हालचाली इंजिनरूम मधली इंजिन्स करत असतात. आम्हाला इंजिन रूम मधून बाहेरचं काहीच दिसत नसतं. पण ब्रिज वरून दिशा आणि वेग बदल यासाठी येणाऱ्या प्रत्येक सूचनेनुसार काटेकोरपणे आम्ही जहाज चालवत असतो.

कल्पना कर एवढ्या प्रचंड जहाजाचा एक हलकासा सुद्धा धक्का जर इतर कशाला लागला तर काय होईल ! तसंच जेट्टीला जहाज धडकलं तर शिपसाईडला मोठा पोचा येऊ शकतो. जेट्टीचं नुकसान होईल ते वेगळंच.
हे काम अतिशय जोखमीचं आणि कौशल्याचं असतं. म्हणूनच बंदराच्या दरबारात या राणीसरकारांसाठी हे भालदार चोपदार नेमावे लागतात. बंदरात शिरण्याच्या वा बाहेर पडण्याच्या या कार्यक्रमाला maneuvering म्हणतात.
तर अशा तऱ्हेने, त्या सकाळी, maneuvering चा माझा एक छोटा कोर्स पूर्ण झाला. Marine engineer ची बायको होते ना मी !
तुतीकोरीन जेट्टीवर
१९७९- ८० चे ते दिवस !
तुतीकोरीन मध्ये all weather port – बांधण्याचे काम सुरू होतं. म्हणजे कोणत्याही ऋतूत कोल घेऊन इथे जहाजं येऊ शकणार होती. तुतिकोरीन थर्मल पॉवर स्टेशनची वीजनिर्मितीची क्षमता वाढवण्यासाठी कोलची खूप गरज होती. त्यासाठीच ही खास कोलजेट्टी त्यावेळी नुकती आकाराला येत होती. पण अजुनी आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या नव्हत्या. त्यामुळे कोल unloading चं काम शिपवरील आठ क्रेन्स आणि किनाऱ्यावरून येणारे मजूर लोकच करायचे.

जेट्टीवर जरा दूर अंतरावर तट्ट्याची घरं उभारली होती. तिथे कोल उतरवणाऱ्या मजुरांसाठी उतरण्याची सोय करण्यात आली होती. हे काम करायला जास्त पुरुषच असायचे. थोड्याफार बायकाही असायच्या. त्यांची बारकी पोरं जेट्टीवर नाचत राहायची. त्या कोलच्या धुळीतून आणि वाहतुकीच्या ट्रकांच्या गर्दीतून त्यांना सांभाळणं दिव्यच असायचं. तो आरडाओरडा कुठे कुठे सुरू असायचा.
अनलोडींगचं काम सकाळी साडेआठ नावापासून संध्याकाळी साडेसात-आठ पर्यंत सतत सुरू असायचं. एका मागून एका हॅचचं unloading व्हायचं.अशा चार हॅचिस होत्या. मी पोर्टहोल मधून बघत राहायची.
एका वेळी जहाजाच्या चार क्रेन्स अखंड धडधडत होत्या. त्यांचे घर्र…घर्र… चीं… चीं असे आवाज आणि ओतल्या जाणाऱ्या कोलचा धडा… धडा आवाज यांनी वातावरण भरून जायचं. इथेही कोल वर पाण्याचे फवारे सतत मारले जात.

क्रेनला पुढे एक हातासारखा भाग आणि त्या हाताला शेवटी लोखंडाचे अवाढव्य राक्षसी पंजे म्हणजे ग्रॅब्ज होते. क्रेन सुरू झाली की हे ग्रॅब उघडायचे, हॅचच्या आतला कोल त्या दोन्ही पंजात उचलून घट्ट धरत. पंजे बंद होत. मग क्रेनने ग्रॅब वर उचलून, वळवून जेट्टीवरच्या ट्रक पर्यंत नेला जाई. ट्रक मध्ये तो उतरवून पंजे उघडले जात आणि कोलने ट्रक भरून जात असे.

हॅचिसच्या अगदी कोपऱ्यात ग्रॅब पोचू शकायचा नाही. मग मजूर लोक या कोपऱ्या कोपऱ्यातला कोल मोठ्या पोत्यांच्यात भरायचं काम करत. डोकं, नाक, तोंड फडक्यानं पूर्ण झाकलेलं. हातात घमेली फावडी घेऊन ही मंडळी दिवसभर त्या रखरखत्या उन्हात आणि कोलच्या धुळीत अखंड काम करत असायची.
तट्ट्यांच्या घरात त्यांच्यासाठी चहा पाणी आणि दुपारच्या जेवणाच्या वेळेला भल्या थोरल्या पातेल्यातून शिजवला जाणारा भात आणि रटरटून शिजणारं सांबार, उकडलेली अंडी या जेवणाची सोय केलेली असायची. त्या कोलच्या धुळीत, गर्मीत आणि आवाजात काम करणं ही सोपी गोष्ट नव्हती.
त्या मजुरांचे कष्टमय जीवन, कोलच्या धुळीतून त्यांना होणारे आजार आणि त्यातून लवकर संपणारी आयुष्यं याचीही जहाजावर चर्चा व्हायची. खूप वाईट वाटायचं !
तुतीकोरीन गावात
संध्याकाळी सर्वजण कधी एकदा गावात जातोय याची वाट बघत होते. फक्त ड्युटी ऑफिसर्स आणि ड्युटीवरचा क्रू जहाजावर ! बाकी सगळे गावात निघाले. सायकल रिक्षाने गावात पोहोचलो. जायला यायला तेच सोयीस्कर वाहन होतं.
गावात पोहोचलो आणि काय….
एक स्वच्छ, टुमदार शहर पाहून खूप आनंद झाला. लहान मोठ्या बिल्डिंग, छोटी मोठी घरं, ऑफिसिस, कामावरून परतणाऱ्या मंडळींची, वाहनांची धावपळ सारं सुरू होतं.
आधी फोन बूथ वर जाऊन घरी फोन केला. दादा वहिनी वृंदाशी बोललो. फार छान वाटलं. टूथपेस्ट वगैरे किरकोळ वस्तू दुकानातून घेतल्या. खास मिक्स कैरी पिकल आणि दह्यातल्या तळणीच्या मिरच्या पण घेतल्या.
मग मुकुंद मला साडीच्या दुकानात घेऊन गेले. एक मस्तपैकी सिल्कची साडी माझ्यासाठी घेतली. ऑफ व्हाईट कलर, निळ आणि ब्राऊन डिझाईन असलेली. कारण म्हणजे दोन डिसेंबरला येणारा माझा वाढदिवस ! लग्नानंतरचा पहिला वाढदिवस !
मग जवळच्या हॉटेलमध्ये गेलो. इडली डोसा सांबार यांच्या घमघमणाऱ्या वासांनी स्वतःला आवरणं अशक्यंच होतं ! स्वच्छ सारवलेल्या अंगणात रांगोळी घातलेली आणि हॉटेलचं दार केळीच्या खांबांनी, नारळाच्या कोवळ्या झावळ्यांनी सजवलेलं.
आत गेलो तर जहाजावरची बरीच मंडळी तिथेच आलेली. केळीच्या हिरव्यागार पानावर गरमागरम इडली डोसे, उकळतं सांबार आणि चटकदार चटणी खाऊन झाली. छोटं चपटं पितळी पातेलं आणि त्यात उभा पेला, त्यात खमंग सुगंधाची खास दक्षिणात्य काssssपी… कॉफी ! अनेक दिवसांचा उपवास सुटल्यासारख झालं. जीव तृप्त झाला.
आज जहाजावर जेवायला फक्त बिचारे ड्युटी ऑफिसर्स होते. त्यांची मित्रमंडळी त्यांच्यासाठी पार्सल पण बांधून घेत होती. या मुक्कामात जहाजावरती फक्त दुपारीच जेवलो.
तुतीकोरिनहून दक्षिणेची अनेक प्रसिद्ध देवस्थानं जवळ होती. एक किंवा दोन दिवसात जाऊन येता येण्यासारखं होतं. त्याची पुस्तकं, नकाशे दुकानातून घेतले. त्यावेळी मिस्टर मचॅडो म्हणून कंपनीचे एजंट होते.ते तुतीकोरीनमधील एक मोठीच आसामी होते. त्यांनी ट्रॅव्हल एजंट वगैरेची माहिती दिली.
Unloading पूर्ण झालं आणि हल्दियाच्या दिशेने शिपचा प्रवास सुरू झाला. या प्रवासातंच दोन डिसेंबर आला. माझा वाढदिवस ! काय करावं विचार करायला लागलो. पार्टी-बिर्टी करणं आम्हा दोघांनाही नको वाटत होतं. मग सर्वांसाठी मी साखरभात करायचा ठरवला. आदल्या दिवशी चीफ कुकला सांगून ठेवलं. त्यानं सगळी तयारी करून ठेवली होती. मग मी गॅलीत जाऊन कुक्सच्या मदतीने साखर भात केला. काजू, बदाम, बेदाणे, केशर, वेलची घातलेला साखरभात मस्त जमला ! सर्वांनी आवर्जून सांगितलं, आपने बनाया हुआ वो स्वीट-राईस बहुत ही बढीया है. मॅडम आज कुछ त्यौहार है क्या ?
मी म्हटलं, बस यूं ही ! लगा की सबके लिये कुछ बनाऊॅं, इसलिये |
वाढदिवस साजरा करायला केबिनमध्ये आम्ही दोघं आणि हरी ! आणि अर्थातच बरोबर होत्या घराच्या सगळ्यांच्या आठवणी !
पण कारवालोला समजलं. तो खाली स्टोअर मधून गुपचूप एक छोटा केक आणि मेणबत्ती घेऊन आला. त्याने खूप मनापासून शुभेच्छा दिल्या. डोळे भरून आले माझे. केक कापून वाढदिवस साजरा झाला.
हल्दियात पोहोचलो. समुद्र बराच शांत होता. बरं झालं बाई, मुंबईहून येताना थोडे साडीचे फॉल आणले होते. नव्या घेतलेल्या साडीला फॉल लावणे हा एक छान उद्योग मिळाला.
क्रमशः

— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
