“नेहा दराडे“
गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये, पदरामध्ये दोन लेकरं टाकून तिच्या शेतकरी नवऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आणि नेहा ताईंच्या नशिबी 25 व्या वर्षी वैधव्य आले.
हे दुःख इतकं मोठं होतं की त्यांना आई-वडिलांकडे माहेरी यावं लागलं. एकुलत्या एक मुलीला, असे भोग भोगावे लागत आहे हे पहाणे म्हणजे आई-वडिलांचे काळीज पिळवटून टाकणारे होते .
पुरुष हार मानतात आणि आयुष्य संपवतात.परंतु स्त्री कधीही हार मानत नाही. परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी ती सदैव तत्पर असते. नेहाताईची गोष्ट आजच्या सर्व महिलांसाठी प्रेरणा देणारी आहे. नवरा गेल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये हार न मानता, आत्महत्या न करता, संकटाशी दोन हात करण्यासाठी त्या सज्ज झाल्या होत्या. मे महिन्याच्या कडक उन्हात, मराठवाड्याचा दौरा करत होतो, तेव्हा परभणी जिल्ह्यात एका छोट्या गावात दराडे कुटुंबातील दोन मुलं निवडायला गेलो.
मुले निवडणे म्हणजे स्नेहवन संस्थेमध्ये त्यांची पहिलीपासून पंधरावी पर्यंत संपूर्ण जबाबदारी आपण घेतो, परंतु ती घेण्याआधी त्याची सर्व परिस्थिती जाऊन पाहतो. त्याप्रमाणे दराडे ताईंच्या दोन्ही मुलांना स्नेहवनमध्ये प्रवेश दिले. तिथे एक मुलगी होती. एका आजीने सांगितले की या मुलीचा बापही आत्ताच गेला आहे. मुलगी इतकी गुणाची होती किती ना की ती मला गाडीत बसून पाच किलोमीटर वरती दुसऱ्या गावात तिच्या आईच्या भेटीला घेऊन गेली.
चार वर्षाचा एक छोटा गोलू, रुद्रा त्याच नाव, ज्याला माहितीही नव्हतं की सध्या घरात काय परिस्थिती चालू आहे, माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं.

नेहा ताईला आपल्या मदतीची खरंच गरज आहे हे आता कुणीही सांगायची गरज पडत नव्हती. नेहा ताईला भेटल्यानंतर मी म्हटलं की, “नेहाताई तुम्ही स्नेहवनमध्ये. चला आपण तुमचं पुढचं शिक्षण करू आणि मुलांनाही चांगलं सांभाळू, त्यांना चांगलं शिक्षण देऊ”.
नेहाताई आमच्यावर विश्वास ठेवून जून महिन्यात स्नेहवनमध्ये आल्या, त्यांना आपण दर महिन्याला मानधन देतो. रुद्रा आणि सायली दोघेही जण स्नेहवनमध्ये छान शिक्षण घेत आहेत. तिघेही आपल्या कुटुंबाचा भाग झाले आहेत.

दोन दिवसापूर्वी नेहाताईच्या आई त्यांना भेटायला स्नेहवन मध्ये आल्या होत्या. नातवंड आणि आपली लेक आनंदाने राहत आहेत हे पाहून त्यांना समाधान वाटलं. देवीच्या पहिल्या आरतीचा मान नेहा ताईंना दिला होता, तेव्हा दुर्गा मातेलाही या लेकीचा अभिमान वाटत असेल यात शंका नाही.
गावाच्या बाहेर पडलो तर लोक काय म्हणतील, समाजाच्या निंदेला, चालीरीतींना झिडकारून नेहाताई सारखी हिंमत आज प्रत्येक खेड्यातल्या स्त्रीने दाखवणे गरजेचे आहे.
नवरा दारू पितो, रोज मारतो, परंतु बाई गपगुमान ते सहन करते. नवरा गेल्यानंतर खेड्यामध्ये पुनर्विवाह करता येत नाही, पुढचं अख्खा आयुष्य विधवा म्हणून काढावे लागते.

बहिणींनो, गाव सोडून बाहेर पडायची हिम्मत जर तुम्ही आज दाखवली तर तुम्ही तुमचं आणि मुलांचं भविष्य उज्वल करू शकता.
आपल्या ओळखीत अशा एखाद्या बहिणीला, तिच्या लेकरांना मदतीची गरज असेल तर संपर्क करा.
पत्ता-
स्नेहवन संस्था,
कोयाळी फाटा, आळंदी वडगाव घेनंद रोड, पुणे.
संपर्क – 7875501502
स्नेहवन संस्थेच्या अधिक माहितीसाठी इंस्टाग्राम पेज वरती पहा. https://www.instagram.com/ashokempowers

— लेखन : अशोक देशमाने.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
