“डॉ प्रा .विजय पांढरीपांडे”
आजच्या “झेप” सदरात आपण वाचणार आहोत, डॉ प्रा .विजय पांढरीपांडे यांनी घेतलेली “झेप”!
विशेष म्हणजे सरांचे लेखन आपल्या पोर्टलवर नियमितपणे प्रसिद्ध असते.
सरांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
माझी एक भाची कॅनडा मध्ये आत्म्यासंबंधी शास्त्रातील डॉक्टर आहे…ती सारखी म्हणत असतेच की प्रत्येक आत्मा हा काहीतरी ध्येय घेऊन या धरतीवर येत असतो …त्याचा उद्देश्य पूर्ण करणे हेच फक्त कर्तव्य मानून कार्यरत असतो.
काही व्यक्ती इतक्या व्यग्र असतात, इतके कार्यरत असतात की सारखे मला तिचे वाक्य आठवते…हे कोणत्या ध्येयासाठी झपाटलेले आहेत…सतत आपल्या कर्तव्यपूर्ती मध्ये मशगूल..
असे लोक मला भारावून टाकतात..त्यांच्या अफाट कार्याने मी विस्मित होते, त्या प्रेरणास्पद व्यक्तीचा आयुष्यपट सर्व सामान्य माणसांसाठी खूप काही शिकविणारा एक वस्तुपाठच असतो.
माझ्या आयुष्यात, वाचनात असे बरेच आलेत आणि त्यांच्या या उत्तुंग झेप बद्दल काहीतरी लिहावे असे मला मनोमन वाटत राहते.. त्यांच्यापैकीच एक म्हणजे आजचे अतुलनीय व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ प्रा .विजय पांढरीपांडे हे होत. त्यांनी वसा घेतला होता……समर्थांच्या या ओवीचा
“ जे जे आपणासी ठावे।
ते ते इतरांसी सांगावे।
शहाणे करून सोडावे सकळ जन ।।”
शिक्षण क्षेत्रातील त्यांचे भव्य दिव्य कार्यच त्यांना मोठे करते.
मध्यप्रदेशातील छपरा नावाच्या एका लहानशा खेड्यात, मध्यमवर्गीय कुटुंबात प्रा . डॉ विजय पांढरीपांडे यांचा जन्म झाला. शिक्षणासाठी ते आजीच्या घरी नागपूर च्या इतवारी भागात राहायला होते.शाळेतच या मुलाची प्रतिभा सर्वांनाच जाणवली . गणित विषय आवडीचा ..लहान मुलं शाळा शाळा घरी खेळतात तसेच यांनी ही दारं, खिडक्यांवर खडूने काल्पनिक मुलांना गणितं शिकवायला सर्वात केली …तेथूनच जणू या “ उत्तम शिक्षकाची “ जडणघडण झाली…त्यांना शाळेतच वक्तृत्व,नाटक, कला , वादविवाद सगळ्यात प्रोत्साहन मिळाले ..आणि त्यासाठी त्यांना अजून ही आपल्या शाळेचा , तेथील शिक्षकांचा अभिमान वाटतो ..
हाच सर्वात मोठा फरक असतो .. ज्ञानी आणि शिक्षित यांच्यामधील…. ज्ञानी हा सतत स्वतः शिकण्यास तयार असतो…त्याला ज्याने घडवलं त्यांचे ऋण न विसरणारा असतो…फळभाराने झाड जसे वाकते तसाच ज्ञानी आपल्या गुणांनी नम्र होतो, त्याला घडविणाऱ्यापुढे सदैव नतमस्तक राहतो…हेच डॉ विजय यांचे वैशिष्ट्य..ते आपल्या पुस्तकात ही तसेच विदित करतात.
मागे एक तरल काव्य वाचनात आले होते…त्यात कवी म्हणतो..…दंव कसे पानावर येऊन स्थिरावतात, त्यांना विचारले तर ते सांगतात …आम्ही आकाशातून उतरताना आपापल्या मनाचे राजे असतो कुणाला वाऱ्याबरोबर उधळून जायचं असतं कुणाला मातीला कवटाळायचं असतं कुणाला नदी व्हायचं असतं पण जेव्हा एखाद्या पानावर येऊन विसावतो तेव्हा कळतं एकट्याने चमकण्यात फारसा अर्थ नसतो सोबत बसण्यात वेगळच सौंदर्य असतं ……
विजय सरांना हे बालपणीच कळले …एकट्याने चमकण्यात अर्थ नाही.. सर्वांनाच घेऊन चालावे…म्हणून ते शिक्षण क्षेत्रात आलेत , स्वतः चमकले पण आपल्या असंख्य विद्यार्थ्यांना दिशा दाखवत त्यांना ही स्वयं प्रकाशित केले. ते एक उत्कृष्ट लेखक आहेत …त्याची सुरुवात ही शाळेच्या मासिकापासूनच झालेली दिसते ..
सतत पहिला क्रमांक पटकावणे, बोर्डात मेरिट मध्ये येणे या त्यांच्या गुणांमुळे शिष्यवृत्ती तर मिळालीच पण नागपूरच्या प्रसिद्ध विश्वेश्वरय्या रिजनल कॉलेज मध्ये सहज दाखला मिळाला ..येथील चार वर्षे विज्ञान, तंत्रज्ञानाचा पाया भक्कम होण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरला असे ते नमूद करतात..येथेच त्यांना कसे शिकवावे किंवा कसे शिकवू नये.आणि कोणते विषय गरजेचे व का गरजेचे आहेत असेही जाणवले आणि दृष्टी विशाल झाली.
कोणत्याही मध्यम वर्गीय कुटुंबात होते तसेच त्यांच्याही घरात मुलगा बी ई झाला आता नोकरी करावी घरच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्यात असेच झाले ..पण सुरवातीस लिहिल्याप्रमाणे त्यांचे ध्येय एवढेच नव्हते…त्यांना पुढे शिकायचेच होते ..प्राविण्य मिळालेले असल्याने त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना आय आय टी खरगपूर येथे प्रवेश मिळाला.. एम टेक च्या प्रोफेसरांचा ते आवर्जून उल्लेख करतात ..प्रो.दास, प्रो सन्याल.
प्रो दास यांच्यामुळेच त्यांना त्रिवेंद्रम येथे इस्रोच्या केंद्रात काम करण्याची संधी मिळाली .. आणि यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी आपला पी एच डी प्रबंध पूर्ण केला
त्या काळचे प्रोफेसर्स नेमके हुशार, चुणचणीत मुलांना प्रोत्साहन देत आणि ते विद्यार्थीही त्यांची स्वतः च्या उतार वयातही आठवण ऋजुतेने काढतात हे उल्लेखनीय आहे.
आय आय टी मध्ये असतानाच त्यांनी अंडर ग्रज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट वर्गांना शिकविले ..नंतर उस्मानिया विद्यापीठात त्यांची प्रोफेसर म्हणून नियुक्ती अगदी तरुण वयातच झाली..खऱ्या सोन्याची झळाळी दिसतेचना ..कळतेही प्रत्येकाला.
मायक्रोवेव्ह हा त्यांचा संशोधनाचा विषय त्यासाठी ते प्रा दास, प्रा सन्याल यांचे ऋण मानतात. टी आय एफ आर चे बॉस डॉ कोडाली यांनी कसे समर्थन दिले ते ही आवर्जून नमूद करतात.
उस्मानिया विद्यापीठात मुलाखत न देताही वयाच्या ३४ व्या वर्षी प्राध्यापक म्हणून नेमणूक झालेली हा त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. या विद्यापीठात सलग तीन दशके (निवृत्ती नंतरही) प्राध्यापक म्हणून शिकविण्याचा रेकॉर्डच त्यांनी प्रस्थापित केला.हेच अशा लोकांकडून शिकण्यासारखे असते की आपण कोणामुळे यशाची क्षेत्रं पादाक्रांत करीत गेलो , कोणामुळे आपले आयुष्य घडत गेले हे सांगण्याचा प्रयत्न ते अधिक करतात.
उस्मानिया विद्यापीठात डॉ पांढरीपांडे यांनी मायक्रोवेव्ह साठी संशोधन प्रयोग शाळा उभारली ..ती महत्वपूर्ण , प्रभावी आणि उपयोगी ठरली .,
नागपूरच्या जेव्हा वी एन आय टी च्या डायरेक्टर पदी नेमणूक झाली तेव्हा देखील ते आर. ई सी या प्रिन्सिपॉल डॉ एम यू देशपांडे यांचा उल्लेख करून सांगतात.. असे विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करणारे , धडपडणारे शिक्षक मला खूप काही शिकवून जातात.
उस्मानियातील त्यांच्या विभागाचे नाव वरचढ ठरले कारण त्यांनी राबविलेले दोन प्रकल्प..दोन जागतिक बँकेच्या समन्वयाची जबाबदारी डॉ पांढरीपांडे सरांवरच होती.
त्यांना आंतरराष्ट्रीय परिषदेत निदेशक म्हणून इंग्लंडला जाण्याचा, जर्मनीला पेपर वाचण्यासाठी आणि पॅरिस ला जायचा योग आला त्यावेळी त्यांनी केलेले विदेशातील शिक्षण, धर्म, संस्कृती याचा तौलनिक अभ्यास त्यांनी आपल्या पुस्तकात विषद केलाय तो वाचकांना खूप माहिती देतो.
नाणे खणखणीत असेल तर ते वाजणारच …या उक्तीनुसार अशा व्यक्ती . आपल्या क्षेत्रात नेहमीच पुढे पुढे जातात आणि त्यांच्याकडून ते कार्य करून घेण्याची नियती त्यांना संधी देतच असते …आता सरांना लाभले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होण्याचे सन्माननीय पद..
सर्वांना बरोबर घेऊनच काम करण्याचे त्यांचे वेध ..त्यांचे कवी मन सांगते…
“नको हार,सत्कार झेले फुलांचे
मला हात द्या काम करण्यास तुमचे”
असे भावनिक आव्हान देणारा कुलपती आपणास लाभला याचा निश्चितच सहकार्यांना आनंद झाला आणि मी वर लिहिल्याप्रमाणे ते साऱ्यांनाच तेजस्वी करीत गेले.

मोठे पद म्हणजे काटेरी मुकुट …त्यात सध्या राजकारणाचा नको तेवढा हस्तक्षेप …त्यामुळे कधी कधी कठीण प्रसंगही आलेत पण तरीही न डगमगता ते गातात.
भीत नाही मी कामाला सूर्य माझा ध्यास आहे
संपला काळोख आता सूर्य माझा श्वास आहे
त्यांच्या या आशावादी वृत्तीमुळे जन संपर्क वाढला …मोकळा सुसंवाद होऊ लागला .. मराठवाड्यातील चार प्रमुख जिल्ह्यात पसरलेला हा शैक्षणिक विस्तार ..तेथे त्यांनी मुळापासून कायापालट सुरू केला आणि विद्यापीठाला उंचीवर आणण्यात ते यशस्वी ठरतात..
त्यांनी पक्षपाती भूमिका कधीच न घेतल्याने मनमोकळा सुसंवाद झाला.. गढूळलेले वातावरण स्वच्छ झाले
प्रथम विद्यार्थ्यांच्या हिताची क्रेडिट सिस्टम सुरू केली आणि अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली, कम्युनिकेशन्स स्किल्स ला प्राधान्य देणारे विषय सुरु केले. ग्रंथालयात बदल अशा अनेक क्रांतिकारक गोष्टी त्यांनी केल्यात आणि रेंगाळलेली प्रकरणं त्यांनी पूर्ण केली..
विद्यापीठात वर्षभरातील कार्यक्रमांमध्ये मोठमोठ्या शास्त्रज्ञ, गणितज्ञ ,भाषातज्ञ अशा अनेक लोकांना पाचारण केले मुलांना त्यामुळे खूप फायदा झाला .डॉक्टर नरेंद्र जाधव ,डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर अब्दुल कलाम .वगैरे

हैद्राबादला उस्मानिया विद्यापीठात असताना डॉक्टर कलाम यांच्याबरोबर दहा-बारा वर्षे त्यांनी काम केले असल्याने संरक्षण क्षेत्रातील प्रकल्पात त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि त्याच ओळखीने कलाम यांनी सर्व प्रोटोकॉल दूर सारून त्यांच्या घरी देखील भेट दिली.

विद्यापीठाचे एक्रीडेशन चांगले करण्यात , सर्वोच्च ए श्रेणी मिळविण्यात …त्यांच्या परिश्रमाला यश लाभले.त्यांनी दहा वर्षात जे झाले नाही ते त्यांनी करून दाखवले त्यामुळे राज्यपाल, मुख्यमंत्री पासून सर्वांनीच त्यांचे कौतुक केले.

इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग दिल्ली चे जीवन गौरव या सर्वोच्च पुरस्कारासह चार पुरस्कार त्यांना मिळालेत .. हाही एक रेकॉर्ड!
त्यांनी शिकवलेले विद्यार्थी उच्च विद्याविभूषित होऊन आता जगभरात पसरले आहेत पण बाहेर विदेशात राहूनही ते अजून आपल्या लाडक्या पांढरीपांडे गुरुजींना विसरलेले नाहीत…मध्यंतरी त्यांचीच एक विद्यार्थिनी येथे भारतात आली आणि तिने प्रयत्न करून ,आग्रह करून त्यांच्या उस्मानिया विद्यापीठातील प्रयोग शाळेला त्यांचे नाव दिले.. असे कार्य बघून कुठलाही शिक्षक किती आनंदी होत असेल हे सूज्ञास सांगणे न लगे..
त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत ..त्यांचे लेख निवृत्ती नंतर अजूनही दिवसागणिक वृत्तपत्रात येत असतात . त्यात त्यांची विद्यार्थ्याप्रती असलेली तळमळ, समाज भान .. नवीन पिढीसाठी असलेली आस्था, कळकळ दिसून येते …त्याचमुळे आदर्श शिक्षक पुरस्कार तर ठरलेलाच ..

त्यांच्या साहित्यावर आता पर्यंत मराठीत दोन विद्यार्थ्यांनी पी एच डी केली आहे हे विशेष… पी एच डी औरंगाबाद विद्यापीठ अन् गोंडवाना विद्यापीठात झाली आहे .यावर्षी मिळालेली पी एच डी त्यावरील प्रबंध , पुस्तक रूपात आले आहे .त्याचे छायाचित्र खाली दिले आहे.
सरांची बरीच पुस्तकं मी वाचली /ऐकली आहेत. त्यांची भाषा ओघवती आहे ..वाचकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यात आहे ..त्यांच्या पुस्तकांची यादी बघूनच आपल्यासारख्या सामान्यांना दडपण येते .त्याची एक छटा..
..
डॉ. विजय पांढरीपांडे यांचे प्रकाशित साहित्य …..
कादंबरी
१. अंधारातल्या सावल्या – दुसरी आवृत्ती
२. पत्रांजली – दुसरी आवृत्ती (यूट्यूब ऑडिओ)
३. आकाश माझ्या मुठीत आहे – दुसरी आवृत्ती
४. घे भरारी – दुसरी आवृत्ती
५. टोकियो टॉवरवरून – दुसरी आवृत्ती
६. १९९० – दुसरी आवृत्ती
७. देवाशपथ खरं सांगेन – दुसरी आवृत्ती (यूट्यूब ऑडिओ)
८. शर्यत – तिसरी आवृत्ती
९. नव्या शतकाच्या उंबरठ्यावर – दुसरी आवृत्ती
१०. सत्यमेव जयते
११. पडघमाचा चौथा अंक
१२. जंगल मंगल विद्यापीठ
१३. माफीनामा – यूट्यूब ऑडिओ
१४. समांतर
कथासंग्रह
१. पाऊलखुणा – दुसरी आवृत्ती
२. ऋतुरागिणी
३. शोध – दुसरी आवृत्ती
४. निळे पक्षी
५. अरे संसार संसार
६. गंधाली
७. आयुष्याचा अर्थ नवा
८. समस्या
९. मोरपंखी गजल
१०. आठवणींची गाणी
११. इथे फक्त स्वच्छ माल मिळेल
लेखसंग्रह
१. नाव नसलेले नाते
२. विचार बदलला आयुष्य बदलेल – तिसरी आवृत्ती
३. श्रीमंत व्हा
४. समाजभान आत्मभान
५. इथले तिथले दिवस मंतरलेले (आत्मकथन)
६. मुक्तछंद – कवितासंग्रह (विदर्भ लेखक संघ, पुरस्कार)
७. २६ @ ६५ – ललित
कष्टाचे कंकण ज्यांनी करी बांधियेले … त्यांना पुरस्कार किती मिळत असतील हे आपल्याला जाणवलेच असेल त्यांच्या पुरस्कारांची यादी इतकी मोठी आहे की ती पूर्ण देणे शक्य नाही त्यामुळे आपण त्यांचे निवडक पुरस्कार वाचूया
मिळालेले पुरस्कार, सन्मान
१. फेलो, ए.पी. अकॅडमी ऑफ सायन्सेस
२. फेलो, आय.ई.टी.ई., दिल्ली
३. बेस्ट टीचर अवॉर्ड, आंध्रप्रदेश सरकार
४. प्रो. के. श्रीनिवास मेमोरियल अवॉर्ड, आय.ई.टी.ई., दिल्ली
५. बेस्ट टीचर अवॉर्ड, इंजिनिअरिंग फॅकल्टी, उस्मानिया विद्यापीठ
६. सर विश्वेश्वरय्या अवॉर्ड, इंजिनिअरिंग फॅकल्टी, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, आंध्रप्रदेश सरकार
७. शिक्षा रत्न पुरस्कार, नवी दिल्ली
८. एस.बी.सी. आया मेमोरियल अवॉर्ड, आय.ई.टी.ई.
९. अन्ना युनिव्हर्सिटी नॅशनल अवॉर्ड, आय.एस.टी.ई., दिल्ली
१०. लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड – मुंबई
११. आचार्य अत्रे शिक्षण पुरस्कार, पुणे
१२. देवांग मेहता बिझनेस अवॉर्ड, मुंबई
१३. मौलाना आझाद शिक्षण पुरस्कार, दिल्ली
१४. नॅशनल एज्युकेशन लीडरशिप अवॉर्ड, इकॉनॉमिक टाइम्स
१५. रामलाल वाधवा गोल्ड मेडल, आय.ई.टी.ई., दिल्ली
१६. लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड, आय.ई.टी.ई., दिल्ली
१७. मेंबर, एक्सपर्ट, चेअरमन… यू.पी.एस.सी., डी.आर.डी.ओ., इस्रो, ए.आय.सी.टी.ई., डी.एस.टी., .भारत सरकार.
अशा या थोर सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

— लेखन : सौ स्वाती वर्तक. खार
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 986948480
