दसरा महोत्सव म्हटला की म्हैसूरचा दसरा देशात आणि परदेशात प्रसिद्ध आहे. तसा आमच्या हिंगोलीचा दसरा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. माझे बालपण हिंगोलीत गेलेले आहे. त्यामुळे दसरा महोत्सवाचे आकर्षण आणि त्याची अनेक संस्मरणे माझ्या लेखी आहेत. त्यातील काही संस्मरणे पुढे देत आहेत.
विदर्भ, मराठवाड्याच्या सीमेवर असलेले हिंगोली हे एक इतिहास प्रसिद्ध व्यापारी शहर म्हणून विख्यात आहे. या शहरातील थाटामाटात साजरा होणार्या दसरा महोत्सवास सुमारे पावणे दोनशे वर्षांची परंपरा आहे आणि हा दसरा महोत्सव महाराष्ट्रासह इतर प्रांतातूनही प्रसिद्ध आहे.
या दसरा महोत्सवाचे वैशिष्ट्य असे आहे की, इथे उत्तर भारतातून आलेल्या रामलीला मंडळीचे रामायण सादरीकरणाचे प्रयोग दहा दिवस चालतात. शेवटच्या दिवशी रावण, मेघनाद, त्राटिका यांचे केलेले पुतळे यांचे दहन केले जाते.
ही परंपरा खरे तर उत्तर भारतातली. ती हिंगोलीत उत्तर भारतातून आलेल्या विविध व्यापारी आणि व्यावसायिकांमुळे सुरू झाली. सुमारे पावणे 200 वर्षांपूर्वी खाकी बाबा नामक एक संन्याशी आणि त्यांचे शिष्य उत्तर भारतातून हिंगोलीत आले. कयाधू नदीकाठी असलेल्या जुन्या श्रीराम मंदिरात त्यांनी आश्रय घेतला. अत्यंत धष्टपुष्ट आणि तेजस्वी व्यक्तिमत्व लाभलेले हे सगळे लोक इसवीसन 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यातील उत्तर भारतातील क्रांतिकारक होते. ते इंग्रजांपासून लपण्यासाठी म्हणून हिंगोलीत आले ,असे त्यांच्याबद्दल बोलले जाई. अर्थात त्याबाबतचा पुरावा किंवा कागदपत्रे नाहीत. या खाकी बाबांनी हिंगोलीत उत्तर भारतातला दसरा महोत्सव आणला असावा.

या महोत्सवाचे आकर्षण अनेक संदर्भात आहे .दसरा महोत्सवात दहा दिवस हिंगोलीतील मैदानावर फार मोठी यात्रा भरते. त्या यात्रेत कृषी औद्योगिक प्रदर्शन भरविले जाते. करमणुकीची आनंदनगरीही भरविली जाते. लोकनाट्य सादर करणारी तमाशा पथके, जलसे, सर्कस इत्यादी करमणुकीची विविध मंडळीही येत असतात. शहरातील व्यापारी वर्गातर्फे स्टॉल्स लावले जाऊन लकी ड्रॉ द्वारे नशीबवान ग्राहकांना भरघोस बक्षीसे ही दिली जातात. त्यामुळे एकूण दहा दिवस हिंगोलीत फार मोठी आर्थिक, व्यापारी उलाढाल ही होते.

या दसरा महोत्सवाचे महत्त्व केवळ आर्थिक व व्यापारी उलाढाली पुरतेच नाही. तर या महोत्सवात विविध खेळांचे विशेषतः कबड्डी आणि हॉकी या खेळांचे सामने भरवले जातात. त्यामध्ये रेल्वे, पोलीस दल, अकोला नांदेड व परप्रांतातून आलेले कबड्डी व हॉकीचे संघ भाग घेत असतात. क्रीडाप्रेमींसाठी ही एक पर्वणीच असते. त्याचप्रमाणे भरघोस बक्षीसे देणारी कुस्तीचे मैदानही दसरा महोत्सवात आयोजित केले जाते. या कुस्ती सामन्याला हिंगोलीच्या हिंदी भाषिक संस्कृतीमध्ये दंगल असे म्हटले जाते. या दंगल मध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील आणि परराज्यातीलही अनेक नामवंत कुस्तीगीर सहभागी होतात. या कुस्तीगीरांची बलंदड शरीरे आणि त्यांचे कुस्ती कौशल्य पाहणे ही कुस्ती शौकिनांसाठी खरोखरच एक पर्वणी असते.

खेळांचे, कुस्तीचे सामने याच्या जोडीलाच बैलगाड्यांच्या शर्यतीचा शंकर पट ही आयोजित केलेला असतो. आणि त्याला देखील भरघोस बक्षिसे दिली जातात. शिवाय पशुप्रदर्शनाचेही आयोजन असते. थोडक्यात केवळ वाणिज्य दृष्टिकोनातूनच नव्हे तर कला, क्रीडा, संस्कृती अशा अनेक संदर्भात हिंगोली चा दसरा महोत्सव महत्त्वाचा आहे. दसरा महोत्सवाची इतकी दीर्घ परंपरा राज्यातील अन्य कुठल्याही शहराला नसावी. अर्थात अलीकडच्या काळात शेती नीट पिकेनाशी झाली. आणि शेतीतून येणारी खाली खुशाली ही रोडावली. यामुळे दसरा महोत्सवासाठी हिंगोलीच्या ग्रामीण पंचक्रोशीतून येणाऱ्या यात्रेकरूंचा ओढा काहीसा कमी झालेला आहे असे आढळते. परंतु उत्सवप्रेमी हिंगोलीकर आयोजकांद्वारे आणि हिंगोली नगर परिषदेद्वारे दसरा महोत्सवाची यात्रा व सर्व उपक्रमांचे उत्तम आयोजन केलेले असते.
उच्च शिक्षणासाठी आणि पुढे नोकरीसाठी हिंगोली सोडावे लागले तरी, दसरा आला की, हिंगोलीच्या दसर्याची हमखास आठवण होते, हे मात्र खरे !

— लेखन : सुधीर सेवेकर. छत्रपती संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
