येत्या रविवारी कोजागरी पौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने या पौर्णिमेच्या चांदण्यात न्हाऊन निघू या ! कोजागरी पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
— संपादक
‘चांदण.. चांदण.. झाली.. रात,….
भक्त आले हे अंबे तुझ्या दारात’….अंबामाता साठी नवरात्रीतील हे गाणं आपल्याला शरद ॠतूतील कोजागरी पौर्णिमेच्या टिपूर चांदण्याची रात येत आहे याची चाहूल देते.
‘चांदण्यान चादनं पीठभर चांदण’…हे गाणं आपल्याला गच्चीवर चांदण्यारात्री आप्तेष्ट मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा गोष्टी मनोरंजनात्मक वातावरणाची चाहूल देते.
‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’…..
हे गाणं नवयूगलांना, नवविवाहित जोडप्यातील प्रेमींना आपुलकीची, जिव्हाळाची चाहूल देते.
‘पूनवेचा चंद्रम आला घरी….’हे गाणं आपल्याला आजूबाजूला शांत सरोवरातील सभोवतीतील पाण्यात चंद्राच्या चांदण्यातील प्रतिबिंबात न्हाऊन निघत असल्याची चाहूल देते.
चांदणे शिंपीत जाशी…, चांदणे निळे टिपूर..,
चांद मातला मातला…,चांदोबा चांदोबा भागलास का…,
चंदाराणी चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी…,
चंद्र होता साक्षीला….,
चंद्र अर्धा राहिला…
अशी अनेक अनेक गाणी चंद्रावर,चांदण्यावर आहेत कारण चंद्र हा आपल्या जवळचा साक्षी, आपल्या मनावर,आपल्या भावनेवर राज्य करतो, सुख दुःखात तो आपला सखा आपल्या जवळपास असतो. चंद्र म्हटंल की पूर्ण चंद्र डोळ्यासमोर येतो आणि कोजागरी पौर्णिमाची आठवण करून देतो.

शरद ऋतुत चांदण्या रात्री सहकुटुंब, सहपरीवार, मित्रमंडळींबरोबर एकत्र राहणे मनोरंजनात्मक गाणी, नृत्य असे कार्यक्रम करणे एकमेकांना आनंद आदानप्रदान करत चंद्रकिरणे अंगावर घेत कोजागरी सण उत्सव साजरी करतात.
अश्विन महिन्याची पौर्णिमा ही ‘जागरणाची रात्र’ मानली जाते कारण देवी लक्ष्मी तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येते. देवी लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची हिंदू देवी आहे.
अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे “कोजागरी पौर्णिमा”. अश्विन महिन्यात नुकताच पावसाळा संपून गेल्याने आकाश निरभ्र झालेले असते. झाडाची पान, फुलं, स्वच्छ कोवळ्या उन्हात डुलत असतात. वातावरणात एक प्रकारचा उत्साह असतो. कारण या दिवसात चंद्र हा पृथ्वीच्या जवळपास येऊन पृथ्वी प्रकाशित करत असतो. चंद्राच्या आकर्षणाच्या प्रभावाने पृथ्वीवर समुद्राला भरती ओहटी असे परिणाम दिसतात. चंद्रकिरणांमध्ये आरोग्याचे अनेक गुणधर्म असतात.
‘भगवंत’ गीतेत म्हणतात ‘पूष्णामि चौषधी; सर्वा; सोमो भूत्वा रसात्मक;’ म्हणजे चंद्र होऊन मीच औषधी रसांचे पोषण करतो. चंद्राचे पृथ्वी पासूनचे अंतर संपूर्ण वर्षात कमी असण्याचा हा दिवस म्हणजे अश्विन शु. पौर्णिमा. सहाजिकच चंद्राचे आरोग्यमय औषधी गुणधर्म या दिवशी सर्वात जास्त प्रभावित होत असतात. त्यामुळे या दिवशी पौर्णिमेच्या रात्री चांदणे अंगावर घेऊन चंद्रकिरणात ठेवलेले चंद्राचे प्रतिबिंबित केलेले दूध प्राशन करण्याची प्रघात आहे. त्यामुळे आरोग्य उत्तम होते, यश, धन मिळण्याची शक्यता जास्त असते.
‘चंद्र’ हा मनाचा कारक मानला जातो. त्यामुळे मनात चांगले भाव आणून चंद्राची मनोभावे पूजा केल्याने मनात चांगले विचार येऊ लागतात. देहाच्या आरोग्यासाठी व मनाच्या आनंदासाठी योग्य दक्षता तसेच इतरांच्या सुखासाठी, कल्याणासाठी मुख्य म्हणजे जागृतपणे जगणे. आपल्या मनातील भाव जागेपणे ओळखणे, याचे भान असणे. खऱ्या अर्थाने तपासणे, म्हणजे ‘को..जागर्ति’.
पारंपारिक समजुतीनुसार कोजागरी पौर्णिमेच्या रात्री साक्षात देवी महालक्ष्मी पृथ्वीवर वास करते ‘को _जागर्ति? म्हणत प्रश्न विचारत सर्वत्र संचार करत असते.
को_जागर्ति म्हणजे कोण जागे आहेत, जे जागे आहेत त्यांना समृद्धीचे वरदान देते. जागे म्हणजे समाजात अवतीभोवती जी प्रवृत्ती दिसते त्यात आपण जागतेपणे, सावधानतेने जगतोय का ?
स्वतःला तपासण्याचा हा दिवस कारण शक्ती, भक्ती, दया, क्षमा, शांती अशी विविध रूपात देवी महालक्ष्मी भ्रांति रूपाने आपल्यात वास करत असते तीच माया कधी कधी आपल्याला भूरळ पाडते आणि आपण भूलतोय का ?
आपले अज्ञान, आपले विकार आपल्याला आडमार्गाला नेत प्रवृत्त करत असतात. या मोहमायेत आपण संकुचित, स्वार्थीपणे जगत आहोत का ? हे सावधपणे, सक्रियपणे भान ठेऊन मनाने व देहाने स्वतःला जागे ठेवणे हे मायेचे वैशिष्ट्य आपण विसरत तर नाही ना ? या दृष्टीने, या भावनेने जागृत असणे हे कोजागरीचे महत्व आहे.

कृषी संस्कृतीत कोजागरी पौर्णिमाला विशेष महत्त्व आहे. कोकणात ‘नवान्न पौर्णिमा’ साजरी करतात. नविन धान्याची पूजा करतात. महाराष्ट्र मध्ये ‘शरद पौर्णिमा’ तर गुजराथ मध्ये ‘शरद पूनम’ म्हणून साजरी करतात. हिमाचल प्रदेशात मोठी जत्रा भरते, हरियाणामध्ये ‘खीर’ करून रात्रभर चांदण्यात ठेवून सकाळी खातात. ओरिसात या पौर्णिमेला ‘कुमार पौर्णिमा’ म्हणतात. बंगालमध्ये या पौर्णिमेला ‘लोख्खी पुजा’ म्हणतात.
आपल्या महाराष्ट्रात या दिवशी दूध आटवून त्यात केशर, बदाम, पिस्ते, चारोळी, वेलदोडे,जायफळ, साखर वैगरे लक्ष्मीला नैवेद्य दाखवतात आणि मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे दुधावर पडून चंद्राचे प्रतिबिंब दुधात पाहून ते दूध सर्वजण आनंदाने प्राशन करतात. हा दिवस लहान बाळाला अन्नप्राशनाची सुरवात करण्यासाठी चांगला दिवस मानला जातो. कोजागरी पौर्णिमा हा सण सर्व आबालवृद्ध लोक आनंदाने साजरा करतात.

— लेखन : सौ. पूर्णिमा शेंडे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
