Homeसाहित्यकामगार साहित्य : देवेंद्र भुजबळ यांचे समग्र भाषण

कामगार साहित्य : देवेंद्र भुजबळ यांचे समग्र भाषण

मराठी साहित्य परिषदेच्या कल्याण शाखेच्या वतीने, आज कल्याण येथे आयोजित करण्यात आलेल्या कामगार साहित्य संमेलनात “कामगार  चळवळीत साहित्याचे योगदान” या विषयावर माझे  विचार व्यक्त करण्यासाठी मला संधी दिली, याबद्दल प्रारंभीच मी आयोजकांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना आजच्या  कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन “कामगार चळवळीतील साहित्याचे योगदान” या विषयावरील माझे विचार व्यक्त करतो.

साहित्य हे जगातील आणि आपल्या जगण्यातील सर्व बाबींना स्पर्श करीत असते. साहित्याचे जे काही विविध प्रकार आहेत, त्यातील एक मुख्य प्रकार म्हणजे कामगार साहित्य हा आहे. इथे आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, भारतात शतकानुशतके साहित्य निर्माण होत आलेले आहे. पण मुळात, ज्या अनेक बाबी पाश्चात्य देशांकडून भारतात आल्या, त्यापैकी औद्योगिक उत्पादन आणि ते करणारा कामगार घटक ही एक महत्वाची बाब आहे.

औद्योगिक क्रांती
औद्योगिक क्रांती ही १८व्या शतकाच्या उत्तरार्धात (सुमारे १७६० ते १८३०च्या काळात) प्रामुख्याने इंग्लंडमध्ये आणि नंतर युरोप, अमेरिका आणि जपानमध्ये प्रसार होत होत, तो जगभरात पसरत गेला. औद्योगिक क्रांती ही एक मोठी सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतराची चळवळ झाली. यामुळे पारंपरिक हाताने उत्पादन करण्याच्या पद्धती बदलून कारखान्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करण्यात आले.

प्रमुख वैशिष्ट्ये व शोध : –
** पहिली औद्योगिक क्रांती : प्रामुख्याने कोळसा, लोखंड आणि बाष्पयंत्राच्या वापरावर आधारित होती.
** महत्त्वाचे शोध :
• स्पिनिंग जेन्नी (१७६४ – जेम्स हारग्रीव्ज)
• बाष्पयंत्र (जेम्स वॅट)
• रेल्वे (जॉर्ज स्टीफन्सन)
** उत्पादन पद्धत : घरगुती/हस्तकला पद्धतीकडून कारखाना पद्धतीकडे स्थित्यंतर.

प्रमुख परिणाम : –
— आर्थिक बदल : भांडवलशाहीचा विकास आणि स्वस्त व भरघोस उत्पादनाची सुरुवात.
— शहरीकरण : कामगार नोकरीच्या शोधात  खेड्यांतून शहरांकडे स्थलांतरित झाले.
— सामाजिक प्रभाव : नवीन कामगार वर्गाचा उदय, कामगारांचे शोषण आणि साम्राज्यवादी विस्ताराला चालना.
— पर्यावरण : जल आणि वायू प्रदूषणात मोठी वाढ होत गेली.

कार्ल मार्क्स
कार्ल मार्क्स हे १९व्या शतकातील एक प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार आणि समाजसुधारक होते. त्यांना आधुनिक साम्यवादाचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म ५ मे १८१८ रोजी ट्रायर, जर्मनी येथे झाला. तर मृत्यू : १४ मार्च १८८३ रोजी लंडन, ब्रिटन येथे झाला.

प्रमुख विचार आणि तत्त्वज्ञान : मार्क्सच्या मते, मानव इतिहास हा कायमच वर्गसंघर्षाचा राहिला आहे. समाजात मुख्यत्वे दोन वर्ग असतात :
1) बुर्ज्वा : भांडवलदार किंवा उत्पादनाच्या साधनांची मालकी असणारा श्रीमंत वर्ग.
2) प्रोलिटेरियट : स्वतःचे श्रम विकणारा कामगार किंवा मजूर वर्ग.
** ऐतिहासिक भौतिकवाद : समाजाची रचना आणि इतिहासाची वाटचाल ही आर्थिक घटकांवर आणि उत्पादनाच्या पद्धतीवर अवलंबून असते, असा त्यांचा सिद्धांत होता.
** अतिरिक्त मूल्य : कामगारांच्या श्रमातून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त मूल्यावर भांडवलदार कसा नफा कमावतात आणि कामगारांचे शोषण कसे होते, याचे विश्लेषण त्यांनी केले. त्यांचे प्रमुख ग्रंथ म्हणजे, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो (समाजवादाचा जाहिरनामा) : १८४८ मध्ये कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एन्जेल्स यांनी हा ग्रंथ लिहिला. “जगातील सर्व कामकऱ्यांनो, एक व्हा !” हा प्रसिद्ध नारा यात दिला आहे.
** दास कॅपिटल : मार्क्सचा हा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ  मानला जातो. याचा पहिला खंड १८६७ मध्ये प्रकाशित झाला । यात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे सखोल शास्त्रीय विश्लेषण आहे.

भारतात कामगार साहित्याचा उदय
भारतात ‘कामगार साहित्याचा’ उदय प्रामुख्याने मुंबईच्या गिरणगावातून आणि कामगार चळवळीतून विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला. १८८४ मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिल्या कामगार संघटनेची स्थापना केली. पुढे १९२० मध्ये ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’ ची स्थापना झाल्यामुळे कामगार संघटित झाले.
** अनुभवातून अभिव्यक्ती : गिरणी कामगार, रेल्वे कामगार आणि इतर कष्टकरी रोजच्या जगण्याचा संघर्ष, मालकांची अरेरावी, संप, पोलीस लाठीमार आणि दारिद्र्य  अशा प्रकारचे  जीवन जगत होते. या जगण्याला आणि वेदनेला जेव्हा कामगारांनीच शब्दांत मांडायला सुरुवात केली, तेव्हा कामगार साहित्याचा जन्म झाला.

नारायण मेघाजी लोखंडे

नारायण सुर्वे यांचे योगदान : मराठी कामगार कवितेला व साहित्याला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम पद्मश्री नारायण सुर्वे यांनी केले. त्यांच्या कवितांमध्ये कामगाराचे वास्तव, त्याची हलाखीची परिस्थिती आणि जिद्द दिसते.
** दलित साहित्याचा प्रभाव : १९६० च्या दशकानंतर आलेल्या दलित साहित्याच्या प्रचंड चळवळीने शोषितांच्या आणि उपेक्षितांच्या लेखनाला बळ दिले. यातूनच पुढे बाबूराव बागूल, नामदेव ढसाळ आणि इतर साहित्यिकांच्या लेखनात कामगार वर्गाचे जीवन केंद्रस्थानी आले.

कामगार साहित्य संमेलन : कामगार साहित्याला अधिकृत व्यासपीठ मिळावे यासाठी १९९२ मध्ये पुण्यात पहिले अखिल भारतीय कामगार साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष नारायण सुर्वे हे होते. त्यानंतर नागपूर, नाशिक इत्यादी ठिकाणी अशी संमेलने झाली. आता  कामगार कल्याण  मंडळ अशी संमेलने आयोजित करीत असते.

कामगार चळवळीतील साहित्यिक योगदान
मराठी साहित्यात कामगार चळवळीचे साहित्यिक योगदान अत्यंत क्रांतिकारी आणि पायाभूत राहिले आहे. सुरुवातीला कारखान्यांमधील कष्टकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध सुरू झालेल्या या चळवळीने पुढे जाऊन मराठी साहित्याला ‘कामगार साहित्य’ नावाचा एक नवा प्रगतीशील प्रवाह दिला.

कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांनी ‘दीनबंधू’ हे वृत्तपत्र सुरू करून कामगारांच्या प्रश्नांना साहित्याच्या माध्यमातून पहिली वाचा फोडली. पुढे अनेक कामगार संघटनांनी ‘कामगार बिगुल’ सारख्या नियतकालिकांमधून वर्ग संघर्षाचा इतिहास आणि वैचारिक लेखन सातत्याने प्रसिद्ध केले. १९२८चा गिरणी संप (डांगे, मिराजकर, लाल बावटा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतंत्र मजूर पक्ष १९३६, ८ तासांचा दिवस व कामगार कायदे यामुळे कामगार साहित्याला बळ मिळत गेले.

कामगार चळवळीला गल्लीबोळांत आणि कारखान्यांच्या वेशीवर पोहोचवण्याचे काम प्रामुख्याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द. ना. गव्हाणकर यांनी केले

अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ‘जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव’ सारख्या डफावरील थापेने कामगारांमध्ये क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवले. त्यांनी लावण्या, पोवाडे, ‘चित्रा’, ‘फकिरा’ सारख्या कादंबऱ्यांमधून श्रमिकांचे जगणे मांडले.

शाहीर अमर शेख आणि शाहीर द. ना. गव्हाणकर यांनी लाल बावटा कलापथकाच्या माध्यमातून मुंबईतील गिरणी कामगारांना संघटित करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले.

मराठी कवितेला दिवाणखान्यातून बाहेर काढून थेट कारखान्याच्या आणि फुटपाथच्या धुरामध्ये आणण्याचे श्रेय कवी नारायण सुर्वे यांना जाते. त्यांच्या ‘ऐसा गा मी ब्रह्म’, ‘माझे विद्यापीठ’ आणि ‘सनद’ या कविता संग्रहांनी कामगारांमधील आत्मभान जागे केले. त्यांनी “मी कामगार आहे, मी तलवार आहे” अशी घोषणा देत कष्टकऱ्यांच्या श्रमाचा गौरव साहित्यात प्रस्थापित केला.

तर  बाबूराव बागूल, नामदेव ढसाळ, आणि प्रभाकर नारायण पाध्ये यांसारख्या लेखकांनी  कामगारांचे आणि दलितांचे  वास्तववादी चित्रण केले.

** सोलापूरच्या गिरणी कामगार चळवळीतून कवी कुंजविहारी आणि दत्ता हलसगीकर यांनीही  मराठी साहित्यात मोलाची भर घातली.

गाजलेली पुस्तके
कामगार चळवळ आणि श्रमिकांच्या जीवनावर आधारित काही गाजलेली पुस्तके म्हणजे अनिल पुंडलिक गोखले/अजित सावंत यांचे “कहाणी मुंबईच्या कामगार चळवळीची” ; या  पुस्तकात १८५३ ते २०१७ पर्यंतच्या मुंबईच्या कामगार चळवळीचा उदय आणि ऱ्हास याचा आढावा घेण्यात आला आहे. लेखक भानू काळे यांचे ‘कामगार संघटना : काही निरीक्षणे’,
नानासाहेब कोलेगे यांचे ‘कर्मतत्त्व’ ; प्रज्ञा जांभेकर यांचे ‘यांत्रिकाच्या सावल्या’ ; परेश मनोहर आणि संतोष शेंडकर संपादित ‘जीवनकोंडी’ आदी होत.
तर गाजलेल्या आत्मकथनांमध्ये  दया पवार यांचे ‘बलुतं’, लक्ष्मण गायकवाड यांचे ‘उचल्या’ ; प्र. ई. सोनकांबळे यांचे ‘आठवणींचे पक्षी’ ;
बाबुराव बागूल यांचे ‘जीवलगा’ ; नामदेव व्हटकर यांचे ‘माझा ईलका’ ; भास्कर चंदनशिव यांचे ‘जिवाचा आटापिटा’ ; डॉ किशोर शांताबाई काळे यांचे ‘कोल्हाट्याचं पोर’ ; द. ता. भोसले यांचे ‘गबाळ’ आदी होत.

असा हा कामगारांचा, कामगार साहित्याचा गौरवशाली इतिहास असला तरी आजची कामगार चळवळ आणि कामगार साहित्य याची सद्यस्थिती काय आहे ? ही विचार करायला लावणारी बाब आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments