शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. १५ वर्षातील सेवेतील त्यांची ही १४वी बदली आहे. नागपुरातून अवघ्या ७ महिन्यात त्यांची उचलबांगडी झाली आहे.
त्यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाली असून पुढील १४ दिवस घरूनच काम करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले होते. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले होते.
नवी नियुक्ती : तुकाराम मुंढे यांची आता मुंबईतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव बदली झाली आहे.
16 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या. तुकाराम मुंढे यांचीही बदली Click here to read
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्त म्हणून कडक निर्बंध आणल्याचे दिसत होते. मात्र यावरुनच महापौर आणि भाजप नेते संदीप जोशी यांच्याशी मुंढे यांचे तीव्र मतभेद पाहायला मिळाले. दरम्यान अनलॉक प्रक्रियेत नागपुरातील व्यापारी आणि व्यवसायिकांशीही त्यांचे चांगलेच वाजले होते. त्यामुळे अकारण परिस्थिती स्फोटक तर होणार नाही ना ? असे चित्र दिसत होते.
विशेष म्हणजे महापालिकेतील सत्ताधारी भाजप सोबत राज्यात सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्षाच्या नागपुरातील लोकप्रतिनिधींशीही त्यांचे टोकाचे वाद होते. मुंढे कुणालाच जुमानत नाहीत अशी सर्वसाधारण तक्रार होती. त्यातच महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी मुंढेंची काही मुद्द्यांवरून जोरदार वादावादी झाली आणि त्यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केल्यामुळे आज तातडीने ही बदली करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली. तुकाराम मुंढे यांचे सत्ताधारी भाजप व विरोधी पक्षातील काँग्रेसच्या नगरसेवकांसोबत चांगलेच खटके उडाले होते. नगरसेवकांना सोडून मुंढे सामान्य नागरिकांना वेळ देत होते पण लोकप्रतिनिधींना वेळ देत नसल्यामुळे महापालिकेतील वातावरण चांगलेच तापले होते. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले खरे, मात्र लोकप्रतिनिधींनी साथ न दिल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचा आकडा शहरात फोफावला.
तुकाराम मुंढे वर्षाच्या सुरुवातीला राज्याच्या एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून काम पाहत होते. जानेवारी महिन्यातच नागपूर महापालिका आयुक्त म्हणून त्यांची बदली झाली होती. त्यानंतर अवघ्या सात महिन्यात त्यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. त्यांच्या जागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
– विशेष प्रतिनिधी : अविनाश पाठक