खूप वर्षांपासून माझ्या मनात कैलास मानस सरोवर यात्रा करण्याची इच्छा आहे. पण असलेलं भौगोलिक अंतर , लागणारा वेळ, करावयाच्या विविध प्रकारच्या फॉर्मालिटीज अशा एक ना अनेक कारणांमुळे ते काही अजून शक्य झालेले नाही. पण इच्छा मात्र आहे. माझ्याप्रमाणेच अनेकांची अशी भावना असू शकते. अशा अनेकांनी वाचलंच पाहिजे, असं एक पुस्तक नुकतंच माझ्या वाचनात आलं. या पुस्तकाचं नाव आहे, ” तुज वीण शंभो l मज कोण तारी ll ” आणि लेखक आहेत श्रीयुत एन डी कुलकर्णी.
रुढार्थाने ते काही लेखक नाहीत. म्हणूनच त्यांनी त्यांच्या मनोगतात स्वतःला संकलक तथा प्रकटक असे म्हटलं आहे. यावरून त्यांचा प्रांजळपणा दिसून येतो .
श्री कुलकर्णी हे शिक्षणाने आणि व्यवसायाने इंजिनिअर आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात व पुढे अहमदनगर महानगरपालिकेत त्यांनी शहर अभियंता या उच्च पदावर काम केले आहे. अहमदनगर शहरातील अत्यन्त महत्वाकांक्षी प्रकल्पांची आखणी, नियोजन आणि प्रत्यक्ष उभारणीत त्यांचा अत्यन्त महत्वाचा सहभाग राहिला आहे. खरं म्हणजे , श्री कुलकर्णी यांना २००४ पासून कैलास पर्वत आणि मानस सरोवराच्या दर्शनाची आस लागली होती. पण त्यांची ही इच्छा पूर्ण होण्यासाठी १५ वर्षे जावी लागली. शेवटी २०१९मध्ये त्यांची ही इच्छा फलद्रुप झाली .
कैलास मानस सरोवर हे तिबेट,म्हणजे चीन या देशात असल्यामुळे तिथे जायचं असेल तर मुळात आपल्याकडे पासपोर्ट असावा लागतो. लेखकाकडे पासपोर्ट सुद्धा नव्हता. त्यामुळे पासपोर्ट काढण्यापासून व्हिसा काढणे,विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या , कुटुंबाचे प्रोत्साहन, स्वतःचे मनोबल, सरकारी यंत्रणा आणि खाजगी संस्थांच्या माध्यमातून आपण गेलो तर पडणारा फरक अशा विविध बाबी श्री कुलकर्णी यांनी पुस्तकात नमूद केल्या आहेत. या यात्रेचा कालावधी जवळपास २१ दिवसांचा असतो. लेखकाने ही यात्रा २८ जून ते १८ जुलै २०१९ या कालावधीत पूर्ण केली. दुर्गम व अवघड असणाऱ्या या यात्रेची सुरुवात दिल्लीहुन होते.
Click here जयंती विशेष : पाश्चात्य नवनाट्यतंत्राचे पुरस्कर्ते संगीतसूर्य केशवराव भोसले
पुढे लिपुलेख पास मार्गे जावं लागतं. या यात्रेत आलेले अनुभव, पाहिलेले निसर्ग सौंदर्य,तिथे पोहोचल्यावर आलेली दिव्य अनुभूती या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हे पुस्तकच वाचलं पाहिजे.पुस्तकात सहजपणे दिलेले विविध संदर्भ , साधी सोपी भाषा शैली,विविध धार्मिक उतारे , संत साहित्यातील वचनं,आकर्षक छायाचित्रे यामुळे कैलास मानस सरोवरला जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींबरोबरच धार्मिक आणि पद भ्रमणाची,प्रवासाची आवड असणाऱयांसाठीही हे पुस्तक उपयुक्त आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अहमदनगर शाखेचे अध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के यांची अभ्यासपुर्ण प्रस्तावना पुस्तकास लाभली आहे.
श्री कुलकर्णी यांच्याहातून यापुढेही सतत लेखन होत राहो,या मनःपूर्वक शुभेच्छा.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800.
Very nice and informative