Wednesday, April 23, 2025
Homeयशकथाअनुकरणीय भीमराव पांचाळे

अनुकरणीय भीमराव पांचाळे

गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा उद्या, ३० मार्च रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या विषयी औपचारिकपणे लिहिण्यापूर्वी, त्यांच्यावर मी ३० वर्षांपूर्वी लिहिलेला आणि मुंबईतून त्यावेळी प्रसिद्ध होणाऱ्या “आज दिनांक” या सायंदैनिकात प्रसिद्ध झालेला “भीमराव : एक गोड माणूस” हा लेख आधी वाचू या. पुढे भीमराव यांच्या वर निघालेल्या गौरव ग्रंथात दिला देखील समाविष्ट करण्यात आला आहे. आजची एकंदरीत सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली तर त्यावेळी लिहिलेला लेख हा आजच्या परिस्थितीला किती चपखलपणे लागू पडतो हे आपल्याला कळेल.

पुढील अद्ययावत लेख देवेंद्र भुजबळ यांच्या लवकरच प्रसिद्ध होणार असलेल्या माध्यम भूषण या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे.

भीमरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

“भीमराव : एक गोड माणूस”

“भीमराव पांचाळे यांची आणि माझी पहिली भेट झाली, त्यावेळी मी दूरदर्शन केंद्रात निर्माते श्री सुधीर पाटणकर यांच्याबरोबर काम करीत होतो. तेव्हा आम्ही “सुगम संगीत” हा कार्यक्रम करत असू. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भीमरावांची
आणि माझी पहिल्यांदा भेट झाली आणि प्रथम भेटीतच आमचे सूर जमले, ते आजतागायत. मला आलेला हा अनुभव भीमरावांना भेटणाऱ्या प्रत्येकाचा असावा.

असे काय वैशिष्ट्य आहे भीमरावांमध्ये, जे दुसऱ्याना आपलेसे करून टाकते ? याचा जेव्हा मी विचार करू लागतो, तेव्हा हा थोर, कलाकार, माणूस म्हणून खरोखरच किती मोठा आहे, हे जाणवते.

वस्तुतः गायन काय, लेखन काय, किंवा इतर कुठलाही कला प्रकार साध्य करण्यासाठी लागणारे गुण, कला ही निसर्गदत्त असावी लागते. माणसाच्या परिश्रमामुळे नैसर्गिक गुणांना एक आकार, वळण लागण्यास निश्चितच हातभार लागतो. पण निसर्गाची देणगीच नसेल तर केवळ परिश्रमाच्या जोरावर कुणी काही बनू शकतो, असे निदान मला तरी वाटत नाही. पण आपल्याला मिळालेली ही देणगी निसर्गाची असून, आपण केवळ एक वाहक आहोत. निसर्गाने जे काही आपल्याला दिले आहे, ते इतरांना देण्यासाठी, त्यांचं जीवन आनंदित, सुसह्य करण्यासाठी आहे, अशी एक विनम्रतेची, विनयशीलतेची भीमरावांची भावना आहे. आपण जे काही झालो आहोत, त्याचा अजिबात गर्व किंवा अहंकार न बाळगता मी ही तुमच्यासारखाच आहे, तुमच्यातलाच एक आहे असंच भीमराव नेहमी वागताना मी पाहिले आहेत.

आज आंतरराष्ट्रीय स्तरावर गझल गायक म्हणून भीमराव यांना नावलौकिक मिळाला आहे. त्यांच्या गझल गायनाविषयी किंवा एकंदरीतच संगीत शास्त्राविषयी लिहिण्याइतपत मी काही जाणकार नाही, याची मला जाणीव आहे. आणि त्यामुळे माझ्या मर्यादेत मी राहणेच उचित असल्याने त्यांच्या गझल गायनाविषयी, शैलीविषयी, योगदानाविषयी लिहिणार नाही. तो अधिकार इतर जाणकारांचा आहे. या विषयी ते लिहितही असतात, पुढेही लिहितील.

पण मी भीमरावांच्या केवळ गायनाच्या मोहिनीमुळे नव्हे तर त्यांच्या सहज सुंदर वागण्याच्या मोहिनीमुळे, मिश्किल स्वभावामुळे त्यांच्याकडे आकृष्ट झालो, हे नमूद केले पाहिजे. खरं म्हणजे, कलाकारांविषयी बरेच समज, गैरसमज, प्रवाद असतात. त्यांचे मूडस् आणि इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्याची भावना बऱ्याचदा त्यांच्या कळत, नकळत व्यक्त होत असते, जी ते आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये अंतर निर्माण करत असते. पण यशाची, कीर्तिची शिखरं पादाक्रांत करीत असतानाही आपले पाय जमिनीवरच राहू देणारे कलाकार फार दुर्मीळ आहेत हे खरे. खरे म्हणजे कलाकारच काय, पण इतरही तथाकथित यशस्वी झालेल्या वा साध्या बँकेत वा इतरत्रही कारकून वा किरकोळ जागेवर बसलेल्या व्यक्तीही इतरांशी ज्या तोऱ्यात, उद्धटपणे, मग्रुरीने वागतात, बोलतात, ती त्यांची अशी वागणूक सततच आपल्या सामाजिक सभ्यतेच्या आड येत असते. एकीकडे प्राचीन संस्कृतीचे गोडवे गायचे, तर दुसरीकडे इतरांबरोबर तुच्छतेचा व्यवहार करायचा हा एक दुटप्पीपणा आपल्याकडे बहुतेक क्षेत्रात आढळत असतो. पावलोपावली आपण ठेचाळत राहतो आणि म्हणूनच अशा या वातावरणात भीमरावांसारख्या व्यक्ती मला मोठ्या वाटू लागतात. केवळ परिचितांशी नव्हे तर, अपरिचितांशीही ते सहज स्नेहाने, आपुलकीने वागतात, बोलतात, इतरांचा एक माणूस म्हणून मान ठेवतात आणि खरोखरच एका अकृत्रिम धाग्याने त्याला जोडतात.

वस्तुतः प्रत्येक मोठा माणूस आपले ट्रेड ‘सिक्रेट’, सिक्रेट राहील याकडे सातत्याने लक्ष देतो आणि निदान स्वतः उमेदीत असताना तरी आपली कला इतरांना शिकवायच्या फंदात पडत नाही. पडलाच तर आपल्या करिअरच्या शेवटी पडतो, जेणेकरून निदान त्याला तरी कुणी स्पर्धक निर्माण होऊ नये म्हणून. पण भीमराव असे की त्यांनी कारकिर्दीच्या मध्यावरच गझल कार्यशाळा सुरू केल्या, जेणे करून गझल गायनात आणि लेखनात नवनवे लोक येत राहतील, त्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळेल, यासाठी त्यांनी गझल सागर प्रतिष्ठान स्थापन केले असून, त्या मार्फत ते विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करीत असतात, असे त्यांचे मोठेपण आहे.

भीमरावांविषयी अनेक आठवणी आहेत. त्या परत परत आठवण्यासारख्याच आहेत. त्यामुळे किती लिहू आणि किती नको असे जरी होत असले तरी कुठे तरी थांबणे भागच आहे. पण जाता जाता त्यांना एकच विनंती आहे की, गायनाविषयीच्या,
लेखनाविषयीच्या कार्यशाळा घेण्याबरोबरच त्यांनी समाजात वागण्याविषयीच्या कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत. आपल्या समाजाला आज अशा कार्यशाळांची फार फार आवश्यकता आहे.

तीस वर्षांपूर्वी लिहिलेला उपरोक्त लेख वाचल्यावर आता जाणून घेऊ या भीमरावांचे अलौकिक जीवन कार्य…..

मला भावलेले भीमराव, घरची कुठलीही अनुकूल पार्श्वभूमी नसताना केवळ आणि केवळ स्वतःच्या गुणांनी आज जिथे आहेत, तिथे येऊन पोहोचले आहेत. त्यांचा जन्म ३० मार्च, १९५१ रोजी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्‍यातील आष्टगाव येथे झाला. विशेष म्हणजे आजही त्यांनी आपल्या या गावाची नाळ तुटू दिलेली नाही.
वाणिज्य शाखेतील पदवी बरोबरच त्यांनी मराठी, हिंदी भाषा तसेच संगीतातील पदवी प्राप्त केली आहे. अमरावतीचे भय्यासाहेब देशपांडे आणि अकोल्याचे एकनाथपंत कुलकर्णी यांच्याकडे ते ९ वर्षे शास्त्रीय संगीत शिकले. दरम्यान त्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया च्या मुंबई शाखेत नोकरी लागल्याने ते मुंबईत आले. गझल गायनात स्थिर स्थावर होई पर्यंत ते ही नोकरी करीत होते. पुढे मात्र योग्य वेळ येताच त्यांनी नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या नोकरीने भीमराव यांना केवळ आर्थिक स्थैर्यच दिले नाही तर त्यांना गीता वहिनींच्या रूपाने मनपसंत जीवन साथी मिळाला आणि आमच्या सारख्या त्यांच्या मित्रांची चिंता दूर झाली ! आज या दोघांची लेक भाग्यश्री ही त्यांचा वारसा समर्थपणे चालवित आहे. इतकेच नाही तर तिने संगीत विषयात पीएचडी केली आहे.

साक्षात गझल सम्राट कविवर्य सुरेश भट यांनी ‘गज़लनवाज’ ही उपाधी देऊन गौरवलेलल्या भीमरावांनी त्यांचा गायनाचा प्रवास ५० वर्षांपासून अविरतपणे सुरू ठेवला आहे. मराठी गझलचा झेंडा त्यांनी केवळ महाराष्ट्रातच तर देशविदेशात पोहोचवला आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त मध्यप्रदेश, बिहार, ओरिसा, गुजरात, अंदमान निकोबार, गोवा, कर्नाटक, आंध्र, बंगाल, दिल्ली या राज्यांत त्यांच्या आकाशवाणी केंद्रांतर्फे मैफली व ध्वनिमुद्रण झाले आहे. दूरदर्शनसह अनेक खासगी वाहिन्यांवरूनही त्यांनी गझल प्रस्तुत केली आहे.

भारताबाहेर भीमरावांचे
१) फिलाडेल्फिया (अमेरिका) : बृहन्महाराष्ट्र मंडळ द्वैवार्षिक संमेलन (जुलै २००९),
२) दुबई / शारजा : महाराष्ट्र मंडळ व गल्फ मराठी बिझनेस फोरम (ऑक्टोबर २००९),
३) स्वित्झर्लंड (झुरीक) : आठवे युरोपीय मराठी संमेलन, झुरीक (जुलै २०१०),
४) कुवेत : महाराष्ट्र मंडळ, कुवेत वार्षिक संमेलन मैफल (जानेवारी २०११), अमेरिका २०२५ (दोन महिन्यात विविध ठिकाणी) कार्यक्रम झाले आहेत. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी गझलप्रेमी चाहत्यांचे अपार प्रेम मिळवले.

गझलनवाज भीमराव पांचाळे ख्याल, ठुमरी, भक्तिसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत, मराठी गझल, शास्त्रीय-उपशास्त्रीय सुगम संगीत असे विविध प्रकारचे गायन करीत आहे आहेत. आशयप्रधान गायकी म्हणजे संगीताला दुय्यम गाण्यावर भर देणे ही
त्यांची गाण्याची पद्धत आहे.

भीमरावांचे मराठी वर जितके प्रभुत्व आहे तितकेच प्रभुत्व उर्दू भाषेवर आहे. त्यामुळेच ते एकाच मंचावरून एकाच वेळी
मराठी आणि उर्दू गझल सारख्याच ताकदीने पेश करू शकतात.

भीमरावाना हिंदी व मराठी सुगम संगीतासाठी १९७५ पासून (अ श्रेणी) आकाशवाणी कलावंत म्हणून मान्यता मिळालेली आहे.

भीमरावांनी गायनाबरोबरच ‘मना सज्जना’, ‘पंख तुटलेले पक्षी’, ‘सखा माझा ज्ञानेश्वर’ या नाटकांचे, मर्मबंध ही दूरदर्शन मालिका, ‘झंझावात’, ‘प्रेमसाक्षी’ या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे.
त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आशा भोसले, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, उत्तरा केळकर, देवकी पंडित, कविता कृष्णमूर्ती, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे आदी आघाडीचे गायक गायले आहेत. दिग्दर्शक राजदत्त यांची साथ मोलाची साथ भीमरावांना लाभली आहे. या सोबतच पंधरा कॅसेट्स व सीडीज ची त्यांनी निर्मिती केली आहे. त्यातील काही गाजलेल्या कॅसेट्स व सीडीज म्हणजे एक जखम सुगंधी, शब्दसुरांची भावयात्रा, स्वप्न तारकांचे, गज़ल उसने छेडी, गज़ल गुंजन, भावनांची वादळे, तेजाब दुःखाचे या होत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पं. भीमराव पांचाळे यांच्या गझल गायकीवर राहुल भोरे यांना यांनी २०२० साली पी एचडी प्राप्त केली आहे.

सुरेश भटांनी लावलेले गझलेचे बीज उत्तरोत्तर फुलवण्यात, मजबूत करण्यात, ते विशाल, व्यापक करण्यात भीमराव यांचा सिंहाचा वाटा आहे. यासाठी भीमराव त्यांनी रीतसर ‘गझल सागर प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना केली आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत १०० च्या वर गझल कार्यशाळा घेतल्या आहेत. यापैकी ३० वर्षांपूर्वी नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच कार्यशाळेला मी उपस्थित राहिलो होतो. तर मुंबई, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, वाई अशा पाच ठिकाणी त्यांनी अखिल भारतीय मराठी गझल संमेलनांचे यशस्वी आयोजन केले आहे.

भीमरावांची आता पर्यंत कारखा, खावर, विदर्भाची मराठी ग़ज़ल, ग़ज़लिका, शब्द झाले सप्तरंगी, मनः स्पंदन, आंतरसल, ऋतु वेदनांचे, ग़ज़ल विश्व, स्पर्शाकुर (ब्रेल) ‘गजलियत’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘गझल सागर’ या त्रैमासिकाचे प्रकाशनही ते करीत असतात. गझल या विषयावर त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन केले आहे.
अशा विविध उपक्रमांतून त्यांनी देश विदेशात मराठी गझलेला लोकप्रिय करण्याचे काम केले आहे आणि अजूनही करीत आहेत.

महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात (२००८) भीमरावांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. आकाशवाणी, मुंबई कलावंत निवड मंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आदींचे ते सदस्य आहेत. मुंबई विद्यापीठातील संगीत विभागातील पदविका अभ्यासक्रमात ते गझलवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करतात. साहित्य अकादमी दिल्ली व गोवा कला अकादमी आयोजित (मार्च २००९) ‘पश्चिम क्षेत्रीय भाषाओं मे समकालीन गझल’ या चर्चासत्रात त्यांनी भाग घेतला आहे.

आपल्या गायनाच्या माध्यमातून सामाजिक ऋण फेडण्याचा भीमरावांचा नेहमीच प्रयत्न असतो. आंध्र प्रदेशातील वादळ ग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी कार्यक्रम केला आहे.विवेकानंद वाचनालय (अकोला), आदर्श विद्यार्थिगृह (अमरावती), लोक बिरादरी प्रकल्प (हेमलकसा), ग्रामीण शिक्षण मंडळ (चंद्रपूर), बहुजन संघर्ष (नागपूर), सत्यशोधक ज्ञानपीठ (धुळे), गजल सागर प्रतिष्ठान (मुंबई), वात्सल्य ट्रस्ट (नवी मुंबई), अस्मिता अपंग पुर्नवसन (बदलापूर), श्रमिक पत्रकार संघ (वर्धा), दीप प्रतिष्ठान (अमरावती), त्रैलोक्य बौद्धमहासंघ व सन्मित्र ट्रस्ट (मुंबई) आदी संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत.

भीमरावांना आजपर्यंत अनेक मान सन्मान,पुरस्कार मिळाले आहेत.सूरसिंगार मानचिन्ह (१९७७), गज़लनवाज उपाधी (१९८८), फुले-शाहू- आंबेडकर स्मृति पुरस्कार (१९९९), पोलिस आयुक्त व मोहल्ला एकता समितीचा सन्मान (१९९६), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (१९८८), स्वरगंगा राष्ट्रीय एकात्मता मंच सन्मान (१९९९), कलाब्रम्ह पुरस्कार (२००१), महाराष्ट्र शासनाचा सेतू माधवराव पगडी राज्य पुरस्कार (२००२), विदर्भरत्न पुरस्कार (२००३), दया पवार पुरस्कार (२००८), जागृती सांस्कृतिक प्रतिष्ठान, कराड येथे पाचव्या जागृती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवताना त्यांना ‘जागृती जीवन गौरव पुरस्कार’ (२०११), पुलोत्सव, रत्नागिरी या कार्यक्रमात २०११ चा ‘पुलं गौरव पुरस्कार’, महाराष्ट्र शासनाचा उपशास्त्रीय संगीत (गझल) या कलाक्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल २०१०-२०११ चा ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ असे हे काही पुरस्कार आहेत.

भीमरावांचे आता ‘गझल गुरुकुल’ उभारण्याचे स्वप्न आहे. त्यांच्या या स्वप्नपूर्तीसाठी आपण देखील यथाशक्ती हातभार लावू या.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी on चला, कास पठार पाहू या !
शितल अहेर on काही अ ल क
शितल अहेर on काही कविता