क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, असा ठराव विधानपरिषदेत सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. हा ठराव सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
हा ठराव मांडताना मंत्री श्री. जयकुमार रावळ यांनी ठाणे येथील तरुण कवी दीपक भिकन सोनवणे (कवीदिप) यांची कविता सभागृहात सादर केली. या कवितेत फुले दाम्पत्याच्या समाजसुधारणेसाठी केलेल्या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यात आला आहे.
कवी दीपक भिकणी सोनवणे यांची विधान परिषदेच्या सभागृहात सादर झालेली कविता पुढे देत आहे.
क्रांतीचा सूर्य तळपला
त्याने क्रांतीज्योत चेतवली
समाज सुधारला ऐसा की
मुलगी-मुलगी शिकू लागली
जातीपातीवर घातला घाव
सत्यशोधक समाज स्थापिला
पुनर्विवाहाची संकल्पना मांडून
वनवास विधवांचा संपवला
आल्या वाटेत अनेक अडचणी
तरीही करत राहिले प्रयत्न
सावित्रीबाई,ज्योतिबा फुले जोडी
खऱ्या अर्थाने आहेत भारतरत्न
— रचना : दिपक भिकन सोनवणे. कवीदिप, ठाणे
या निमित्ताने कवी, दिपक भिकन सोनवणे यांचा अल्प परिचय करून घेऊ या.
सोनवणे यांनी मुंबईच्या व्हीजेटीआय या प्रख्यात अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक (मेकॅनिकल) ही पदवी प्राप्त केली असून ते टाटा पॉवर कंपनीत कामाला आहेत.
सोनवणे यांची साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्रात कवी, लेखक, अभिनेता, सूत्रसंचालक, समालोचक, निवेदक, अभिवाचक, गायक, गीतकार आणि संगीतकार म्हणून ओळख आहे. त्यांच्या कविता आणि लेख अनेक दिवाळी अंकांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले आहेत.

सोनवणे यांचा पहिलाच कविता संग्रह “63 बेधडक” अल्पावधीतच महाराष्ट्रभर गाजत आहे. या कविता संग्रहाची पहिली आवृत्ती संपत आली असून दुसरी आवृत्ती लवकरंच येत आहे.
त्यांचे २ कथासंग्रह आणि २ कादंबऱ्या प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांनी स्वतः लिहून आणि संगीतबद्ध केलेली २०-२५ मराठी, अहिराणी आणि हिंदी गाणी यूट्यूब चॅनेलवर आहेत. तसेच, T-Series साठी इतर भाषेतील गाण्यांचे त्यांनी मराठीत अनुवाद केले आहेत.
सोनवणे यांनी काही मराठी मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. सामाजिक संदेश देणाऱ्या स्वलिखित आणि स्वअभिनीत २०/२५ शॉर्ट फिल्म्सही त्यांनी तयार केल्या असून अनेक राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन तसेच क्रिकेट सामन्यांचे समालोचनही केले आहे.
सोनवणे यांची पुढील कामगिरीही कौतुकास्पद आहे :
१) पलपब प्रकाशन साहित्य परिवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत.
२) काव्यसंध्या कार्यक्रमांचे आयोजन आणि सूत्रसंचालन
३) पर्यावरण संवर्धन, गडकिल्ले संवर्धन, वृक्षारोपण, खाडी स्वच्छता, कांदळवन संरक्षण आणि सामाजिक जनजागृती उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग.
४) अंडर १६ ठाणे जिल्हा संघांचे प्रतिनिधित्व.
५) टाइम्स शिल्ड, कांगा लीग सारख्या प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धामध्ये टाटा संघांचे प्रतिनिधित्व
सोनवणे यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे. आपल्या पोर्टल चे नियमित वाचक श्री राजेंद्र गोसावी यांनी त्यांची ओळख करून दिल्याबद्दल गोसावी यांचे मनःपूर्वक आभार. आपल्या आपल्या पोर्टल साठी सोनवणे पुढेही लिहित राहतील अशी आशा आहे. त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800