Wednesday, April 23, 2025
Homeबातम्याएक दिलाने देश बलवान करू या - देवेंद्र भुजबळ

एक दिलाने देश बलवान करू या – देवेंद्र भुजबळ

भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. अनेक धर्म, प्रांत, भाषा, संस्कृती, इतिहास, समाज जीवन या बाबी कितीही वेगवेगळ्या असल्या तरी त्या कलहाचा विषय न ठरता, विविधतेतील एकता जपत आपण सर्व भारतीय म्हणून देशाला बलवान करू या आणि प्रगती साधू या, असे आवाहन माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांनी केले. ते रोटरी इंटरनॅशनल संस्थेच्या रोटरी क्लब नवी मुंबई सी साईडच्या वतीने देण्यात आलेल्या व्यावसायिक नैपुण्य पुरस्कार प्राप्त केल्यानंतर सत्काराला उत्तर देताना बोलत होते.

श्री भुजबळ पुढे म्हणाले की, भारतातील भाषा वैविध्य पाहून भारत सरकारने त्रिसूत्री भाषा धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे तसेच ज्या भागात आपण राहतो, त्या भागातील स्थानिक भाषा आत्मसात केल्यास त्या भागाचा इतिहास, भूगोल, साहित्य, संस्कृती, समाज मन आपण अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. त्यामुळे आपण आपल्या नोकरी, व्यवसायात सुद्धा अधिक प्रगती करु शकतो, ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांनी मराठी भाषा आत्मसात केली पाहिजे. सोबतच राष्ट्रीय स्तरावरील भाषा म्हणून हिंदी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाषा म्हणून इंग्रजी देखील आत्मसात केल्यास भाषेमुळे होणारे वाद विवाद न होता शांततेच्या मार्गाने सर्वच प्रगती साधू शकतील.

आज जागतिक पातळीवर अमेरिका आणि चीन या बलाढ्य देशांच्या आर्थिक परिस्थितीशी मुकाबला करीत भारताला महासत्ता व्हायचे आहे. पण भारत महासत्ता होण्यासाठी अंतर्गत कलहामुळे तो दुबळा होणार नाही याची प्रत्येक नागरिकाने काळजी घेतली पाहिजे, असे सांगून त्यांनी १२० वर्षांपूर्वी सर्व जगाच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या, जगातील सर्वात मोठ्या अशा रोटरी इंटरनॅशनल या स्वयंसेवी संस्थेचा पुरस्कार मिळाल्याने काम करायला अधिक हुरूप येईल असे सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना माजी मुंबई डिस्ट्रिक्ट गवर्नर बन्सी धुरंधर यांनी, व्यक्तींना प्रगती साधायची असेल तर त्यांनी आपली दृष्टी विशाल करण्याची गरज आहे असे सांगून रोटरी ची ध्येय धोरणे विषद केली. तसेच दर वर्षी कार्यकारिणी बदलण्याचे रोटरीचे धोरण असून सुद्धा रोटरी क्लब नवी मुंबई सी साईड गेली २२ वर्षे सातत्याने व्यावसायिक नैपुण्य पुरस्कार देत असल्याबद्दल अभिनंदन केले.

प्रारंभी रोटरी क्लब नवी मुंबई सीसाईड चे अध्यक्ष सुनील शाह यांनी सर्वांचे स्वागत करून क्लबच्या वाटचालीची माहिती दिली.

क्लबच्या व्यावसायिक सेवा विभागाचे संचालक तथा माजी अध्यक्ष कपिल अगरवाल यांनी हे पुरस्कार प्रदान करण्याबाबतची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, या पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्था नावे सुचवितात. त्यांच्या कडून आलेल्या नावे आलेल्या व्यक्तींच्या कार्याचे मूल्यमापन ५ सदस्यांची निवड समिती करते आणि त्या नंतर पुरस्कारांसाठी नावे अंतिम होतात.

सर्व पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांची माहिती असलेल्या विशेषांकाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या सुंदर, माहितीपूर्ण विशेषांकाचे संपादन युवा पत्रकार कुमारी संजना दाश हिने केले आहे.

या वेळी वैद्यकीय सेवेबद्दल डॉ फातिमा शेख, सेवा कार्याबद्दल, सौ क्रांती आणि श्री दिगंबर चापके दाम्पत्य, दृष्टी बाधित मुलांसाठी कार्य करणाऱ्या नेहा खरे, नृत्यांगना डॉ शर्मिष्ठा चटोपाध्याय, फुटबॉल खेळाडू कुमारी अनन्या तेरडाळें,

डिजिटल तज्ज्ञ राजीव राणा, चित्रकार सुरेश नायर, युवा टेनिस खेळाडू ऋषिकेश माने, भटक्या जनावरांच्या सुरक्षेसाठी कार्य करणारे डेटा इंजिनिअर अक्षय रिदलान, बाल टेनिस खेळाडू आरव छल्लानी, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील वंचित घटकांसाठीच्या आरोग्य सेवा कार्याबद्दल सुनीलकुमार प्रभाकरन यांनाही व्यावसायिक नैपुण्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी मनस्वी बलवटकर हिने प्रभावीपणे केले.

कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, रोटरीचे सदस्य, पुरस्कार विजेत्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. मनापासून अभिनंदन, देवेंद्र साहेब..! 🙏
    भावी वाटचालीसाठी गुरुकृपा संस्थेच्या सर्व सभासदांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा… !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी on चला, कास पठार पाहू या !
शितल अहेर on काही अ ल क
शितल अहेर on काही कविता