ती माझ्याशी कधी कट्टी घेते तर कधी बट्टी घेते,
पण आमची तर बाई गट्टी
तिच्या शिवाय मी राहु शकत तर नाहीच,
जगुही शकत नाही अशी माझी खास
प्रत्येक वयाची सखी बट्टी बट्टी करत गट्टी करते l१l
हो ना ती माझ्या कुशीत येते,
मग मी काहीही विचार न करता
लगेच तिच्या कुशीत जाते.
अगदी गाढ मैत्रीत, आम्ही आजूबाजूची दुनिया
विसरत एकमेकांमध्ये असतो.
माझी सखी बट्टी बट्टी करत गट्टी करते l२l
वय वर्ष दहा
ती मला खुशीत ठेवते
खरंतर मी जास्तच खुशीत असते
डोळ्यासमोर ती अशी उभी राहते,
ना खेळू देत ना अभ्यास करू देत
परीक्षा आली तर जिद्दीने बळे बळे येते
तिची माझ्या बरोबर कट्टी असते,
पण कट्टी घेऊन चालत नाही ना !
माझी सखी बट्टी बट्टी करत गट्टी करते l३l
वय वर्ष वीस
आता तर ती माझ्यावर एवढी खुश
एवढी खुश असते की, डोळ्यावरच नाही
तर अंगावरच येते बळे बळे
तिला दूर करते, हवी तर असते ती मला
पण या कामाच्या रामरगाड्यात,
तिला अगदी कुशीतशी घ्यावीशी वाटते,
पण नको. थोड्यावेळासाठी कट्टी घेऊ म्हणते,
पण शक्य नाही, सर्व सोडून मला जिद्दीने ये ये म्हणते.
नाईलाजाने कट्टी म्हणताना,
नकळतच मला थकली असशील म्हणून
ती मला कट्टी सोडायला लावत कुशीत घेते
*माझी सखी बट्टी बट्टी करत गट्टी करते* l४l
वय वर्ष तीस
आता जरा निवांत पणा आला तर
माझी सखी कधी कट्टी घेते तर कधी बट्टी घेते
पण न रागावता गुणी गुणी वागते
माझ्या तालात ती नाचते तिच्या तालात मी नाचते.
पण आमचं नात छान जमतं
खरंच किती तू शहाणी
अशीच मला दे हं सतत साथ म्हणत,
माझी सखी बट्टी बट्टी करत गट्टी करते l५l
वय वर्ष चाळीस
आता अगदी छान आरामात चाललंय
वेळेवर सगळं करून आटपून अग ये ग सखी
गप्पा मारत एकमेकांच्या कुशीत जाऊ
आता ना कुठली चिंता ना कुठली काळजी
अगदी खरं आयुष्य जगू, मनासारखे जगू
तू आलीस की, तुला मी लगेच कुशीत घेईन
जरा ही कट्टी नाही म्हणणार
कुठे कधी तुला दूर नाही लोटणार
मोठ्या मनाने तू मला नक्कीच
जवळ करणार खात्रीच आहे तुझ्याबद्दल…
माझी सखी बट्टी बट्टी करत गट्टी करते l६l
वय वर्ष पन्नास
अग अग सखी, कट्टी घेत कुठे चाललीस दूर दूर ?
माझी तर तू अगदी जीवलग सखी आहेस.
अग नको ना मला दूर लोटू
का ग माझ्याशी कट्टी ?
एवढ्या वर्षात तू माझ्याशी बट्टी बट्टी करत
गट्टी करत होतीस, मला आता तुझी खुप गरज आहे,
अगदी सगळं सगळं सोडून तू मला कुशीत घे
आळवणी करते, आराधना करते. विनंती करते.
का ग असं वागणं बरं दिसतं का…?
पण ती सखी …
कभी खुशी कभी गम करत बहुतेक कट्टी,
कधीतरी बट्टी करत माझ्याशी थोडीफार गट्टी करते.
माझी ती प्रिय सखी,
आता फार वाट बघायला लावते l७l
माझी खास सखी
माझी निद्रा …
ओळखलं का वय ?…
बरोबर…
साठीच्या पुढे….😊
— रचना : ✍️ पूर्णिमा शेंडे.
— संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खरंच वयानुसार कट्टी,बट्टी,गट्टी करत निद्रा सखी साथ देत असते.
खुपच छान कल्पना.
वय नि झोप असे प्रमाण गुणोत्तर वाचताना दिसून येते.
छान !
वयाचा जणू आलेखच कवितेत आहे.
अभिनंदन ताई
गोविंद पाटील जळगाव.