Saturday, June 14, 2025

कविता

१. सांज..

सांज केशरी जांभळी
नभ रंगात रंगले
ही रंगांची सरगम
ढग आसमंती न्हाले

असे रंगले आभाळ
वाजे समीराची धून
कुठे रुपेरी चमके
असे उतरते ऊन

काही कवडसे हाती
मीही धरते उन्हाचे
काही सोनकण हाती
गाती गूज आठवांचे

सांज सावळी होताना
जडे सावलीशी नाते
मीही सांज फुल होता
एक पाकळी गळते

२. झाड…

फांदी फांदीला धरून
फळांचे लाल घोस
लगडून
हलत राहतात वडाची फळे
दुपारी..
पक्षांची घरटी फुलून येतात
पारावर एखादा
वाटसरु थबकतोही
बाकी नीरव शांतता…

संध्याकाळ उमलताच
पाखरांची, किलबिल
माणसांचा जमाव
पाराला भारून टाकतात

रात्री..
अंधाराला कुशीत घेवून
हा वृक्ष पाखरांना जोजावत
उभा असतो.
कायम संन्यासी योग्या प्रमाणे
निरपेक्ष
अनेक युगांची
मुक्ती ची प्रतीक्षा करीत
हा उभा असतो..

३. लय….

मनाच्या तळ्यात
थोडी धग
हातातला चंद्र
निरखून बघ

थोडा नितळ
थोडी निळाई
मनातल्या तळ्यात
थोडी शितळाई.

मनातली धग
उन्हाची रग
डोळ्याच्या पाण्यात
सोडून जग

मनाच्या तळ्यात
पडेल कोवळे उन
श्रावण लयीत
सुख येईल उमलून

४. किनारा…

सांज  सावळ सावळी
जाता भेटते किनारी
रोज पूर्वेस घेऊन
तीची सुरू होते वारी.

निळ्या पाण्याची स्पंदने
उरी धरे हा किनारा
थोडी किरणाची जर
घेऊन भेटे हा  वारा

रान पाखरांची धून
येई झाडाच्या आडून
ऊन हलकेच येई
उंच डोंगरावरुन

इंद्रधनुचे  तोरण
निळे आकाश बांधते.
लाट सर सरूनिया
मग किनाऱ्याशी येते

५. पळस..

दूर डोंगरी पळस
आता लालीलाल झाला.
जणू केशराचा सडा
दूर डोंगरी पडला

लाल रंगाने माखला
उभा पळस देखणा
लाल डोंगराची माती
घेते साजरा उखाणा

लाल तांबडा सूरज
असे रोजच पाहुणा
निळ्या नभास रेखून
सुखवितो राज राणा

हाक मंद  समीराची
येई पळसा आडून
ऊन होई जाळीदार
येते पळस वेढून

नदीचे नितळ पाणी
त्याला अंगाईची धून
बिंब देखोनी पळस
जातो मनी मोहरुन

अनुपमा मुंजे

— रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. वाहवा.. निसर्गाच्या जवळ नेणाऱ्या या सर्वच कविता खूप छान. अशाच आनंददायी रचना करत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?
शितल अहेर on हे असं कां होतं ?
शितल अहेर on पु ल स्मरण
अदिती साळवी...दूरदर्शन.. on माध्यम भूषण डॉ. किरण चित्रे
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यम भूषण डॉ. किरण चित्रे
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on माध्यम भूषण डॉ. किरण चित्रे