आज आंतरराष्ट्रीय चहा दिन आहे. कवी उद्धव भयवाळ यांना आज सकाळीच चहा घेता घेता सुचलेली कविता
आपणही चहाचा घोट घेत घेत वाचू या ! ☺️ चहा दिनाच्या शुभेच्छा.
— संपादक
सकाळी ऊन अलगद दारी येतं,
चहाचं वाफाळतं हास्य मनात पेरतं.
गप्पांच्या मैफलींना रंग चहाचा चढतो,
नात्यांच्या धाग्यांना उबदार स्पर्श मिळतो.
कधी आलं, कधी वेलची, कधी साखरेची गोडी,
प्रत्येक घोटामध्ये असते आपुलकीही थोडी
पावसाच्या सरींमध्ये तो अधिकच खुलतो,
एकटेपणाच्या क्षणीही सोबतीस उभा राहतो.
म्हणूनच या चहाला आज सलाम करूया,
वाफाळत्या सुगंधात सारा शीण हरवूया.

— रचना : उद्धव भयवाळ. छ. संभाजीनगर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

मा. संपादक महोदय, नमस्कार.
प्रथम आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
ज्येष्ठ साहित्यिक श्री उद्धव भयवाळ यांनी पाठवलेला अमृतमय चहा मिळाला. अवीट अशी गोडी आहे. खूप सुंदर रचना आहे.
यानिमित्ताने एक आठवण शेअर करण्याचा मोह होतो आहे.
मी संभाजीनगर येथे असताना आम्ही दोघे आठवड्यात दोन तीन वेळा एका उडपी हॉटेलमध्ये भेटत असू. चहाच्या घोटासोबत गप्पांचा फड रंगत असे. कधीकधी दोन- तीन कप चहा, कधी भजी-चहा, कधी इडली चहा होत असे. कधी घरी चहाचे आधण ठेवताना दोघांपैकी एकाचा फोन येताच ‘चहा लवकर होऊ दे. चहा प्यायला जायचे आहे.’ असे सांगून उडपी हॉटेल गाठत असू. ‘चहा सम्राट’ ही पदवी दोघांनाही प्राप्त झाली होती.