Monday, February 17, 2025
Homeकलाजर्मन विश्व : ५

जर्मन विश्व : ५

“दिग्दर्शक विम वेंडर्स”

आज, ५ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०२५ पासून मुंबई येथील रिगल सिनेमा चित्रपट गृहात मध्ये थोर जर्मन चित्रपट दिग्दर्शक विम वेंडर्स यांचे १६ चित्रपट दाखविण्यात येणार आहे. हे चित्रपट दाखवून झाल्यावर विम वेंडर्स प्रेक्षकांशी समक्ष संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे हे चित्रपट विनाशुल्क असून “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश” या तत्त्वावर प्रेक्षकांना प्रवेश मिळणार आहे. निदान मुंबईतील चित्रपट रसिकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे वाटते.

या निमित्ताने आजच्या आपल्या या भागात थोडक्यात जर्मन चित्रपटांचा इतिहास आणि सविस्तरपणे विम वेंडर्स
यांचे कार्य, कर्तृत्व जाणून घेऊ या.
– संपादक

जर्मन चित्रपटांची सुरुवात १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. अगदी तेव्हापासूनच जर्मन चित्रपट आणि ते बनवणाऱ्या व्यक्तींनी जागतिक चित्रपट सृष्टीत आपली छाप उमटवली आहे. अमेरिकन चित्रपटांची पंढरी असलेल्या हॉलीवुड मध्ये देखील सुरुवातीला जर्मन व्यक्तींनीच खूप काम केले आहे असूनत्यांचे योगदान खूप मोठे आहे.

चित्रपट नेहमी तत्कालीन घटना, सामाजिक, भौगोलिक, ऐतिहासिक परिस्थिती व त्याचा मानवावर झालेला परिणाम यांवर आधारलेला असतो. १९२० ते १९३२ हा जर्मन चित्रपट क्षेत्रातील सुवर्णकाळ मानला जातो. याच काळामध्ये आत्ताच्या प्रगत चित्रपट क्षेत्राची पाळंमूळं दडलेली आहेत असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. सुरुवातीच्या म्हणजे १९२० च्या दरम्यान जर्मनी मध्ये मेट्रोपोलीस, नोस्फेरातू आणि दास कॅबिनेट देस, डॉ. कॅलिगरी असे मूकपट बनविल्या गेले. त्यानंतर १९२९ पासून बोलपट बनवायला सुरुवात झाली. प्रचंड गाजलेले तत्कालीन बोलपट म्हणजे देअर ब्लावं एंगेल, दि द्राय फॉन देर टांकस्टेलं, एम इ. त्या काळात जर्मन चित्रपटात वापरल्या गेलेल्या तांत्रिक बाबी उदा. ध्वनीसंयोजन, प्रकाश योजना, कथाकथन इ. नंतर हॉलिवूड मध्ये देखील वापरायला सुरुवात झाली. फासबिंडर, स्टर्नबर्ग, लांग, पीटरसन, विल्डर, वेंडर्स ह्या आणि अशा अनेक जर्मन व ऑस्ट्रीयन दिग्दर्शकांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट बनवून फक्त जर्मनीतच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा नावलौकिक मिळवला आहे.

विम वेंडर्स

विम वेंडर्स हे जर्मन चित्रपट क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्व आहे. ते चित्रपट दिग्दर्शक, लेखक, फोटोग्राफर तसेच चित्रकार देखील आहेत. त्यांच्या चित्रपटांसाठी त्यांना फ्रान्स मधील “कान्स” चित्रपट महोत्सव, इटली मधील वेनिस चित्रपट महोत्सव, जर्मनी मधील बर्लिन चित्रपट महोत्सवात अनेक पारितोषिके देऊन सन्मानित केले गेले आहे. त्याचप्रमाणे बाफटा अवॉर्डही त्यांना मिळालेले आहे. जगप्रसिद्ध अकॅडमी अवॉर्ड तसेच ग्रामी अवॉर्डसाठी त्यांचे नामांकन झालेले आहे. १९९६ पासून २०२० पर्यंत ते युरोपियन फिल्म अकॅडमी चे अध्यक्ष होते.

विम वेंडर्स यांचे खरे नाव अर्न्स्ट विल्हेल्म वेंडर्स असे आहे. परंतु त्यांना विम वेंडर्स या नावाने ओळखले जाते. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९४५ ला ड्यूसेलडॉर्फ नावाच्या पश्चिम जर्मनीतील शहरात झाला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वैद्यक शास्त्राचा दोन वर्ष अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी तत्त्वज्ञानाचाही अभ्यास केला पण दोन्हीही ठिकाणी त्यांचे मन लागले नाही म्हणून त्यांनी ते शिक्षण सोडून दिले. त्यानंतर ते चित्रकार बनण्यासाठी पॅरिसला गेले पण त्यातही यश आले नाही. याच काळात ते चित्रपटसृष्टीकडे आकर्षित झाले. दिवसाला पाच चित्रपट बघून ते चित्रपटांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करू लागले. १९६७ मध्ये जर्मनीमध्ये परत येऊन त्यांनी याच क्षेत्रातील अभ्यासक्रम निवडला आणि पूर्ण केला.

विम वेंडर्स यांचा पहिला चित्रपट “समर इन द सिटी” हा १९७० मध्ये प्रदर्शित झाला. अनेक वर्षांनी तुरुंगातून सुटून बाहेर पडलेल्या व्यक्तीची ही कहाणी आहे. रोड मूव्ही त्रायलॉजी (तीन चित्रपटांची मालिका) ह्या प्रकारात मोडणारे तीन चित्रपट त्यांनी १९७४ ते १९७६ मध्ये प्रत्येक वर्षी एक असे दिग्दर्शित आणि प्रदर्शित केले. १९७४ मधील ‘ॲलीस इन द सिटीज’ हा त्यातला पहिला चित्रपट. या चित्रपटात एक व्यावसायिक लेखक एक काम पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्यामुळे स्वतःची नोकरी गमावतो. जेव्हा तो म्युनिकला जात असतो तेव्हा एक अनोळखी व्यक्ती तिच्या मुलीला त्याच्याकडे सोपवते आणि नंतर ती व्यक्ती गायब होते. ते दोघे आता मुलीच्या अस्पष्ट आठवणी असलेल्या आजीचा शोध घेतात. हा चित्रपट कृष्णधवल रंगात बनवला असून यात संवादांशिवाय अनेक लांब दृश्ये आहेत.

‘द रॉग मूव्ह’ हा त्या प्रकारातील दुसरा सिनेमा. या चित्रपटातील मुख्य अभिनेता लेखक असून तो भटकंती करत त्याच्या मूळ देशाचा शोध घेतो. तेथील लोकांना भेटतो आणि त्याच्या व्यवसायाबद्दल सांगतो. हा चित्रपट योहान वॉल्फगांग फॉन ग्योथं (यांच्या विषयी आपण या लेखमालेच्या मागच्याच, म्हणजे भाग ४ मध्ये वाचलेच असेल. वाचले नसल्यास जरूर वाचा) ह्यांच्या कादंबरीचे ढोबळ रूपांतर आहे. त्यातील तिसरा चित्रपट ‘किंग्स ऑफ द रोड’ १९७६ मध्ये कान्स चित्रपट महोत्सवात फीप्रेस्की पुरस्काराने गौरविण्यात आला होता. ह्यातील ब्रुनो नावाचा साधी दुरुस्तीची कामे करणारा माणूस एका मानसशास्त्रज्ञाला भेटतो जो स्वतःच्याच भूतकाळापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो. पश्चिम जर्मनी च्या वेशीवर हिंडत असताना त्यांची मैत्री होते आणि नव्याने स्वतः ला उमगणारा एकत्र प्रवास सुरू होतो. अशी ह्या चित्रपटाची कथा आहे.

विम वेंडर्स यांचे बाकीचे काही महत्त्वाचे आणि गाजलेले चित्रपट म्हणजे द अमेरिकन फ्रेंड (१९७७), पॅरिस, टेक्सास (१९८४), विंग्ज ऑफ डीझायर (१९८७), बुएना विस्टा सोशल क्लब (१९९९), द सॉल्ट ऑफ द अर्थ (२०१४), परफेक्ट डेज (२०२३) हे आणि अजून अनेक चित्रपट ह्या अत्यंत हुशार आणि अभ्यासू व्यक्तीने दिग्दर्शित केले, त्यांनी काही चित्रपटांच्या कथा आणि त्याच बरोबर पुस्तके देखील लिहिली आहेत. त्यांचा तरुण कलाकारांसाठी एक मोलाचा संदेश आहे तो आपण खालील लिंक वर पाहू आणि ऐकू शकता.

५ फेब्रुवारी २०२५ पासून मुंबई येथे ह्या जगप्रसिद्ध जर्मन कलाकाराचे काही सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. ते स्वतः तिथे उपस्थित राहून रसिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. त्या निमित्ताने ह्या व्यक्तीबद्दल आपण थोडेसे जाणून घेतले आहेच. त्यांच्या चित्रपट महोत्सवाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा अवश्य फायदा घ्या आणि जमल्यास चित्रपट पाहायलाही जा. आपण पाहिलेल्या चित्रपटांविषयी आपले अभिप्राय आम्हाला कळविल्यास ते या पोर्टल वर नक्कीच प्रसिद्ध करता येतील.
क्रमशः

— लेखन : प्रा आशी नाईक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments