नॅशनल युनियन ऑफ सिफेरअर्स ऑफ इंडिया अर्थात “न्युसी” ही भारतीय व आंतरराष्ट्रीय महासागरात चालणाऱ्या जहाजावरील नाविक कामगारांची १२८ वर्षे, जुनी अशी ऐतिहासिक संघटना आहे.
दीड लाख सभासद संख्या असलेल्या न्यूसी या कामगार संघटनेची स्थापना १८९८ साली मोहम्मद अब्राहिम या खलासी कामगाराने केली. लोकशाही मार्गे चालणारी ही संघटना आंतरराष्ट्रीय कामगार महासंघ (आय. टी. एफ.) व हिंद मजदूर सभा (एच.एम. एस.) या संघटनेशी संलग्न असून, राजकीय पक्षापासून स्वतंत्र आहे. या संघटनेचे नेतृत्व लिओ बार्न्स, अब्दुल गनी सारंग यांनी केले असून, आता ही धुरा मिलिंद कांदळगावकर हे यशस्वीपणे सांभाळत आहेत.

आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त बोलताना मिलिंद कांदळगावकर म्हणाले की, मी माझ्या सहकारी कामगार बांधवांना आणि भविष्यातील कामगार संघटनांच्या नेत्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी कामगार संघटनाच्या तत्त्वांना बांधिल राहावे. कामगार संघटना ही केवळ एक सामाजिक सेवा म्हणून नव्हे, तर कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करणारी संघटना असली पाहिजे.
कामगार संघटना कधीही राजकीय महत्त्वाकांक्षांसाठी वापरल्या जाऊ नयेत. संघटनेचा उपयोग राजकीय सत्तेसाठी किंवा वैयक्तिक प्रगतीसाठी होऊ नये.
संघटनांचे नेते प्रामाणिक आणि पारदर्शक असले पाहिजेत. त्यांनी “स्लोडाउन” किंवा “वर्क-टू-रूल” सारख्या आंदोलन प्रकारांना नकार दिला. ज्या उद्दिष्टासाठी आंदोलन चालवले जाते, त्या हेतूलाच हानी पोहोचवू शकतात. गरजेच्या वेळी संघर्षाचा मार्ग स्वीकारला जावा; परंतु तो संघर्ष नेहमी उघडपणे, प्रामाणिकपणे आणि सन्मानाने व्हावा. संप हा आजही एक योग्य आंदोलनाचा प्रकार आहे.
याशिवाय, भविष्यातील कामगार संघटनांनी कधीही त्यांच्या स्वतःच्या कामगार बांधवांचे शोषण करू नये. दुर्दैवाने, आज काही ठिकाणी व्यवस्थापनाकडूनच नव्हे तर कामगारांच्या नावाने नेतृत्व करणाऱ्यांकडूनही कामगारांचे शोषण होते, हे अत्यंत लज्जास्पद आहे. ही प्रवृत्ती कठोरपणे नाकारली गेली पाहिजे आणि कायमची दूर केली पाहिजे.कामगार दिन हा केवळ साजरा करण्याचा दिवस नाही, तर आपल्या परिश्रमांची, संघर्षाची आणि योगदानाची जाणीव करून देणारा एक महत्त्वाचा दिवस आहे. आपण घाम गाळून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देता, आपल्या मेहनतीशिवाय कोणताही विकास शक्य नाही.
कामगारांनी आपल्या हक्कांसाठी जागरूक राहिले पाहिजे. त्याचबरोबर आपले कर्तव्यही तितक्याच प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. संघटनेच्या माध्यमातून एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी आवाज उठवा, पण सदैव प्रामाणिकपणा, संयम आणि शिस्तीची साथ सोडू नका.
कामगार संघटनांचे खरे उद्दिष्ट हे केवळ मागण्या मांडणे नसून, कामगारांचे एकूण जीवनमान उंचावणे आहे. म्हणूनच आपण आपल्या हक्कांसाठी लढताना जबाबदारीने आणि तत्त्वनिष्ठेने काम केले पाहिजे.
येणाऱ्या चार कामगार संहितांबाबत आमच्या संघटनेचे मत असे आहे की, कामगार क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या चार कामगार संहितांकडे आमची संघटना अत्यंत गंभीरतेने आणि अभ्यासपूर्वक पाहते. या संहितांचा उद्देश विविध जुने कामगार कायदे करून त्यांना एकत्र करणे, सोपे करणे आणि रोजगार व उद्योग क्षेत्रात सुधारणा घडवणे आहे.
आमच्या संघटनेचे या चार संहितांबाबत स्पष्ट मत आहे की, जर सुधारणा कामगारांच्या हिताचे रक्षण करत असतील, त्यांना सुरक्षितता, स्थैर्य आणि अधिक चांगल्या सुविधा देत असतील, तर आम्ही त्या स्वागतार्ह मानतो.

मात्र काही तरतुदी कामगारांच्या हक्कांमध्ये कपात करणाऱ्या आणि व्यवस्थापनाला अधिक अधिकार देणाऱ्या वाटतात. विशेषतः संघटन करण्याचा हक्क, कामगारांच्या कल्याणासाठी असलेले सामाजिक सुरक्षेचे नियम, कामकाजाचे तास इत्यादींमध्ये काही त्रासदायक बदल सूचित केले गेले आहेत.त्यास आमचा विरोध राहील..
कोणतेही धोरण किंवा कायदा कामगारांच्या थेट सहभागाशिवाय आणि त्यांच्या हिताचा विचार न करता बनवले जाऊ नये, यावर आमचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे सरकारने व्यापक सल्लामसलत करून, कामगार संघटनांचा विश्वास संपादन करूनच हे बदल लागू करावेत, ही आमची ठाम भूमिका आहे.
औद्योगिक वाढ व गुंतवणूक वाढीस चालना देणारे धोरण आम्ही मान्य करतो, परंतु ते कामगारांच्या मूलभूत हक्कांची गळचेपी न करता साधले गेले पाहिजे.
आमची संघटना कामगारांच्या हितासाठी सजग आहे. आम्ही सुधारणा विरोधात नाही; पण कोणतीही सुधारणा कामगारवर्गाच्या जीवनमानावर प्रतिकूल परिणाम करणार असेल, तर तिचा आम्ही तीव्र विरोध करू.
कामगार कल्याणकारी उपक्रम :
नॅशनल युनियन ऑफ सीफॅरर्स ऑफ इंडिया गेल्या अनेक दशकांपासून भारतीय तसेच परदेशी ध्वजवाहक जहाजांवर काम करणाऱ्या सीफॅरर्ससाठी सुरक्षित सेवा अटी व शर्ती निश्चित करण्यासाठी सातत्याने वाटाघाटी करत आहे. संघटनेचे सदस्य, जे व्यापारी जहाजे व क्रूझ जहाजांवर सेवा देतात, त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सेवानिवृत्त किंवा दिवंगत सीफॅरर्सप्रमाणे समान लाभ मिळतो. नुकत्याच झालेल्या वेतन करारानुसार नाविकांना..
१ जानेवारी २०२५ पासून महिन्याला कमीत कमी ६७३ डॉलर्स,
१ जानेवारी २०२६ पासून ६९० डॉलर्स,
१ जानेवारी २०२७ पासून ७०४ डॉलर्स,
१ जानेवारी २०२८ पासून ७१५ डॉलर्स मिळतील.

याशिवाय न्युसितर्फे कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी पुढील कल्याणकारी योजना राबविल्या जातात….
* सीफॅरर्ससाठी नव्याने उदयास येणाऱ्या सागरी क्षेत्रातील कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम व कोर्सेस उपलब्ध करून दिले जातात. जागतिक रोजगार बाजारात स्पर्धात्मकता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे.
* सीफॅरर्स व त्यांच्या कुटुंबीयांना मजबूत विमा संरक्षण दिले जाते, ज्यामुळे सेवेदरम्यान उद्भवणाऱ्या अनपेक्षित घटनांसाठी आर्थिक सुरक्षितता प्राप्त होते.
* इंडियन सेलर्स होम सोसायटी वसतिगृहात राहणाऱ्या सीफॅरर्ससाठी अखंड इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे, ज्यामुळे कुटुंबांशी संपर्कात राहणे व महत्त्वाच्या ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येतो.
* वसतिगृहातील रहिवाशांना परवडणारे व पौष्टिक अन्न दिले जाते, ज्यामुळे सीफॅरर्स व त्यांच्या कुटुंबीयांवरील खर्चाचा भार कमी होतो.
* सीफॅरर्सच्या मुलांना दर्जेदार शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळते व आर्थिक तणाव कमी होतो.
* एसएससी परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवणाऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
* उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो व त्यांना बक्षीस दिले जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांना अधिक मेहनतीची प्रेरणा मिळते
* सीफॅरर्सच्या मुलांना पदव्युत्तर शिक्षणासाठी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुदान दिले जाते, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती साधता येते.
* सीफॅरर्सच्या पत्नींना कौशल्यवर्धनासाठी शैक्षणिक मदत दिली जाते, ज्यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन व सामाजिक प्रगती साधता येते.
* परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे त्यांचे जागतिक संधींना गवसणी घालण्याचे स्वप्न साकार होते.
* सीफॅरर्स व त्यांच्या कुटुंबीयांना अल्पकालीन किंवा दीर्घकालीन व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे त्यांना नवे करिअर पर्याय मिळतात.
* सीफॅरर्स व त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक सहाय्य दिले जाते, जेणेकरून योग्य वेळी उपचार मिळू शकतात आणि खर्चाचा भार कमी होतो. लोणावळा येथील विश्रांतीगृहात सीफॅरर्स व त्यांच्या कुटुंबीयांना विश्रांती घेता येते, समुद्रातील कठीण जीवनानंतर ताजेतवाने होण्याची संधी मिळते.
* लोणावळ्यात निवृत्त सीफॅरर्ससाठी सुसज्ज व सुसंस्कृत निवास उपलब्ध आहे, जिथे त्यांना आदर, काळजी व सामुदायिक जीवनाचा अनुभव घेता येतो.
* घरातील सदस्यांना शिलाई व टेलरिंगचे प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे त्यांना स्वयंरोजगाराची संधी मिळते व घरगुती उत्पन्नात वाढ होते.
* मानसिक स्वास्थ्य व भावनिक समस्या हाताळण्यासाठी व्यावसायिक समुपदेशन उपलब्ध आहे, ज्यामुळे सीफॅरर्स व त्यांच्या कुटुंबीयांना एकाकीपणाची जाणीव होऊ नये.
* महिलांना लघुउद्योग किंवा व्यवसाय सुरु करण्यासाठी सहाय्य केले जाते, जेणेकरून उद्योजकता वाढेल व कुटुंबांचे आर्थिक स्थैर्य बळकट होईल.
* सीफॅरर्सच्या मुलां व महिलांसाठी व्यावसायिक करिअर समुपदेशन, करिअरच्या पर्यायांबद्दल कौशल्यविकास व शैक्षणिक मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ सल्ला दिला जातो, ज्यामुळे कुटुंबीय योग्य व्यावसायिक निर्णय घेऊ शकतात.
* सीफॅरर्सना सुरक्षितता व गुणवत्ता प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे त्यांच्या जागतिक रोजगार संधी वाढतात.
* सीफॅरर्सना सागरी कार्यासाठी आवश्यक असलेली इंग्रजी भाषा कौशल्ये सुधारता येतात. हे ऑनलाइन शिक्षण कार्यक्रम कोणत्याही ठिकाणी, आपल्या वेळेनुसार करता येते.
* सीफॅरर्ससाठी शिपिंग कंपन्यांच्या कार्यालयात जाण्यासाठी समर्पित बस सेवा दिली जाते, ज्यामुळे प्रवासाचा त्रास व खर्च कमी होतो.
* न्यूसी १५ नाविक महिलांचा प्रशिक्षणाचा खर्च करणार.
* न्यूसी स्त्री शक्ती सपोर्ट उपक्रमाचा लाभ १५ नाविक महिलांना घेता येईल. ज्यांनी पूर्व सामुग्री प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले असेल. हा उपक्रम १५ प्रथम येणाऱ्या महिलांना प्राधान्य या मार्गदर्शक तत्वावर राबविला जाईल. हा उपक्रम जास्तीत जास्त महिलांना मर्चंट नेव्हीत करिअर करण्यास प्रोत्साहित करेल.
न्युसी कामगार संघटनेचे एक टीमवर्क आहे. या टीमवर्कमध्ये अध्यक्ष ॲड. प्रेमानंद साळगावकर, सरचिटणीस व खजिनदार मिलिंद कांदळगावकर, असिस्टंट जनरल सेक्रेटरी सुनील नायर, उपाध्यक्ष लुईस गोम्स, संघटक चिटणीस सुरेश सोळंकी, सलीम झगडे, रॉड्रिक्स इत्यादी पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

— लेखन : मारुती विश्वासराव. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800