“पाह्यशीन माणसाचे यवहार खोटे नाटे……
…..तवा बोरी बाभयीच्या आले अंगावर काटे. …..!”
बहिणाबाईंनी या दोन ओळींमधून खूप मोठा आशय व्यक्त केलेला आहे…. माणसाचं अंतरंग उघड केलंय….! खरंच मुखवट्यांची साथ घेतल्याशिवाय माणसाला जगताच येणार नाही का..…? आज प्रत्येकाने स्वतःच स्वतःला “पर्दानशीन “करून घेतलंय….. लपवून टाकलाय त्यांचा खरा चेहरा बेगडी मुखवट्यां मागे……! कदाचित म्हणूनच कधीकधी वर्षांची ओळखही फसते. ….. जेव्हा बसतात अनपेक्षित धक्के…. लोटून देतात एका अनिश्चित आवर्धात….! कधीही न उलगडलेला पैलू समोर येऊ लागतो….. समोरची व्यक्ती मात्र काहीच न घडल्या गत “तो मी नव्हेच ‘ या अविर्भावात वावरत असते….. अगदी राजरोसपणे…..! जणू आपण वाटसरूच नाही त्या गावचे….! ज्या गावाची सीमा मनाच्या खऱ्याखुऱ्या भावनांपासून सुरू होते… आणि संपते ही अशाच वळणावर जिथे भावना उभ्या असतात……त्या वाटसरूच्याच प्रतीक्षेत…. त्याला खरं खुरं रूप देण्यासाठी….! पण त्या वळणाकडे वळून पाहण्याची उसंतही नसते त्यांना….. गुरफटून गेलेले असतात मुखवट्यांच्या विश्वात…… मनाची कवाडे उघडण्याचा प्रयत्नही करत नाहीत…. मुखवट्यांच्या कुंपणात बंदिस्त करून घेतात स्वतःला….. हरवून बसतात आपली ओळख….. त्यांच्या आसपासच्या लोकांनाही विस्मय होतो… त्यांचं हे नवं रूप बघून…. जसं कधी कधी आपले नित्याच्या व्यवहारातले परिचित शब्दच एखाद्या वेळी मनातल्या मनात उच्चारताच अचानक अपरिचित भासू लागतात…. आपली ओळख हरवून बसण्याच्या वळणावर येऊन ठेपतात…. पण तरीही शब्द शेवटी शब्दच असतात…..
रुढीने… शास्त्राने…..दिलेला एक निश्चित अर्थ असतो……त्याला ओळख देण्यासाठी…… पण माणसाचं मन तर स्वतःच एक अजूनही न उलगडलेलं गुढ …. अनेक अनिश्चित लाटांच्या भोवऱ्यात अडकलेलं त्याचं मन….. हेलकावे खात राहतं….!
निरपेक्ष…. सात्विक… सहृदय….. यासारखी नितळ भावनेच्या मार्मिकतेची उच्च सीमा गाठणाऱ्या शब्दांची सोबत घेऊन..,,. भावनांचे खेळ करत एक एक मुखवटा चढवला जातो….. पण मुखवटे शेवटी मुखवटेच असतात ना ? ज्यांना गळून जमिनीवरच पडायचं असतं….! काही जण तर क्षणिक सुखाची अनुभूती देऊन जाणाऱ्या….मुखवट्यांच्या मृगजळाला भाळून…… आयुष्याचाच एक मुखवटा बनवून टाकतात…. विसरून बसतात बळ मनाचे बंदिस्त दरवाजे उघडण्याचं…. कारण त्यांच्या मनात प्राबल्य असतं एका अनामिक भीतीचं ….. कदाचित मुखवट्यांनी मनात माजवलेला अंधार ते पाहू शकणार नाहीत कधी…. पण जेव्हा माणूस अगदी एकटा एकटा होतो…… तेव्हा मनाचे बंदिस्त दरवाजे उघडल्या जातात…. आपोआप… आणि दिसू लागतो अंधार…… केवळ अंधार…. खूप मोठे धाडस लागतं ह्या अंधाराचा सामना करण्यासाठी…… या अंधाराचा सामना करण्यासाठीच तर मुखवट्यांचे आश्रय घेतले जात नसतील ना…..?… कदाचित… होय….!
पण… या मुखवट्यांच्या अनिश्चित आवर्धातून बाहेर पडून…..एकदा तरी स्वतःला स्वतःची ओळख द्यावी… माणसानं….. उघडून टाकावेत कधीचे बंद करून टाकलेले मनाचे दरवाजे…..! कदाचित…. धाडस होणार नाही…. मनात साठलेल्या त्या अंधाराकडे पाहण्याचं….. आतून पार गोठून गेल्याची जाणीव सतत होत राहील…. खूप भांबावून गेल्यासारखं….. हरल्यासारखं वाटेल… जणू एका उंच डोंगराच्या सर्वात उंच कड्यावरून….. एका खोल दरीत फेकल्या जाण्याचा आभास होईल….. पुन्हा एका अनिश्चित आवर्धात….. पण… ह्या आवर्धात…..जरी तो अनिश्चित असला तरी…… कसल्याही आधाराची गरज भासत नाही…. भीती वाटत असली तरी विलक्षण विसावा देऊन जातं….. मनात उमटलेल्या विचारांचं वास्तव्य….! क्षणकाल…. तरी अस्सल…! भटकू द्यावं मनाला…..ह्या भोवऱ्यात…. एकट्यालाच…. त्या क्षणकाल…..पण….अस्सल विसाव्याचं दान पदरात पाडून घेण्यासाठी…,..!
धडपडतो प्रत्येक जण….. आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी…… सगळ्या जगाशी लढण्याचा प्रण करतो…… आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी…. पण…..स्वतःच…. स्वतःचं…. अनेक मुखवट्यांच्या आड दडलेलं…… अस्सल….. खरंखुरं अस्तित्व…. कुठेतरी लयास जात आहे याचं भानही हरपून बसतो…… जग शोधू पहायला निघालेला….. स्वतःतल्या स्वतःलाच शोधू शकत नाही…..!
आरंभावा आपणही असाच एक प्रवास……. आपल्या नावेला किनारा देण्यासाठी…. नाव किनाऱ्यावर सहज पोहोचेल असंही नाही….. कदाचित त्वेषाने झेपावणाऱ्या लाटांचे प्रहारही अंगावर घ्यावे लागतील…… गटांगळ्या खाईल नाव कधी……. किनाऱ्याकडे वाटचाल करतानाच…… आपली वाट चुकल्याची जाणीव होईल…. पण….. खचून न जाता…… एका नव्या उभारीने…. पुन्हा किनाऱ्याच्या दिशेने नाव नेण्याचा प्रयत्न करावा….. ही उभारी पुरवेल…… एक कवडसा…. एका नव्या आशेचा ….. एका नव्या उमेदीचा….. असेल तो कदाचित…. अंधुकसा…. पण अस्सल……!
— लेखन : सौ. प्रिती प्रवीण रोडे. अकोला
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप सुंदर लेख