पुणे जिल्ह्यातील मूळ असलेल्या स्व.मुरलीधर शिंगोटे यांनी ३१ वर्षांपूर्वी मुंबई येथून मुंबई चौफेर हे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राची चौफेर घोडदौड सुरू ठेवत आजच्या घडीला पुण्यनगरी, हिंदी भाषेतील यशोभूमी आणि इतकेच नाही कन्नड भाषेतील कर्नाटक मल्ला ही वृत्तपत्रे सुद्धा अतिशय वाचकप्रिय ठरली आहेत.

अशा या मुंबई चौफेर वृत्तपत्रात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने माझी “महाराष्ट्रातील नवरत्ने” ही प्रेरणादायी व्यक्तींवर आधारित लेखमाला आज पासून दर सोमवारी प्रसिद्ध होत जाईल. आज प्रसिद्ध झालेला लेख तसेच सुलभ वाचनासाठी मूळ मजकूर पुढे देत आहे.
मुंबई चौफेर चे संपादक श्री प्रफुल फडके आणि मुंबई चौफेर परिवाराचे मनःपूर्वक आभार. आपणा सर्वांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा…..
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात काम करीत असताना, माझा पत्रकारांशी नित्याचा संबंध येत असे. त्यातील काही पत्रकार त्यांच्यातील विविध वैशिष्ट्यांमुळे कायमचे लक्षात राहिले. त्याच बरोबर अजूनही त्यांच्याशी माझे स्नेह पूर्ण संबंध आहेत.
अशा वैशिष्ट्यपूर्ण पत्रकारांपैकी एक म्हणजे श्री राजू झनके हे होत. मंत्रालय प्रतिनिधी असणाऱ्या पत्रकारांची पत्रकारिता ही केवळ मंत्रालयापुरतीच मर्यादित नसते तर त्यांना मंत्रालय परिसरात असलेल्या विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयांना भेटी देणे, त्यांचे कार्यक्रम, पत्रकार परिषदा कव्हर करणे, मुलाखती घेणे, विधान मंडळाच्या अधिवेशन काळात तेथील कामकाजाचे वृत्तांकन करणे, अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. अशा या सर्व धबडग्यात राहून राजू झनके यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या महापरिनिर्वाण दिनापासून; ६ डिसेंबर २०१५ पासून या महामानवाच्या प्रतिमेला हारफुले वाहण्याऐवजी वह्या, पेन, पुस्तके अर्पण करावे, असे अभियान सुरू केले.

हे अभिनव “एक वही, एक पेन” अभियान राजू झनके यांनी मुंबईतील चेंबूर येथील आंबेडकर उद्यानात तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री प्रा राजकुमार बडोले, रिपब्लिकन नेते .प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थितीत तसेच दादर चैत्यभूमीवर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डाॅ भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरु झाले. या अभियानाला पुढे उस्फुर्त प्रतिसाद मिळत गेला.
पुढे हे अभियान केवळ महापरिनिर्वाणदिनापुरते सीमित न राहता तद्नंतर समविचारी व्यक्तींकडून आलेल्या सूचना, त्यांचा प्रतिसाद आणि सहकार्य या मुळे शिवजयंती, महात्मा फुले जयंती, सावित्रीबाई फुले जयंती, राजमाता जिजाऊ जयंती, गणेशोत्सव आणि अन्य काही निमित्ताने देखील आयोजित होऊ लागले.
तसेच अभियान केवळ मुंबई महानगरापूरते मर्यादित न राहता ते ठाणे, टिटवाळा, बदलापूर, विरार, सांगली, परभणी, दिवा, मुंबई सह अनेक ठिकाणी आयोजित होऊ लागले. तसेच ते केवळ वही आणि पेन या पुरतेच मर्यादित न राहता आता गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देखील देण्यात येते. त्यामुळे आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांचा लाभ झाला आहे आणि होत आहे.

हे अभियान केवळ शहरी भागापुरते मर्यादित न राहता ते ग्रामीण, आदिवासी भागात देखील पोहोचत आहे. राज्यातील शेकडो आदीवासी पाड्यांवर हजारो विद्यार्यांना वह्या, पेन, शैक्षणिक साहित्य मिळू लागल्याने या मुलांच्या जीवनात क्रांतीच घडत आहे.
अशा या राजू झनके यांना सामाजिक कार्याचा वसा घरातूनच मिळाला आहे. एका सामान्य कुटुंबात २१ मार्च १९६९ रोजी राजू झनके यांचा जन्म झाला. त्यांचे वडील किसन झनके हे गवंडी काम जरी करीत होते, तरी ते आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या भूमीहीनांसाठी केलेल्या सत्याग्रहींच्या आंदोलनात भाग घेतल्याबद्दल ते ९ दिवस नागपूर कारागृहात होते. तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री प्रा. राजकुमार बडोले यांनी त्यांच्या वडिलांसह हयात ११ सत्याग्रहींना यशवंतराव चव्हाण सभागृहात पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यामुळे राजू झनके यांना सामाजिक कार्याचे बाळकडू त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षीच ते आंबेडकरी चळवळीत ओढले गेले. पायाखाली जमीन कोणतीही असो, डोक्यावर आकाश कोणतेही असो प्रतिकुल, संघर्षमय परिस्थितीवर मात करुन मोठ्या आत्मविश्वासाने यश संपादन करणे हाच त्यांचा निःस्वार्थी, सर्वसमावेशक, व्यापक दृष्टिकोन त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतो. उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन नसल्याने त्यांनी उपजीविकेसाठी अनेक नोकऱ्या केल्या. पण, चळवळीत सक्रिय सहभाग असल्यामुळे आंदोलने, मोर्चे, बैठका, शासकीय कामकाज यामुळे त्यांना एकही नोकरी टिकविता आली नाही. शेवटी आपली आवड ओळखून ते पत्रकारितेत आले. गेली २५ वर्षे ते मुंबईसह राज्यातील अनेक आघाडीच्या दैनिकांसाठी मंत्रालय आणि विधीमंडळाचे वार्तांकन करीत आहेत.
राजू झनके पत्रकारितेबरोबरच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे विविध क्षेत्रातील अनेक मंडळींशी जोडल्या गेले आहेत. मोठ्या व्यक्तींबरोबरच त्यांनी सामान्य माणसाशी असलेली आपली नाळ कधी तुटू दिली नाही. आपल्या ओळखीचा फायदा त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांसाठी केला आहे.
झनके यांनी सक्रिय सहभाग घेतलेले काही लढे, काही संवेदनशील प्रकरणे म्हणजे भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या जागेचा विषय, पनवेलमधील अल्पवयीन स्वप्निल सोनावणे याचे प्रेम प्रकरणावरुन झालेले हत्याकांड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगाव दाभाडे येथील बंगल्याच्या डागडुजीसाठी २ कोटींचा निधी, नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांची झालेली आत्महत्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंचवली स्मशानभूमी प्रकरणी गावकऱ्यांनी सामाजिक बहिष्कार टाकून, प्रांत अधिकाऱ्यांच्या समक्ष जो जीवघेणा हल्ला झाला त्यावेळी जी काही मान्यवर मंडळी तेथील कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहिली होती त्यात राजू झनके हे देखील होते.
राजू झनके यांच्या समाजोपयोगी, उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात येऊन आज पर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यातील एक प्रमुख पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे त्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांनी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांना समर्पित करुन, ज्यांच्या अनमोल संदेशामुळे अभियानाने जन्म घेतला त्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमी येथे सहकुटुंब जाऊन पुरस्कार अर्पण केला होता.
ही यश कथा लिहिण्यासाठी राजू झनके यांची मुलाखत घेताना, त्यांनीच मला आठवण करून दिली की, “सर तुम्ही २०१५ मध्ये “एक वही एक पेन” या अभियानावर पहिला लेख महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज वेब पोर्टल साठी लिहिला होता. पुढे तो लेख महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्याने, माझ्या उपक्रमाला खूप बळ मिळाले.” अशी विनयशीलता, कृतज्ञतेची भावना राजू झनके यांना अधिक मोठी करते.


विशेष म्हणजे, राजू झनके यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी सौ सुनीता आणि मुलगा सम्यक हे केवळ त्यांच्या पाठीशीच असतात, असे नव्हे तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी ते त्यांच्या सोबत असतात, हे झनके अभिमानाने सांगतात. याबद्दल त्यांची पत्नी आणि मुलगा या दोघांचेही अभिनंदन केले पाहिजे, अन्यथा घरातूनच यथायोग्य पाठिंबा नसेल, तर असे समाज कार्य करताना असंख्य अडीअडचणीना तोंड द्यावे लागते. कुटुंबासोबतच झनके यांच्यासोबत या अभियानात सक्रिय सहभाग देत असलेली त्यांची संपूर्ण टीम देखील अभिनंदनास पात्र आहे.
वंचित बालके ही काही केवळ महाराष्ट्र राज्याचीच समस्या नाही तर ती देशाची आणि जगाची देखील प्रमुख समस्या आहे. त्यामुळे राजू झनके यांनी सुरू केलेले “एक वही, एक पेन” हे अभियान केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता ते जगभर पोहोचले पाहिजे. वंचित बालकांबरोबर संवेदनशील समाज निर्मितीसाठी ते एक महत्वाचे पाऊल ठरेल.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
उत्तम परिचय करुन दिला जाणारा लेख. अभूतपूर्व
अभियान …शिक्षणाचे महत्व तर फार मोठेच आहे
हे पटवून देण्यासाठी प्रयत्नशील असायलाच हवे…
धन्यवाद