अवकाश व्यापुनी राही
‘अवकाळगाभणे’ पुरते
विश्वावर दिवसाढवळ्या
अंधारा येते भरते
उन्मत्त पिसाटी वारा
मदमस्ती धडका देतो
रोवून पाय उभलेल्या
संसारा मोडुन जातो
हा खेळ अखंडित चाले
नेटाने जे ते तरती
घनद्वंद्वी तडके चपला
पेटतात विझल्या वाती
चित्शक्ती उत्पातातुन
सृजनाची दावी किमया
क्षणभंगुर आयुष्याला
ती तीच लावते माया
स्वास्थ्यात सुखे अनुभवता
आत्ममग्न जो तो राही
‘अंश तो महाशक्तीचा’
हे हेच विसरुनी जाई
— रचना : सूर्यकान्त द. वैद्य. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
फारच सुरेख कविता 👍👌👌💐