Sunday, July 20, 2025
Homeलेख६५ वर्षे : एक ससावलोकन…

६५ वर्षे : एक ससावलोकन…

आज मी ६५ वर्षांचा झालो. या निमित्ताने ससावलोकन करण्याचे विचार माझ्या मनात येत आहेत.

खरं म्हणजे, मागे वळून पाहताना, आपण आपल्या आयुष्याचा पट पाहू लागतो,त्यास सिंहावलोकन म्हणण्याची पद्धत आहे.पण मी मात्र यास सिंहावलोकन न म्हणता ससावलोकन म्हणतोय, याचे कारण मी एखाद्या सिंहासारखा जगलोच नाही, तर मी जगलो ते एखाद्या सश्यासारखे.

असं म्हणतात की, सश्या च्या पाठीवर पान जरी पडले तरी, तो पाठीवर आभाळ पडल्याचे समजून, घाबरून पळत सुटतो. असाच मी गेली ५५ वर्षे पळत आलो आहे. ५५ वर्षे अशा साठी की, दहाव्या वर्षी वडील गेले, तेव्हा मी पहिला मृत्यू पाहिला. तो पर्यंतचे माझे आयुष्य अतिशय सुरक्षित होते. काही अडचणी होत्याच, त्यातील मुख्य म्हणजे मी सहा वर्षांचा होई पर्यंत बोलूच शकत नव्हतो. त्यामुळे होणारी कुचेष्टा मी अनुभवली आहे. पुढे एका वर्षाच्या आत, भाऊ गेल्याचे दुःख सहन न होऊन माझी आत्या गेली. त्यानंतर दोन वर्षांनी माझा चार नंबरचा भाऊ, रवी, विदर्भाच्या भाषेत चकव्याने नेला. नशिबाने पुढची नऊ वर्षे कुणाच्या मृत्यू शिवाय गेली. तर माझा पाच नंबरचा भाऊ, उदय गेला. ते वर्ष होते, १९८२. एरव्ही गणितात कच्चा असलेला मी, माझ्या डोक्यात हे पक्के बसले की, चार नंबरचा भाऊ गेला, पाच नंबरचा भाऊ गेला, या प्रमाणे आता सहाव्या नंबरचा म्हणून आता जाण्याचा नंबर माझाच आहे.१९८२ ते १९९० अशी पूर्ण आठ वर्षे मी मृत्यूच्या सोबत काढली.
कधीही आपण जाऊ शकतो, ही धारणा मनात कायम असे. पण १९९० साली माझा दोन नंबरचा भाऊ, हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावला. तेव्हा माझ्या लक्षात आले की, आपल्याला वाटत होते तसे काही झाले नाही. निसर्गाचे चक्र कसे फिरेल, हे काही सांगता येत नाही. तेव्हा पासून मात्र मी मृत्यूच्या छायेतून बाहेर आलो.

घरातील या मृत्यूंबरोबरच पाचवी ते दहावी पर्यंत चा वर्ग मित्र अमल दामले, पुढे पुण्याला मोठ्या भावाकडे रहात असताना मित्र झालेला रवी ठाकूर, भावाची पहिली पत्नी, दूरदर्शन मध्ये असतानाचे सहकारी मित्र सुभाष भावसार, सुभाष शिर्के, मंगेश होळीकर, रविंद्र सप्रे, अनिल दिवेकर, तर माहिती खात्यातील माझे सहकारी मित्र मारुती कुलमेथे, सतीश जाधव, राजेंद्र सरग, संभाजी खराटआदींचे अकाली मृत्यू, पंधरा वर्षांपूर्वी झालेला बहिणीचा मृत्यू, एक नंबरच्या भावाचा तेरा वर्षांपूर्वी तर राहिलेल्या एकमेव तीन नंबरच्या भावाचा आठ वर्षांपूर्वी झालेला मृत्यू आणि आज पर्यंत झालेले अनेक नातेवाईक, स्नेही, सहकारी, परिचित अशा सर्वांचे मृत्यू आठवत राहतात. कळते की आयुष्य किती क्षणभंगूर आहे, किती अशाश्वत आहे, किती अनिश्चित आहे, किती बेभरवशाचे आहे, किती अनप्रेडिकटेबल आहे!इथे कधी, का, केव्हा, कशामुळे, कुणाचा नंबर लागेल, ते काही सांगता येत नाही. असो.

रात्री पासूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे संदेश येत आहेत, दिवस भर येत राहतील, काही मित्रांनी लेख लिहिले आहेत, ते ही काही वृत्तपत्रांमध्ये छापून येतील, काही मित्र, कुटुंबीय समक्ष शुभेच्छा देतील. या सर्वांचा आपण हसतमुखाने स्वीकार केला पाहिजे. आपल्याला आनंद देणाऱ्यांना आपण आनंद दिलाच पाहिजे पण न देणाऱ्यांनाही आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— छायाचित्र : नितीन सोनवणे. मुंबई
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. खूप सुंदर. काळजाला भिडणारे आणि पिळवटून टाकणार्या अनुभवातून आपण खरोखरच शब्दशः तावून सुलाखून निघाले आहात.
    लेख लेखाने ग्रीप पकडलेली होती पण आपण अचानक शेवटाकडे वळणात. असो.

  2. खूप हलवून सोडणारा व जीवनभर पाठ न सोडणारा अनुभव अतिशय सुंदर शब्द बध्द केला आहे , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,हात असाच लिहीता ठेव असं मला रविंद्र पिंगे म्हणाले होते,ते मी तुम्हाला सांगते आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यमभूषण याकूब सईद
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक – देवेंद्र भुजबळ
कविता बिरारी on मम गाव राहिले दूर…..
प्राची उदय जोगळेकर on सांगा, कसं जगायचं ?