अमेरिकेतील आपले कवी, श्री शैलेश देशपांडे यांनी नुकतीच रिचमंड मधल्या व्हर्जिनिया म्युझियम ऑफ फाईन आर्ट्स (VMFA) येथे India’s Great Mughals: Art, Power, and Opulence नावाच्या प्रदर्शनाला भेट दिली. औरंगजेबाची तलवार, सोन्यामोत्या हिऱ्यांनी मढवलेली कट्यार, सुबक हुक्का पात्र आणि ताजमहालासाठी वापरल्या गेलेल्या संगमरवरी भिंती ही या प्रदर्शनाची खास आकर्षणे. हे प्रदर्शन बघताना शैलेशजीना राहून राहून संभाजी महाराजांची आठवण येत राहिली आणि त्यातून त्यांना पुढील कविता स्फुरली. ही कविता पुढे देत आहेच.

पण या निमित्ताने असे सुचवावेसे वाटते की, मूळ भारताच्या मालकीच्या या ऐतिहासिक वस्तू पुन्हा भारतात येण्यासाठी भारत सरकारने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत. अमेरिकेत असलेल्या मूळ भारतीयांनी देखील या कामी पुढाकार घेतला तर अधिकच चांगले होईल.
— संपादक
राजे…..
मुघलांच्या या पोकळ दरबारात
शौर्याचे अंधभक्त शोधतो मी
अन् औरंगजेबाच्या तलवारीवर
संभाजीचे रक्त शोधतो मी…

संगमरवरी ताजमहालातून
गातात इथे त्यांचेच पोवाडे
कुठे हरवले त्या शाही थाटात
आपल्या राजांनी केलेले निवाडे
कशी आवडावी आम्हा वंशपरंपरागत गादी
फोडलेले ते दिल्लीचे तख्त शोधतो मी
अन् औरंगजेबाच्या तलवारीवर
संभाजीचे रक्त शोधतो मी…

आता इतिहासाची नाळ जपत
बदलून टाकीन म्हणतो नाती
काळजात घुसणारी कट्यार बनू की
की त्या लखलखणाऱ्या तलवारीची पाती

त्यांची हुक्की, त्यांचा हुक्का
माझ्या राजांचा हक्क शोधतो मी
अन् औरंगजेबाच्या तलवारीवर
संभाजीचे रक्त शोधतो मी…

— रचना : शैलेश देशपांडे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
