Homeलेखवर्षा सहल : घ्यावयाची काळजी !

वर्षा सहल : घ्यावयाची काळजी !

पाण्याला ‘जीवन’ म्हणतात हे उन्हाळ्याची सांगता होताना लक्षात येते. सारेच चातकासारखी पावसाची वाट पहात असतात. लहान मुले तर ‘ये रे येरे पावसा, तुला देतो पैसा’ म्हणत त्याला आमिष दाखवतात, तर ‘लगान’ मधील ‘घन नं घन मेघा बरसे’ सारखी सर्वांची अवस्था होते. एरवी कुणाच्या हातून चुकून चार थेंब पाण्याचे पडले तर चिडणारे आपण पावसाच्या पहिला थेंब अंगावर पडताच गुलाबपाणी पडल्यासारखे मोहरून,आनंदून जातो. कितीही थकलेले असलो तरी हात, पाय, तोंड पाण्याने धुतले की सगळा थकवा लगेच दूर जातो. लहान मुलांनाच काय, मोठ्यांनासुद्धा पावसात भिजायला खूपदा आवडते. रंगीबेरंगी छत्र्या, रेनकोट यांनी रस्ते फुलून जातात. उन्हामुळे तापलेल्या धरणीवर पावासाचे काही थेंब पडतांच मातीचा जो सुगंध आसमंतात दरवळतो तो इतका सुरेख असतो, की जगातील कोणतेही परफ्युम, अत्तर, सुगंधी एअरफ्रेशनर्स त्यापुढे नक्कीच फिकी पडतात.

माणसेंच काय, पशु, पक्षी सुद्धा पावसाने खुश होतात ! नाचू लागतात. नाच रे मोरा किंवा थुई थुई नाच माझ्या अंगणात मोरा.. अशी गाणीसुद्धा त्यामुळेच लिहिली गेली. कित्ती चित्रपटात सुंदर पावसाची गाणी लिहिली, चित्रित केली आहेत. एकूणच पावसाळा हा सर्वांचाच लाडका ऋतू आहे. हा पाऊस जणु जादुची कांडीच फिरवतो आणि क्षणात निसर्गाचे रूपच बदलते. उन्हामुळे रखरखीत झालेली धरणीमाता हिरवागार शालू नसते. त्यावर सुरेख रंगीबेरंगी फुलांची वेलबुट्टी असते. त्यांचा सुगंध सारा आसमंत भरून टाकतो. पाण्यासाठी होणारी लोकांची वणवण थांबते. सारेच तृप्त होतात. बळीराजाने नुकत्याच केलेल्या पेरणीला सुरेख अंकुर फुटतात. तो ही सुखावतो. गुरे हिरवागार चारा मिळाल्यामुळे खुश होतात. निसर्गाच्या सौंदर्याला नवसंजीवनी देणारा ऋतू आहे. काळेभोर ढग, रिमझिम सरी, हिरव्यागार डोंगररांगा, फेसाळणारे धबधबे आणि मातीचा दरवळणारा सुगंध यांमुळे संपूर्ण सृष्टी जणू नव्या उत्साहाने बहरून जाते. अशा रम्य वातावरणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी आणि हे मोहरलेले सुरेख रूप न्याहाळण्याचा मोह तर सर्वांनाच होणार ना!

म्हणूनच मग सारे ‘वर्षा सहलीचे’ प्लॅनिंग करतात. प्रत्येकाच्या आयुष्यातील हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.या सहली शाळांच्या, कॉलेजच्या, कंपनी, ऑफिसेस मधील कर्मचार्यांच्या, जेष्ठ नागरिक संघाच्या असतात. तर कधी काही प्रवासी कंपन्या सुद्धा यांचे सुंदर ठिकाणी आयोजन करतात. यशिवाय घरगुती फॅमिली ट्रीप तरी सुरूच असतात.

या सहलीत एकत्र जमून गप्पागोष्टी, गाणी, डान्स, अंताक्षरी, दमशेरा यासारखे कित्येक खेळ खेळले जातात. प्रवास करताना गप्पा, गाणी, विनोद आणि हास्याने वातावरण प्रसन्न होते.वाटेत दिसणारी हिरवीगार शेते, धुक्याने वेढलेले डोंगर, खळखळ वाहणारे ओढे आणि पावसाच्या सरींनी सजलेला परिसर पाहताना मन आनंदाने भारावून जाते. यातुन सहकार्याची भावना, मैत्री आणि एकोपा अधिक दृढ होतो.

काहीजणांना पाण्यात उड्या मारायला, गच्च भिजायला आवडते, तर काहीना एके ठिकाणी शांतपणे बसून निसर्गाचा आस्वाद घ्यायला आवडते. चित्रकार कुंचल्याने हे रूप चितारतात तर कवींना, लेखकाना कित्येक नवीन कल्पना स्फूरतात. या ऋतुमध्ये स्वच्छ, सुंदर, प्रसन्न निसर्गाची रुपे सतत बदलत असतात. कधी काळ्याभोर ढगानी आकाश भरते, तर दुसऱ्याच क्षणी आकाशात वीजा लखलखतात, पाऊस कोसळतो. रंगीबेरंगी फुले, पाने, धबधबे, त्याचबरोबर विविध पशु, पक्षी दिसतात !

फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांना तर हा मौसम म्हणजे एक पर्वणीच वाटते. गड, किल्ल्ले, दुर्ग यांची सहल या दिवसात एकदा तरी मुलांसह आवर्जून करावी. त्यामुळे मुलांना ऐतिहासिक वास्तूंची ओळख तर होतेच, पण उंचावरून निसर्ग, हिरवागार परिसर खूप सुरेख दिसतो. मुख्य म्हणजे त्या काळी अशा मुसळधार पावसात शिवाजी महाराजांसहित सर्व मावळे, लोकांनी किती कष्ट सोसले असतील याची जाणीव होते,आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आयुष्यभर सोसलेली संकटे, हालअपेष्टा याची जाणीव होते. ऊर भरून येतो, मान अभिमानाने अधिक उंचावते. निसर्गाइतके उदात्त असणाऱ्या शिवाजी महाराजांसमोर आपण नतमस्तक होतो.

पण सहलीचा आनंद घेत असतानाच काही अडचणी सुद्धा असतात. सर्वांनांच याचा आनंद घेण्याची इच्छा असल्यामुळे लहान, मोठ्या गाड्या काढून सगळेच बाहेर पडतात. त्यामुळे विशेषतः सुट्ट्या असल्यावर, विकएन्ड ला तरी ट्राफीक जाम होते. कित्येक तास गाड्या अडकून पडतात. इंधनाचा अपव्यय होतो, सगळे रिसॉर्ट्स फुल असतात किंवा खूपच महाग असतात. अशावेळी खूपच चिडचिड होते, त्रास होतो. सगळ्यांना आजच बाहेर पडायचा मुहूर्त मिळाला आहे का ? असे वाटते, पण आपणही त्यातलेच एक आहोत हे सोयीस्करपणे विसरतो तेंव्हा.

त्यातून रस्त्याच्या दुतर्फा असलेले फेरीवाले ही तर एक वेगळीच गोष्ट आहे. खरंतर त्यामुळे कित्येकाना यातून पैसे मिळतात, गरीबांची पोटे भरतात, त्यांनाही लांबून विक्रीचे साहित्य आणावे लागत असते. मग त्यातून ते थोडा फार नफा काढणारच ना ? पण असा विचार कुणीच करत नाही, मिळेल त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून गावात किती स्वस्त असते, इथे त्याचेच दीडपट, दुप्पट पैसे घेतात असे म्हणत ते नाईलाज म्हणून घेतातसुद्धा आणि वर त्यांना बोलच लावतात. आपल्यालाच त्याचा त्रास होतो, हे लक्षातच येत नाही त्यावेळी ! त्यात पावासामुळे दरड कोसळणे किंवा पुलावर खूप पाणी येणे, पूर येणे असेही घडणारच.
नैसर्गिकच आहे ना हे ? पण ते लक्षात न घेता अशावेळी त्यामुळे जास्तच चिडचीड होते. मग या ट्रीपचे प्रयोजनच काय असा प्रश्न पडतो.

दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कित्येक ठिकाणी धोका आहे, सावधान, काळजी घ्या किंवा कुठे जाण्यास मनाई असल्याचे बोर्ड लावलेले असतानासुद्धा सुशिक्षित माणसेही आनंद मिळवण्याच्या नादात हटकून ते धुडकावून लावून तिथे जातात आणि मोठ्या समस्या स्वतः निर्माणकरून संकटे ओढवून घेतात. फोटो काढावेत पण त्याचेही भान ठेवणे गरजेचे असते. नको त्या अवघड जागी जाऊन फोटो, सेल्फी काढण्याच्या नादात किंवा स्टंट करण्याच्या नादात कित्येकदा जीव सुद्धा गमावले जातात. दररोज आपण बातम्यातून अशा गोष्टीं पाहतो, ऐकतो. दुर्दैवाने अपघात झाल्यामुळे मृत्यू झाला तर गोष्ट निराळी, पण हे नियम नं पाळता मजा म्हणून स्टंट करणे म्हणजे स्वतःनेच संकटाला आमंत्रण देणेच आहे, नाही का ?

लोक मजा करण्यासाठी म्हणून येतात, सुंदर निसर्गाचा आनंद लुटतात पण त्याचवेळी ठीकठिकाणी कचरा टाकून, खाण्याचे पदार्थ, कागद, युज अँड थ्रो च्या कित्येक वस्तू कुठेही फेकतात आणि या सुंदर निसर्गालाच विद्रुप करतात. त्याचे त्यांना वाईट सुद्धा वाटत नाही याची खंत वाटते. प्रत्येकानेच जर कचरा फक्त कचरापेटीत टाकण्याचा संकल्प केला आणि सगळे नियम पाळले तर आपला या सहलीतील आनंद नक्कीच वाढेल.
चला, वर्षा सहलीला जाऊ आणि पूर्ण जबाबदारीने मनमुराद आनंद लुटू.

स्नेहा मुसरीफ

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments