शिक्षण हे व्यक्तीच्या आणि समाजाच्या प्रगतीचे प्रभावी माध्यम असून, ज्ञानाच्या सामर्थ्यातून सामाजिक परिवर्तन घडवता येते, असे प्रतिपादन बेंगळुरू येथील साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्त्या परवीन कौसर यांनी केले.
त्या मुंबईतील माटुंगा येथील सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने ‘वंदे मातरम् १५०’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘वंदे मातरम् महिला अपूर्वम्’ या आभासी पद्धतीने आयोजित ‘शारदीय व्याख्यानमाला २०२६’ चे आ ‘नवदुर्गा : नवविचार’ या व्याख्यानमालेची काल चौथी माळ गुंफताना बोलत होत्या.

‘शैक्षणिक क्षेत्रातील महिलांचे योगदान’ या विषयावर बोलताना परवीन कौसर यांनी, शैक्षणिक क्षेत्रातील महिलांचे योगदान, त्यांचा संघर्ष, कर्तृत्व आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांवर प्रकाश टाकला.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा परिचय करून देत त्यांनी स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी त्यांनी त्यांच्या अम्मीच्या आणि त्यांच्या शिक्षिका श्रीमती फरीदा बेगम मॅडम यांच्या शैक्षणिक योगदानाचा धावता आढावा घेतला.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अर्चना पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विश्वभान प्रतिष्ठान संस्थेचे सौजन्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मी शेट्ये-तुपे यांनी केले तर सी.ए डॉ.सीमा शाह यांनी सर्वांचे स्वागत केले. सहाय्यक प्रा. माधवी पवार यांनी उपस्थितांचे आणि मान्यवरांचे आभार मानले. महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वाती परब हिने महालक्ष्मी स्तोत्र सादर करून वातावरण मंगलमय केले.
कार्यक्रमासाठी प्राध्यापक तसेच विद्यार्थीनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
