Homeलेखताटी उघडा ज्ञानेश्वरा : २

ताटी उघडा ज्ञानेश्वरा : २

“कलियुगाचे रहस्य”

एकदा पांडवांनी श्रीकृष्णाला विचारले, “हे केशवा, कलियुग काय आहे? या युगात काय घडणार आहे ?” तेव्हा श्रीकृष्ण मंद हसले आणि म्हणाले, “हे पांडुपुत्रांनो! तुम्ही सर्वजण वेगवेगळ्या मार्गांनी वनात जा! तिथे तुम्हाला विचित्र, विस्मित करणारे काही आढळले तर मला येऊन सांगा.” श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार वनात प्रवेश करताच युधिष्ठिराला एक दुसोंडी हत्ती दिसला. या हत्तीला दोन सोंडी का आहेत? युधिष्ठिराला काही कळेना; तो श्रीकृष्णाकडे परतला.

तिकडे वनात अर्जुनाच्या कानावर एक अत्यंत मंजूळ शीळ आली. मोहित होऊन त्याने त्या दिशेने पाहिले. समोर एक अत्यंत सुंदर पक्षी गाणे गात होता. त्याच्या रंगीत पंखांवर वेदांतील ऋचा अंकित होत्या. अर्जुन जणू ओढल्यासारखा त्या पक्ष्याच्या दिशेने गेला; पण जवळ जाऊन पाहतो तर काय? तो पक्षी एका जिवंत सशाचे मांस खात होता.वेदनेने विव्हळणाऱ्या त्या कोवळ्या जीवाची त्याला अजिबात पर्वा नव्हती. तो भीषण विरोधाभास पाहून हादरलेला अर्जुन श्रीकृष्णाकडे धावला.

भीम, नकुल, सहदेव यांचेही अनुभव काही फार वेगळे नव्हते. दृष्टीस पडलेल्या विचित्र घटनांनी ते पाचही पांडव व्याकूळ झाले होते. तेव्हा त्यांना शांत करत श्रीकृष्ण म्हणाले, “अरे, हेच तर कलियुग आहे! इथे माणसांचा व्यवहार दुतोंडी असेल; बोलतील एक, करतील दुसरेच. शुल्लक फायद्यासाठी लोक इथे नैतिकता सोडून एकमेकांचे शोषण करतील आणि त्याहूनही भयप्रद म्हणजे, इथे असे अनेक मनुष्य असतील जे दिसायला थोर, ज्ञानी आणि ध्यानी वाटतील; पण प्रत्यक्षात अनैतिक आणि अत्याचारी असतील. त्यांच्या ज्ञान, कला आणि विद्यांच्या प्रदर्शनाने लोक त्यांच्याकडे मोहित होतील; त्यांचे स्तवन-पूजन करतील, पण त्यांच्या मनी मात्र तो सात्त्विक भाव कधीच नसेल. त्यांचे पद, प्रतिमा आणि अहंकारच त्यांच्यासाठी सर्वोच्च असेल; त्यासाठी इतरांच्या विश्वासाचा, सौजन्याचा गळा घोटायला ते मागे-पुढे पाहणार नाहीत.”

आता तुम्हीच सांगा, ज्याच्या केवळ संकेताने अर्जुनादी पांडव गोंधळले, नखशिखांत हादरले; त्या कलियुगात आपण सामान्य माणसांनी कसे जगायचे? जिथे सत्य आणि मिथ्य यांतील फरकच दृश्यमान नाही! जागोजागी सापळेच लावलेत, तिथे आपला मार्ग कसा शोधायचा? त्या मार्गावरील सहचर-सोबती कसे निवडायचे? आपले-परके कसे ओळखायचे? कुणाच्या तडाख्यात सापडलोच, तर तिथून सहीसलामत बाहेर कसे निघायचे? मनावर जखमा झाल्या, तर फुंकर कुणी घालायची? ज्याने मदतीसाठी हात पुढे केलाय, तो खरंच मलमपट्टी घेऊन आलाय की तिखट-मीठ; हे आपल्याला कसे कळणार? अशा वेळी जगाशी संबंधच तोडायचा की पुन्हा पुन्हा नवा शोध सुरू ठेवायचा? सर्व काही सुरळीत होईल, या वेड्या आशेने विषाची परीक्षा घेत राहायचे की स्वतःच विषाक्त व्हायचे? जीवन एक, प्रश्न अनेक… भोवती घोंघवणारी वावटळंच जणू!

जिथे मानवता आणि नैतिकता पणाला लागली आहे, लोकांच्या घरांपेक्षा त्यांचा अहंकार मोठा झाला आहे, सत्य व ज्ञानापेक्षा कर्मठ बडेजाव मोठा ठरला आहे; तिथे ज्ञानेश्वरांसारखा ज्ञानी विरक्तही उद्विग्न होतो. तुकाराम महाराजांना आपली गाथा बुडवायला बाध्य केले जाते; अशा समाजात तुम्हा-आम्हाला निवांतपणा कुठून लाभणार? पण तरीही, हताश होण्याचे काही कारण नाही. ज्ञानोबा काही शेवटपर्यंत स्वतःला कोंडून बसले नाहीत; ते ताटी उघडून बाहेर आले आणि जगाचे उद्धारक झाले. तुकारामांची गाथाही पुन्हा पाण्यावर तरली आणि संपूर्ण जगासाठी तारक झाली. म्हणतात ना – ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं।’

प्रश्न आहेत तिथे आपल्याला उन्नत करणारे उत्तरही असणारच; आपण फक्त ते संकेत ओळखायला हवेत. या जगाच्या बजबजपुरीतही सुखी व्हायचे असेल, तर संतत्व अंगी बाणवायला हवे.

पण हे संतत्व म्हणजे काय? सगळ्यांनीच ही जगरहाटी सोडून वैराग्य पत्करायचे की काय? नाही! त्याची मुळीच गरज नाही. रंगीत वस्त्रे, कर्म आणि कुटुंब यांचा त्याग करून काय साध्य होणार? मनात कल्लोळ घेऊन गेलो, तर हिमालयात तरी शांती कुठून मिळणार? त्यापेक्षा इथेच अंतरंगाची शुद्धी करायला काय हरकत आहे? मुक्ताईंचे ‘ताटीचे अभंग’ तेच तर सांगतात…
क्रमशः

— लेखन : सृष्टी गुजराथी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vedvati Kulkarni on खरा डॉक्टर
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on प्राणांचे झुंबर…
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on आम्ही सिद्ध लेखिका : ठाणे, पुणे वृत्तांत
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on सुभाषित विवेचन : 2
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on शिक्षण : भारतीय मानसिकतेचा शोध