(हे मनोगत सर्व मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी असून ते कुणाच्याही विरोधी नाही). शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारी २०२७मध्ये पुण्यात संपन्न होत आहे.
२०२४ मध्ये केंद्र शासनाकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त मिळाल्यानंतर, मराठीची सध्याची स्थिती आणि उज्वल इतिहासाची चर्चा करण्यासाठीचे हे मोठे व्यासपीठ असणार आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर, या भाषेच्या विकासाची चर्चा सगळीकडं झडत असताना, इथं मी काही विचार मांडू इच्छितो.
प्राचीनता, समृध्द साहित्यिक वारसा आणि अद्वितीय सांस्कृतिक महत्व, अशा निकषांवर मराठीचे महत्व राष्ट्रीय पातळीवर या निर्णयाने मान्य केले आहे.
या चांगल्या निर्णयाने, केंद्राकडून मराठी भाषेच्या विकासासाठी भरीव आर्थिक मदत मिळणार आहे.यातून काही शैक्षणिक पदे निर्माण होतील अशी आशा वाटते. यातून मराठी भाषेचा सखोल अभ्यास, संशोधन होऊ शकेल ह्या बाबी नक्कीच आनंददायक आहेत.
पण या सकारात्मक बाबींनी हुरळून जाण्याची गरज नाही. मराठी भाषेचा विकास व्हावा, अशी इच्छा बाळगणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या भूमिकेतून काही मुद्दे स्पष्ट करतो. व.पु.काळे एका ठिकाणी म्हणतात तसं, ‘स्काय इज द लिमिट’ असं वाक्य प्रचलित असलं तरी, प्रत्येकानं आपापला आकाशाचा आवाका ओळखला पाहिजे, निश्चित केला पाहिजे.
सर्वसामान्य माणसाला या परिस्थितीत काय करणं शक्य होईल ?
१) अगदी प्राथमिक शाळेपासून विद्यापीठापर्यंत ज्या अनेक संस्था आहेत, त्या शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची केंद्रं आहेत; जिथं सळसळत्या तरूणाईने भारलेले तरूण असतात. अशा केंद्रांतून वक्तृत्व, वादविवाद, चर्चासत्रे, निबंध अशासारख्या, तेथील तरूणांना सहभागी करून घेणारे लोकप्रिय उपक्रम/ स्पर्धांचे आयोजन करून, या तरुणाईच्या माध्यमातून मराठीवर सतत चर्चा घडवून आणता येईल.
अध्ययन आणि अध्यापन यांचे माध्यम हे मराठीतूनच करण्याचा आग्रह धरला जावा.या दृष्टीने संबंधित अभ्यासमंडळांनी अभ्यासक्रम/पूरक साहित्य हे सुलभ मराठीत तयार करण्याचा प्रयत्न करावा.
२) समाजात आर्थिक उलाढाली होणाऱ्या संस्था (उदा. बॅंका, सहकारी पतपेढ्या इ.) न्यायालये, विविध शासकीय, अशासकीय, निमशासकीय संस्था या नियमितपणे लोकांच्या जीवनाशी संबंधित असतात.
त्यांच्यातून लोकांना मदत आणि माहिती घेऊन लाभ घेण्याच्या दृष्टीने, त्यांच्यातील व्यवहार सोप्या, सुटसुटीत मराठीत होणे गरजेचे आहे.अनेक संस्थांचे तसे मराठीत व्यवहार चालतात. मात्र, ‘त्याची उपयुक्तता आणि लोकांना त्यात काही अडचणी वाटत नाही का ? त्यात सातत्याने बदल’ करता येईल का ? ‘यावर नेहमी स्थानिक लाभधारक लोकांकडून फिडबॅक घेणे आवश्यक आहे.
३) ‘बारा मैलावर भाषा बदलते ‘असं म्हणतात. ठिकठिकाणच्या भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीतीनुसार विविध ठिकाणच्या बोलीभाषा बोलल्या जातात आणि बदलतातही. या बोलीभाषा लोकांच्या संवादाचे जसे माध्यम असतात, तसेच ते संबंधित संस्कृतीचे प्रतिकही असतात.
भाषा ही काळानुसारही बदलते.बोलीभाषेची वैशिष्ट्ये,सामाजिक व्यवहारात त्यांचे स्थान, त्यांच्या प्रसारासाठी ज्ञात आणि अज्ञात व्यक्तिं/ संस्थांनी केलेले योगदान याचेही विविध स्तरांवर संशोधन झाले पाहिजे.
आपल्याकडे संशोधनालाही काही चौकटी असतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला त्याची भिती आणि पर्यायाने तिटकारा येतो आणि तो संशोधनापासून बाजूला रहातो.समाजातील प्रश्नांची उकल करण्याचे आणि काही चमकदार बाबी शोधण्याचे ते उत्तम साधन असते, असा दृढ विश्वास त्याच्या मनात निर्माण झाला तर, संशोधन ही त्याची आवड आणि छंद होईल. मराठी साहित्य विकासात त्याचा उपयोग करून घेता येईल.
आपल्याकडे छपाईचे तंत्र विकसित होत असताना, इथं पुण्यातल्या पेशव्यांची सत्ता होती. म्हणून त वापरतात ती मराठी भाषा ही ‘प्रमाण मराठी’ समजली जाऊ लागली.तरीपण इतर बोलीभाषा (उदा. वर्हाडी, कोकणी, मालवणी,अहिराणी इ.) याही मराठीचे वैभव आहेत.
आज इंग्रजी ही जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा समजली जाते. मला वाटतं की, याचं एक कारण म्हणजे जगातील अनेक भागांत राज्य करताना, इंग्रजांनी ती सगळीकडे नेली. पण इंग्रजीत अनेक स्थानिक शब्दांचा आंतर्भाव आहे. आजच्या सोशल मिडियाच्या काळात मराठी बोलताना, इतर भाषांची त्यात सरमिसळ झाली म्हणून ती अशुद्ध झाली किंवा तिच्यावर आक्रमण झाले असं समजणं चूक आहे.जोवर मराठी माणूस जिवंत आहे, तोवर मराठीला भिती नाही हेच खरं.
मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर नवी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त मी एक कविता लिहिली होती. तिची आठवण येते ;
‘देशाच्या शीर्षनगरी
साहित्य संमेलन होताना,
संसदेच्या कोर्टात
न्याय मिळाल्याचा आनंद
ओसंडून वहाताना,
उधळा गुलाल होऊन बेभान,
ठेवा फक्त एक भान;
अमृताच्या पैजा जिंकणारी,
चामुंडराये करवियलेली
ही श्रीमंत भाषा
सरकारी हापिसातून झिरपू द्या,
इथल्या माणसांची तहान
त्याने भागू द्या;
कोर्टातून, बॅंकांतून आणि
शाळा काॅलेजांतून ती खेळू द्या,
रडणा-यांचे डोळे पुसणारे
ते हसरे फूल होऊ द्या !’
मराठी वापरा, मराठी वाढवा आणि मराठी वाचवा…
या निमित्ताने अजून दोन बाबींचा उल्लेख करणं मला आवडेल.
१) महाराष्ट्रातील लोकजीवनाच्या विद्यापीठाचे अनभिषिक्त निरक्षर कुलगुरू असा ज्याचा गौरव केला जातो, त्या पूज्य गाडगेबाबांच्या कीर्तनाचे वर्णन करताना एका अभ्यासक सांगत होते की, एखाद्या गावातील बाबांचे कीर्तन हा एक अवर्णनीय सोहळा असे. कुठेतरी पटांगणावर कंदिलाच्या किंवा पेट्रोमॅक्सच्या उजेडात बाबांच्या कीर्तनाला त्या गावच्या आजूबाजूलाच्या परिसरातील हजारो माणसं उपस्थित असत. अगदी मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या कीर्तनात, तेव्हा खेड्यात लाईट असणं अशक्य आणि म्हणून माईकही बहुतेक वेळा नसायचा. पण कीर्तनात मधूनमधून बाबा दोन्ही हात वर करून ‘गोपाला, गोपाला देवनकीनंदन गोपाला’ असं पालुपद म्हणत; तेव्हा तिथं हजर असलेली ती सर्व माणसंही मोठ्यांदा ते म्हणत. कीर्तनाच्या शेवटी बसलेल्या माणसांना विचारलं की, ‘इतक्या दुरून तुम्हाला बाबांचं कीर्तन ऐकायला येत नसेल तरी तुम्ही का येता ?’
यावर त्यांचं उत्तर विलक्षण होतं.उत्तर होतं,”आम्ही गाडगेबाबांचं कीर्तन पहायला येतो”. कीर्तन ऐकता येतं हे आजपर्यंत आपण ऐकत आलो आहोत. पण कीर्तन पहाणं जो केवळ वाक्प्रचार नव्हता; तर ते आपलेपणाचं नातं सांगणारा जिव्हाळा होता.मराठी भाषेला नवीन वाक्प्रचार होता.
माझ्या माहितील एक कुटुंब सुट्टीत सिंहगडावर गेलं होतं. सिंहगड; तिथं डोंगर, झाडी होतीच. पायवाटही काहीशी ओबडधोबड होती. गडावरून पायी उतरताना त्या कुटुंबातील छोटी मुलगी अचानक ओरडली,” आई, किंचोळा”. तिनं एक कीटक पाहिला होता.vमात्र पाहिलेला किटक तिच्या शब्दांत किंचोळा होता.

माझ्यामते तरी तो नवीन शब्द असेल. अशी अनेक उदाहरणं आहेत की, जेथे सर्वसामान्य माणूस व्यवहारात नकळत नवनवीन शब्द/वाक्ये किंवा वाक्प्रचार निर्माण करतो.मला वाटतं यातून भाषा समृद्ध होत जाते. अनेक शिक्षणसंस्थांतून, मराठी भाषेवर संशोधन सुरू आहे.त्यांनी अशा नवीन शब्दांना संकलित केलं तर हा चांगला उपक्रम असेल,
२) आणखी एक विचार. अर्थात अनेकजण ते बोलतातही. त्याचा पुनरूच्चार करतो इतकंच. मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्यांनी नियमित नव्हे तर जमेल तसं काही कुटुंबांशी बोलावं आणि एकतरी मराठी पुस्तक विकत घेऊन ते वाचावं असा सल्ला द्यावा. त्यांनी जमल्यास, त्यावर इतरांशी बोलावं.अगदी कुणाला शक्य नसेल तर, आपण जिथं काम करतो तिथं तरी फावल्या वेळात मराठी पुस्तकांवर चर्चा करता येईल किंवा सोशल मिडीयावरूनही यावर इतर उहापोह करता येईल.मराठी न बोलल्या जाणाऱ्या कुटूंबात याची गरज काय? असा मुद्दा उपस्थित होईलही.अशा ठिकाणी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून, जगण्याच्या व्यवहारात मराठी वापरणं ही गरज आहे,हे त्यांना पटवून देऊन, त्यांच्या आवडीच्या विषयांतील लहान लहान पुस्तकं सुचवता येतील. अर्थात अशी सूचना करताना,कोणतीही राजकीय किंवा सांप्रदायिक विचारसरणीचा प्रचार करू नये हे पथ्य कसोशीने पाळावे.
काही मराठी भाषेतील समूहांवर याविषयी उत्तम उपक्रम सतत सूरू असतात. हे नक्कीच आनंददायक आणि अनुकरणीय आहेत. त्याच्या पटी वाढवल्या जाव्यात.

— लेखन : प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ. लंडन
— संपादन : ‘देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
