“संकल्प आणि चहा”
खिडक्यांचे दोन प्रकार असतात. पहिला प्रकार ज्यात या खिडक्या स्थिर असतात आपल्या घराला असलेली खिडकी किंवा कार्यालयातील खिडक्या थोडक्यात पक्क्या बांधकामातील ज्या खिडक्या असतात त्या स्थिर असतात. अशा खिडक्यांमधून जेव्हा आपण बाहेर बघतो तेव्हा बाहेरचा ठराविक परिसर हा आहे तसाच स्तब्ध असतो. ज्या काही नैसर्गिक हालचाली होतील तेवढ्याच आपल्याला दिसतात. मग आपण आतून बाहेर पाहत असलो तरी सुद्धा, आणि बाहेरून आतील जग जेवढे दृष्टीपथात येतं ते सुद्धा.
दुसऱ्या प्रकारातील खिडक्या या स्थिर नसतात. जसे वाहनांच्या खिडक्या, मग ती ट्रेन असो, बस असो की अन्य कुठलेही चार चाकी वाहन असो! विमानांच्या खिडक्यांची तर बातच काही और, त्यांचा आवाका फार मोठा असतो. आणि वेग ही जबरदस्त असतो. या खिडक्यांमधून आपल्याला धावतं जग दिसतं. जसा गाडीचा वेग तसं आपल्या समोरच जग बदलतं. क्षणाक्षणाला खिडकीपलीकडील चित्र बदलत जातात. ती गाडी एखाद्या ठिकाणी उभी असेल तरच बाहेरच्याला आतील दृश्य दिसतं वेगात असणाऱ्या गाडीच्या खिडकीतून बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला फार काही दिसतच नाही.
लहानपणी मला गाड्यांमधून प्रवास करताना खिडकीचे प्रचंड आकर्षण होते. अर्थात खिडकीजवळ बसणं कुणाला आवडत नाही? प्रत्येकाला ती हवी असते. आजही रिझर्वेशन चा फॉर्म भरताना विंडो सीट ही प्रायोरिटी निवडताना मी बरेच जण बघितलेत. कारण ट्रेनचा प्रवास असेल आणि विंडो सीट असेल तर बातच काही और त्यामुळे प्रत्येकाची इच्छा ही विंडो सीटच असते. वाऱ्याच्या वेगाने धावणारी ट्रेन, आणि त्याच वेगाने विरुद्ध दिशेने धावणारे जग. आपण शांत बसून फक्त बघत राहायचे, निरीक्षण करायचे. वेगवेगळी स्टेशनं, वेगवेगळी गावं, दिसणारे रस्ते, जंगल, पहाड. अधून मधून तेथे वावरणारी काही माणसे, इतर प्राणी, सकाळ, दुपार, रात्र हे सगळं एका जागी शांत बसून बघणं हा अनुभवच वेगळा असतो.
आज बऱ्याच दिवसांनी ट्रेनच्या प्रवासाचा योग आला आणि आवडती विंडो सीट देखील मिळाली. खिडकीत मान टेकून लागणाऱ्या वाऱ्याचा आनंद घेत मी बाहेर बघत होतो. कानात ब्लूटूथ लावून मी शांत पणे गाण्यांचा आनंद घेत होतो. आता ना ऑफिसची काम होती, ना घरच्या काही अडचणी. आणि ना मित्रांच्या समस्या. प्रवासाचा हा वेळ फक्त माझा होता.
नागपूर ते मुंबईचा प्रवास होता. संध्याकाळची विदर्भ एक्सप्रेस, मावळतीचा सूर्य मी खिडकीतून पाहत होतो. वर्ध्याला ट्रेन थांबली प्लॅटफॉर्म माझ्या खिडकीच्या साईडला झाला स्टेशन वरची लगबग सुरू होती आणि माझ्या खिडकीसमोर एक चहा वाला आला. मला चहा मनापासून आवडतो चहाचे आणि माझे एक वेगळेच नाते आहे या छान प्रवासात खिडकीत बसून चहा घ्यावा अशी इच्छा झाली. खिडकीच्या बाहेरील प्लॅटफॉर्मवरून खिडकीच्या आत डब्यात माझ्या हातामध्ये वाफाळलेल्या चहाचा तो कप आला. सिग्नल मिळाला, आणि ट्रेनचा प्रवास पुन्हा सुरू झाला. आधी संथ गतीने सुरू झालेली ती ट्रेन, हळूहळू तिने वेग पकडला. चहाचा एक एक घोट घेत, गाणी ऐकत बाहेरील दृश्य बघताना मला या चहाची एक गोष्ट आठवली…..
बिट्टू एक छान गोड मुलगी आणि तिचे वडील अजय यांची ती गोष्ट !
मी लहान असताना आम्ही ज्या चाळीत राहायचो अजय अंकल तिथेच आमचे शेजारी होते. अजय अंकल चे नेमके शिक्षण काय होते हे मला माहित नाही. पण त्या माणसाला बऱ्याच गोष्टींचे ज्ञान होते. त्यांच्याकडून मी बरंच काही शिकलो होतो. त्या माणसाचे हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेवरील प्रभुत्व वाखाणण्याजोगे होते. या दोन्ही भाषातील साहित्याची त्यांना जाण होती. त्यांचे वाचन अफाट होते. त्यांच्याशी कोणत्याही विषयावर बोलताना जी उदाहरणं ते द्यायचे ती कमाल असायची. चित्रपट, नाट्य, साहित्य, राजकारण, समाजकारण, एकही विषय असा नव्हता ज्याबाबत अजय अंकलला माहिती नव्हती. बातम्या ऐकणे हे मला कधीच आवडले नव्हते पण नियमित बातम्या ऐकण्याची सवय मला अजय अंकलने लावली. राजकारण अतिशय सोप्या पद्धतीने मी त्यांच्याकडूनच शिकलो. बिट्टू ही त्यांची मुलगी. बिट्टू सहा महिन्यांची होती तेव्हापासून ती आमच्या घरातच असायची.
संध्याकाळी अंकल कामावरून आले की बिट्टूला घ्यायला ते आमच्या घरी यायचे. त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीला, ‘मी बिट्टूला घेऊन लगेच येतोय’ असे सांगून ते यायचे. मात्र आल्यानंतर काही ना काही विषय निघायचा आणि मग गप्पांची मैफिल रंगायची.
गप्पा सुरू असताना अचानक बाबा चहाची आठवण करायचे. आई तातडीने चहा बनवायची. हा चहा म्हणजे अजय अंकलचा जीव की प्राण असायचा. अजय अंकला चहाचे व्यसन होते. दिवसभरात ते किती चहा प्यायचे याची काही गिनतीच नसायची. मग चहा घेताना अजून एखादा नवीन विषय निघायचा. तो विषय संपत आला की पुन्हा एक चहाचा राऊंड असायचा.
लहान मुलांनी चहा घेऊ नये असे काहीसे नियम आमच्या घरी होते. आणि मला देखील चहाची तशी फारशी काही आवड कधी नव्हतीच. पण अजय अंकल आमच्या घरी यायला लागले, त्यांच्या त्या गप्पांच्या मैफिलीमध्ये चहाचे राऊंड व्हायला लागले, आणि मी देखील चहा घ्यायला लागलो. अजय अंकल च्या गप्पा ऐकताना चहाची चव काही वेगळीच लागायची. अजय अंकल, त्यांच्या गप्पा, आणि चहा…! असे एक वेगळेच समीकरण त्या काळात मी अनुभवले होते. माझ्या आयुष्यात चहा अजय अंकलमुळे आला हे नक्की.

त्यांची पत्नी त्यांना चहाबाज म्हणायची. चहाबद्दल अजय अंकलचे कोणतेही नियम नव्हते. चहा प्रत्येकाने प्यावा, चहाचा आस्वाद सगळ्यांनी घ्यावा, त्यात वयाचे बंधन नसावे असे त्यांचे मत होते. त्यामुळे जो मागील त्याला चहा द्यावा असे त्यांचे धोरण होते. त्यामुळेच आई-बाबांचा विरोध असताना देखील मी चहा प्यायला सुरुवात केली. आणि अजय अंकलने मला पूर्ण पाठिंबा दर्शवला. त्यांचा हा स्वभाव माहित असल्यामुळेच , त्यांच्या मुलीला म्हणजे बिट्टूला चहा द्यायचा नाही अशी सक्त ताकीद त्यांच्या पत्नीने आमच्या घरी देऊन ठेवली होती. कारण बिट्टू, आम्ही सगळे जेव्हा चहा घ्यायचो तेव्हा चहाचा हट्ट धरायची.
एकदा तिला आम्ही थोडा चहा दिला. पण बिट्टू ने ते घरी जाऊन तिच्या आईला सांगितले. त्यामुळे ही मुलगी भरोशाची नाही हे आमच्या लक्षात आले. आणि आम्ही तिला चहा देणे थांबवले. पण पुढे काही दिवसांनी त्यांच्या पत्नीचा विरोध मावळला आणि सगळ्यात छोटी बिट्टू देखील आमच्या या चहा पार्टीत सामील झाली. अजय अंकलचे ट्रान्सफर होईपर्यंत संध्याकाळच्या गप्पा आणि चहा ही मैफल रंगत राहिली.
पुढे त्यांची ट्रान्सफर झाली, आणि अजय अंकल आमची चाळ सोडून निघून गेले. पण तरीसुद्धा संध्याकाळी तीन ते चार वेळा चहा घेण्याची ती सवय आमची सुटली नाही. आता या चहाच्या राऊंडमध्ये अजय अंकल नव्हते, पण ही प्रथा त्यांनीच पडली होती हे मात्र आम्ही विसरलो नव्हतो. कित्येकदा संध्याकाळचा असा चहा घेताना आवर्जून आम्हाला अंकल आणि बिट्टू ची आठवण यायची. कधी सुट्ट्यांमध्ये जमेल तसे आम्ही अंकलला भेटायला जायचो. त्यावेळी त्यांच्या घरी मुद्दाम संध्याकाळपर्यंत थांबायचो.मग संध्याकाळ झाली की चहाचे राऊंड सुरू व्हायचे, आणि जी मैफिल पूर्वी आमच्या घरी व्हायची तशीच मैफिल त्यांच्या घरी जमायची.
काळ पुढे सरकत गेला. माझे उच्च शिक्षण आणि नंतर नोकरी या निमित्ताने आमची देखील चाळ सुटली. सर्व रुटीन बदलले, गरजा बदलल्या, वातावरण बदलले, पण एक गोष्ट जी कायम राहिली ती म्हणजे चहा! अजय अंकल प्रमाणेच मलाही चहाचे व्यसन लागले. अंकल सोबत कधी फोनवर बोलणे झालेच, तर इतर विषयांबरोबर चहाचा विषय देखील निघायचा. आणि अंकल गमतीने म्हणायचे ‘बिट्टू आणि तू, तुम्ही दोघे माझा वारसा चालवणार.’ कारण बिट्टूलाही अंकल प्रमाणेच चहाचे व्यसन लागले होते. आम्ही दिवसभरात कितीही चहा घेऊ शकतो असा आमचा लौकिक होता. आम्ही पक्के चहाबाज झालो होतो.
साधारण वर्षभरापूर्वी अचानक अजय अंकल वारल्याची बातमी समजली. मन सैरभैर झाले. एखादी छानशी, सुंदर रांगोळी कोणीतरी निर्दयपणे विस्कटावी तसं काहीच वाटलं. वेळेप्रमाणे सगळीच गणितं जरी बदलली होती. गेलेला काळ जरी पुन्हा वापस येणार नव्हता. तरीसुद्धा अजय अंकल जोपर्यंत होते तोपर्यंत त्या सगळ्या आठवणी या जिवंत वाटत होत्या. मी चहा घेत असताना, आता अंकल देखील कुठेतरी चहा घेत असतील कुणाशी तरी गप्पा मारत असतील असे वाटायचे. पण अंकल गेल्याची बातमी कळल्यानंतर हातात येणारा प्रत्येक चहाचा कप मला अस्वस्थ करून जात होता. आणि त्यामुळेच माझा चहा हळूहळू कमी होत गेला. पूर्वी जशी चहाची तलफ यायची तशी आता येत नव्हती.
अजय अंकल वारले तेव्हा मी परगावी होतो. जवळपास दोन महिन्यांनी मी परत आलो, आणि मग बिट्टू ची भेट घ्यायला त्यांच्या घरी गेलो. अशा प्रसंगी काय बोलावे हे खरंच सुचत नाही. आणि त्यात जर ती व्यक्ती आपल्या अत्यंत जवळची आणि जिवाभावाची असेल तर खरोखर शब्द सापडत नाही. माझी तीच अवस्था होती. थोडा वेळ शांततेत गेल्यावर बिट्टूनेच एक एक विषय काढायला सुरुवात केली. तिचे नुकतेच संपलेले शिक्षण, तिने नवीन जॉईन केलेला जॉब, आणि इकडचे तिकडचे विषय. आणि या गप्पा सुरू असतानाच ऑंटी चहाचा कप घेऊन आली…
अंकलच्या घरात अंकल नसताना चहा घेण्याची ही पहिलीच वेळ, त्यामुळे चुकल्या चुकल्यासारखे वाटले. व त्याचवेळी लक्षात आले की आंटी चहाचा एकच कप घेऊन आली आहे. अंकलला चहा जितका आवडायचा, तितकाच चहाचा राग ऑंटी करायची. त्यामुळे आंटी चहा घेत नव्हती हे माहित होते. पण इथे बिट्टू पण होते मग चहाचा एकच कप कसा?
मी थोडा संभ्रमात पडलो. बिट्टूला माझा संभ्रम लक्षात आला. तिने चहाचा कप उचलला, आणि माझ्या हातात दिला. न राहून मी तिला विचारले,’ बिट्टू तू चहा घेणार नाही?’
यावर एक उसाचा टाकत बिट्टू म्हणाली, ‘चहा माझ्या बाबांबरोबरच गेला…..’
असं म्हणतात की एखादी जवळची प्रिय व्यक्ती गेली की तिच्या आठवणीत एखादा संकल्प करावा. बिट्टू ने कधीच चहा न घेण्याचा संकल्प केला. चहा प्यावा तो वडलांबरोबरच, ती चव वडील नसताना येणार नाही. वडील गेले आणि बिट्टूच्या आयुष्यातील चहा देखील गेला…..
मी मात्र आंटी ने आणलेला तो चहा घेतला. तोही अजय अंकलच्या आठवणी जागवण्याकरताच. बिट्टू ने जसा चहा सोडला तसा मी सोडला नाही. अजय अंकल ची आठवण राहावी म्हणून मी तो आजही पीत असतो कदाचित हा माझा संकल्प असावा…..
क्रमशः

— लेखन : किरण आचार्य.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
