सदगुण विकृती
सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानीं पडो।
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो॥
मोरोपंतांच्या या केकावलीने आपल्यापैकी अनेकांचे आयुष्य समृद्ध आणि शिस्तबद्ध देखील केले आहे. शाळेत असताना पालक आणि शिक्षक नेहमी सांगायचे— चांगल्या व हुशार मुलांबरोबर बसा, म्हणजे हुशार व्हाल! तरुण वयात तर संगतीवरून घरोघरी सगळ्यांनाच प्रवचने ऐकावी लागतात; पण ही सुसंगती नेहमीच सुसह्य असते का ?
जसे आपले आई-बाबा सांगतात की हुशार मुलांबरोबर राहा; तसे त्या हुशार मुलांचे आई-बाबा पण त्यांना तेच सांगत असतीलच ना! म्हणूनच मग ती मुले सामान्य मुलांना अव्हेरतात, त्यांच्यापासून फटकून वागतात. कॉलेजमध्ये करिअर ओरिएंटेड मुलं बव्हंशी एकलकोंडीच असतात; इतरांशी साधे हसून बोलणेही त्याला वेळ वाया घालवण्यासारखे वाटते. ऑफिसमध्ये सचोटीने वागणारे लोक बऱ्याचदा ‘विक्षिप्त’ म्हणून ओळखले जातात; आपण सोडून सगळे जग वशिल्यावर चालते आणि पैशाच्या तालावर नाचते, याची त्यांना पक्की खात्रीच असते. सात्त्विक संतापाने त्यांचा अगदी तिळपापड होत असतो.
अध्यात्मात तर गोष्टच निराळी! ज्याच्या मुखी अखंड नामजप असतो, त्याचे सोवळे-ओवळे सांभाळताना इतरांची तारांबळ उडते. अखंड पूजापाठात बुडालेले लोक नेमके ‘जमदग्नी’ निघतात! आणि अशा सगळ्या सात्त्विक संतापी जमदग्नींना उद्देशून मुक्ताईंचा एकच रोकठोक सवाल असतो—
एक आपण साधू झाले। येर कोण वाया गेले ?॥
मी ज्ञानी असेनही, पण म्हणून काही बाकीचे पदभ्रष्ट ठरत नाहीत. प्रत्येकाचा पाठ निराळा, इतकेच! एकदा का अवघे विश्व ब्रह्ममय मानले, की इतरांच्या कर्माचा हिशेब ठेवण्याचा अधिकार आपल्याला राहत नाही. माझ्या वाट्याला आले ते मी सचोटीने करणार… बस्स! उगाच संघर्ष नको, वादविवाद नको! ‘तू तुझ्या जागी, मी माझ्या जागी’ असे म्हणत प्रत्येकाने सरळ वाट धरली, तर कुणी कुणाच्या वाकड्यात शिरण्याचे काही कारणच राहत नाही.
उठे विकार ब्रह्मीं मूळ। अवघें मायेचें गबाळ॥

पण या सचोटीला ‘ग’ची बाधा झाली, तर मात्र पतन ठरलेले! ‘मी करतोय’ याचा अहंकार निर्माण झाला, तर त्या अहंकाराला तृप्त करणाऱ्या आशा-आकांक्षाही जागतील. त्यांची तृप्ती झाली नाही, तर मद, मत्सर आणि क्रोधाचा जन्म होईल. या सगळ्या मोहमायेच्या पसाऱ्यात, मूळ शांतीचे उद्दिष्टच लुप्त होईल; मग ज्याचा अहंभाव मिरवतोय, त्या ज्ञानाचे आणि सद्गुणाचेच प्रयोजन राहणार नाही! या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे असेल, तर मुळातून या मायेलाच उखडून टाकावे लागेल.
माय समूळ नुरे जेव्हां। विश्व ब्रह्म होइल तेव्हां॥
ऐसा उमज आदिअंतीं। मग सुखी व्हावें संतीं॥
जे आपली निर्भत्सना करतात ते आपले नसतात आणि जे जयजयकार करतात तेही आपले नसतात! जय-पराजय हा सगळा मायेचा खेळ. या मायेला समूळ बाजूला ठेवले, तरच सत्याचे दर्शन शक्य आहे. जरा जरी मोहात अडकलो, तर हजार सद्गुणांवर पाणी फेरणारा प्रवाद हा ठरलेलाच! शिवाय, अद्वैताकडून द्वैताकडे पतन आहेच. जी जाणीव ठेवून जो वागतो, सद्गुणांची आरतीही ज्याच्यावर प्रभाव टाकत नाही, तोच खरा सुखी! म्हणूनच मुक्ताई म्हणतात—
चिंता क्रोध मागें सारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा॥
उद्या काय होईल यावरही विचार करू नका आणि काल काय झाले यावरही तणतण नको! जे झाले ते होऊन गेले, जे व्हायचे आहे ते होईलच. आज, आत्ताचा हा क्षण विवेकाने जगायचा, एवढेच आपल्या हाती आहे. त्या क्षणाला मात्र विकारांच्या विटाळापासून वाचवायचे; तेवढेच पुरे !
क्रमशः

— लेखन : सृष्टी गुजराथी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
