Homeलेखआय आय टी : समज गैरसमज

आय आय टी : समज गैरसमज

एका आत्महत्येमुळे अचानक आय आय टी चर्चेत आहे. आय आय टी विषयी एकूणच समाजात अनेक गैरसमज आहे. आय आय टी ची क्रेझ, आय आय टी म्हणजे क्रीम ऑफ इंटेलिजन्स, आय आय टी प्रवेश म्हणजे आकाश कवेत घेणे, तिथली पदवी म्हणजे उत्तम पगाराच्या नोकरीची गॅरंटी, तिथले शिक्षण अत्युत्तम हे गृहीत धरले जाते. “दुरून डोंगर साजरे” अशी एक म्हण आहे.

वरील अनेक विधानात तथ्य आहे हे मान्य केले तरी याची दुसरी बाजू देखील आहेच. आधी चांगल्या बाबीचा विचार करू. आय आय टी ची प्रारंभीची संख्या पाच होती. तेथील प्रवेश परीक्षेची पातळी पूर्वीपासूनच कठीण होती. अनेक वर्षे तर रँक कशी ठरवली जाते, प्रत्येक विषयाचे कट ऑफ कसे ठरतात, फायनल रँक ठरविण्याचा नेमका फॉर्म्युला काय हे गुपितच असायचे. एका आय आय टी च्याच प्राध्यापकाच्या कोर्ट केस मुळे त्यात पारदर्शकता आली.

आय आय टी ची एक कौन्सिल असली तरी प्रत्येक आय आय टी चे नियम वेगळे असतात. एवढेच कशाला प्रत्येक आय आय टी तील प्रत्येक विभागाचे नियम वेगळे. प्रत्येक प्राध्यापकाला काय, किती, कसे शिकवायचे याचे पूर्ण स्वातंत्र्य.पदवी परीक्षेत सुवर्ण पदक (आय आय टी त सर्व विभागात प्रथम) ठरवायचे असल्याने त्यापुरती एकवाक्यता असते. सत्तर ऐशी च्या दशकात ठराविक अभ्यासक्रम देखील नसायचा. शिक्षक शिकवतील तोच तेव्हढाच अभ्यासक्रम !

पोस्ट ग्रॅज्युएशन ला तर तुलनात्मक अधिक स्वातंत्र्य. म्हणजे केवळ पुस्तकातले नव्हे तर त्या वर्षात अगदी मागच्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या संशोधन जर्नल मधून देखील अगदी ताजे असे शिकवले जायचे. गुण कसे द्यायचे, परीक्षा कशी घ्यायची याची देखील ठोक पद्धत असली तरी प्राध्यापकाला मूल्यांकनाचे स्वातंत्र्य असायचे. मुलांना देखील मार्क कसे मिळाले, दिले हे विचारायचे पूर्ण स्वातंत्र्य. प्राध्यापकाला पटले तर वाढवून गुण देण्याचे स्वातंत्र्य. आय आय टी मध्ये प्रवेश घेणे जसे कठीण तसेच आय आय टी मध्ये (शिकविलेले नीट अभ्यास करून लिहिले तर) नापास होणे देखील तितकेच कठीण. बहुतेक प्राध्यापक विद्यार्थ्याची बाजू ऐकून घेणार. वाद घातला तरी समजून घेणार. वेळ पडल्यास तुमची कान उघाडणी करणार. पण तुमचे नुकसान होईल असे काही करणार नाहीत. तुमचे वर्ष वाया जाऊ देणार नाहीत. आजारी असल्यास दवाखान्यात देखील परीक्षा देण्याची सोय !

अर्थात ही सगळे करताना गुणवत्तेशी मात्र तडजोड नाही. दिलेले होमवर्क करायलाच हवे. त्यात कॉपी करता काम नये हीच अपेक्षा.जाती धर्मावरून भेदभाव मी तरी दहा वर्षात( दोन वर्षे विद्यार्थी अन् आठ वर्षे प्राध्यापक ) अनुभवला नाही. उलट विद्यार्थ्यांना मदत करण्याकडे जास्त कल. खरगपूर सारख्या ठिकाणी बंगाली प्राध्यापकाची संख्या जास्त असली तरी त्यांनी बंगाली विद्यार्थ्यांना झुकते माप दिले असे दिसले नाही. उलट माझ्या बंगाली गुरूंनी दोन बंगाली विद्यार्थ्याची पी एच डी रोकली. त्यांचे जास्त प्रेम मराठी अन् तेलुगू विद्यार्थ्यावर होते ! रिजनल भेदभाव देखील नसतोच कुठे. फक्त इतर प्रांतातल्या लोकांना त्रास होतो तो मेस मधील जेवणाचा. मद्रास येथे उत्तर भारतीयांना त्रास, तर खरगपूर येथे दक्षिणेकडच्यांना त्रास.

फार पूर्वी तर आय आय टी खरगपूर येथे मेडिकल ची देखील चांगली सोय नव्हती. आपत्कालीन सोय तर नाहीच. कोलकत्याला जावे लागे इमर्जन्सी आली तर. शहरात एक रेल्वे हॉस्पिटल होते. आय आय टी पेक्षा कितीतरी चांगले !

आय आय टी त सगळेच प्राध्यापक उत्तम असतात असे नाही. त्यातही जे उत्तम संशोधन करतात, जग प्रसिद्ध जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध करतात, प्रोजेक्ट्स द्वारे अनुदान मिळवतात ते वर्गात उत्तम शिकवतात असे नाही.पदव्युत्तर वर्गाला ते चालून जातील. पण बी टेक साठी ते तापदायक ठरतात. एव्हढेच कशाला काही प्राध्यापकांचे इंग्रजी देखील ठीकठाक नसते. बंगाली मंडळीचा आज उद्या परवा (yesterday tomorrow) या काल वाचक शब्दात गोंधळ होतो !

पी एच डी साठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मात्र मार्गदर्शक प्राध्यापकाच्या खूप अपेक्षा असतात. ठराविक दर्जाचे काम झाल्याशिवाय,अमुक संख्येत अमुकच जर्नल्स मध्ये पेपर्स प्रसिद्ध झाल्याशिवाय प्रबंध लिहायला मान्यता न देणारे प्राध्यापक आम्ही अनुभवले पाहिले आहेत. हे प्रबंध पूर्वी परदेशातील दोन तज्ञ प्राध्यापकाकडे तपासायला जात. तिसरे प्राध्यापक भारतातले जे तोंडी परीक्षेला येणार. हा सगळा प्रकार अतिशय कडक नियमाचा शिस्तीचा होता. आता मात्र त्यातही शिथिलता आल्याचे मी परीक्षक या नात्याने स्वतःच अनुभवले आहे. म्हणजे इथेही विद्यार्थ्यांना मदत करण्याचाच दृष्टिकोन! अडवणूक नाही.

अर्थात काही बाबतीत तडजोड नसते. तो शिस्तीचा भाग. त्यातही कुठेही जाती, वर्ग, प्रांत हा भेदभाव मी तरी कधी अनुभवला नाही. उलट मदत करण्याचे काहीसे शिथिल धोरणच पाहिले.

सध्याच्या ज्या समस्या पुढे येताहेत त्याची कारणे वेगळी असू शकतात. या मुलांवर नेहमीच आधीपासूनच ग्रेड्स, पर्सेंटाइल, प्लेसमेंट याचे दडपण असते. त्याला पालकच जास्त जबाबदार आहेत. मुलाच्या मानसिक, भावनिक गरजाकडे लक्ष देण्याऐवजी ते मार्क्स, परीक्षा याचीच चौकशी करतात.कितीही म्हटले तरी घरचे कौटुंबिक वातावरण अन् हॉस्टेलचे एकटेपण यात खूप फरक असतो. मुलाने मुलीने मैत्री केल्या, सर्वांशी मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न केला, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत अभ्यासाबरोबर लाइफ एंजॉय केले तर फारशी अडचण येणार नाही. कारण आय आय टी च्या वातावरणात एक्स्ट्रा कारिक्युलर अँक्टिव्हिटीजला खूप वाव असतो. अभ्यास सांभाळून ते करणे फारसे कठीणही नसते. पण मुले स्वतःच्याच कोषात राहतात. इतरांशी मिसळून राहत नाहीत. आपल्या अडचणी सुख दुःख शेअर करत नाहीत. त्यामुळे या समस्या निर्माण होतात.

खरे तर आय आय टी त प्राध्यापक विद्यार्थी एकाच कॅम्पस मध्ये राहत असल्याने विद्यार्थी प्राध्यापक यांच्यात कौटुंबिक एकोपादेखील असतो. आम्ही तो अनुभवला आहे. मुले हॉस्टेल मधील फंक्शनला प्राध्यापकाना सहकुटुंब बोलावतात. मुले होळी वगैरेला प्राध्यापकाच्या घरी जातात. इथेही जात धर्म प्रांत बाजूला ठेऊन भावनिक नाते संबंध जपले जातात. अभ्यास, परीक्षा हे सारे वेळापत्रक सांभाळून हे सारे शक्य आहे. आम्ही अनुभवले आहे. आधी विद्यार्थी या नात्याने. नंतर प्राध्यापक या नात्याने.

गेल्या काही दशकात अर्थातच बरेच काही बदलले आहे.आय आय टी ची संख्या चौपट झाली. प्रवेश संख्या वाढली. नीती नियम बदलले. संख्या वाढ अन् गुणवत्ता वाढ यांचे प्रमाण व्यस्त असल्याचे आपण अनुभवतोच आहोत. अनेक आय आय टी त प्राध्यापकाची संख्या आवश्यकतेपेक्षा खूप कमी आहे. काही वर्षापूर्वी माझे मित्र आय आय टी दिल्लीचे डायरेक्टर सांगत होते. तेथील रिक्त पदे भरण्यासाठी त्यांना वीस वर्षे तरी लागतील! कालच एका पॉडकास्ट मध्ये एका तज्ञ व्यक्तीने सांगितले, खरगपूर आय आय टी मध्ये पन्नास टक्के प्राध्यापकाच्या जागा रिकाम्या आहेत ! याचा परिणाम शिकविण्यावर होणारच ना ?

एक मात्र खरे. कोणत्याही समस्येचे जातीय राजकारण करणे ही देखील एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे. आपण आता डोळसपणे बघायला, विवेकाने विचार करायला शिकले पाहिजे.

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरू
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments