Homeबातम्यानवी मुंबई : शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हवे

नवी मुंबई : शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हवे

नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर असूनही आता ते वेगाने वाढत आहे. येथे उद्योग, शिक्षण, वाहतूक, हजारो निवासी संकुल आणि 25 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असूनही आजपर्यंत संपूर्ण एकही शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाही. ही वस्तुस्थिती अत्यंत गंभीर आहे.

नवी मुंबईची दुसरी ओळख म्हणजे “ज्येष्ठ नागरिकांचे माहेरघर” ही आहे. येथे मोठ्या प्रमाणावर निवृत्त अधिकारी, कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक स्थायिक झाले आहेत. वयानुसार हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, किडनी, हाडे आणि न्यूरोचे आजार त्यांना जास्त जडतात. अशा वेळी त्यांना तातडीच्या आणि नियमित उपचारांची गरज असते. पण सध्या त्यांना उपचारासाठी मुंबईतील सरकारी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागते किंवा महागड्या खासगी हॉस्पिटलमध्ये जावे लागते. वय झालेल्या व्यक्तीला तासनतास प्रवास करणे, रांगेत उभे राहणे जीवावर येते. त्यात परत अनेक ज्येष्ठ एकटे राहतात. त्यामुळे त्यांच्यासाठी शहरातच परवडणारी सुपर स्पेशालिटी सुविधा असणे अत्यावश्यक बाब आहे.

आजकाल हृदयरोग, कॅन्सर, किडनी, ब्रेन स्ट्रोक सारखे भयंकर आणि अति खर्चिक आजार वाढत चालले आहेत. असे आजार झाले की गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंब हतबल होते. प्रवास, औषधे, तपासण्यांचा खर्च परवडत नाही. इमर्जन्सीमध्ये मुंबईपर्यंत पोहोचेपर्यंत मौल्यवान वेळ निघून जातो. कोरोना काळातही नवी मुंबईत ICU आणि तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता जाणवली.

शहर स्मार्ट झाले, पण मूलभूत आरोग्य सुविधा मात्र अपूर्ण आहेत. श्रीमंताला खासगी हॉस्पिटल परवडेल, पण निवृत्त पेन्शनवर जगणारा ज्येष्ठ, रिक्षाचालक, कामगार याने काय करायचे ? त्यामुळे नवी मुंबईकरांची ठाम मागणी आहे की, तातडीने 500 बेडचे शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे. त्यात ज्येष्ठ नागरिक विभाग, कॅन्सर, हृदय, न्यूरो, किडनी, डायलिसचे विभाग असावेत.
ज्येष्ठ आणि गरीबांसाठी मोफत किंवा अत्यल्प दरात उपचार आणि औषधे मिळावीत.आरोग्य हा सर्व नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. नवी मुंबई ज्येष्ठांचे माहेरघर आहे तर त्यांच्या आरोग्याची जबाबदारीही आपली आहे. प्रशासनाने आता आश्वासन न देता कृती करावी. विलंब म्हणजे थेट नवी मुंबईकरांच्या, विशेषतः ज्येष्ठांच्या जीवाशी खेळ आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी जागा निश्चित करून कामाला त्वरित सुरुवात करावी, अशी सर्व नागरिकांची रास्त अपेक्षा आहे.

— लेखन : सुरेश ईश्वर पोटे.
अध्यक्ष, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ; मुंबई-नवी मुंबई प्रादेशिक विभाग.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments