Homeलेखखिडकी : 3

खिडकी : 3

“शेगाव वारी.”

खिडकी, भिंतीद्वारे विभागल्या गेलेल्या जगाच्या दोन भागांमध्ये एका भागातून दुसऱ्या भागात डोकावता येण्यासाठी तयार केलेली रचना. दरवाजा आणि खिडकीत हाच एक मूलभूत फरक आहे. दरवाजाने आपण एका भागातून दुसऱ्या भागात प्रवेश करू शकतो, थोडक्यात आतले व बाहेरचे जग यांच्यात येण्या-जाण्याची सोय दरवाजाने होते. खिडकी मात्र फक्त तुम्हाला डोकावण्याची, बघण्याची संधी देते. यातून प्रवेश करणे किंवा निकास करणे शक्य नसते. तरीही जर काहींनी तसा प्रवेश केलाच तर ते वेगळ्याच प्रकारचे लोक असतात थोडक्यात चोर असतात.

अर्थात माझा मुद्दा तो नाही, खिडकी ही घराला असते, दुकान, इमारत, गाड्यांमध्ये देखील कार, बस, रेल्वे, अगदी विमान प्रत्येक ठिकाणी असते. आणि आतून बाहेरील जगाचा अंदाज आपण खिडकीतून डोकावून घेऊ शकतो अशी तिची रचना असते. बाहेरून बघताना आपल्याला खिडक्या दिसतात, मात्र आतील बंदिस्त जग पूर्ण दिसू शकत नाही. खिडकीतून आतल्या जगाचा पूर्ण अंदाज येत नाही. पण तेच खिडकीतून बाहेर बघताना मात्र आकाशापासून ते दूरवर जमिनीचा आणि त्या जमिनीवरील जगाचा नजारा आपल्याला बघता आणि अनुभवता येतो.
यात आपण कोणत्या खिडकीतून बाहेर बघतोय यावरही बरेच काही अवलंबून असते. घरातील खिडकीतून आपल्याला दरवेळी तेच ठराविक जग बघायला मिळते कारण हे घर व त्याची खिडकी ही एकाच ठिकाणी कायम असते. यात एक फरक नक्की असतो तो म्हणजे काळाचा, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र या विविध वेळी तेच असणारे जग हे प्रत्येक वेळी वेगळे भासते. मात्र ट्रेन, बस, कार, विमान यांच्या खिडकीतून दिसणारे जग हे प्रत्येक क्षणाला बदलत असते. या खिडक्या धावत असतात आणि धावताना बाहेर सतत धावणारे जग हे क्षणचित्रांप्रमाणे या खिडकीसमोरून पळत असते.
लहानपणी या खिडकीचा एक वेगळा प्रकार आवाज दिवाळी अंकात मी पाहिला होता. आताही तो प्रकार आहे, पण लहानपणी जेव्हा मी पहिल्यांदा या अंकात त्या हास्य खिडक्या बघितल्या होत्या तेव्हा वेगळीच मौज वाटली होती. या हास्यचित्र मालिकेत खिडक्यांच्या माध्यमातून खिडकीच्या बाहेरून दिसणारे जग आणि आतील वास्तव हा प्रकार मिश्किल पद्धतीने दाखवण्यात आला होता. ‘दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसत’ असा तो प्रकार होता. अर्थात हा विनोदाचा भाग म्हणून त्यांनी तो केला होता.

विज्ञानाने मधल्या काळात अचानक खूप वेगात प्रगती केली, आणि एक नवीन वेगळीच खिडकी आपल्या हातात आली. कम्प्युटर, इंटरनेट, मोबाईल, यांच्यामुळे ‘विंडोज’ हा प्रकार आला. प्रत्येकाच्या हातात हे विंडोज आता दिसतात. विंडोज म्हणजे खिडकीच! या खिडकीतून आपण आता वेगळ्याच पातळीवर जगाकडे बघतोय. आणि जग देखील वेगळ्याच प्रकारे स्वतःला या खिडकीसमोर उभे करू लागले आहे. सोशल मीडियाच्या खिडकीतून आपण आता प्रत्येक व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात डोकवायला सुरुवात केली आहे. आणि आपल्याही आयुष्यातील प्रत्येक क्षण आपण लोकांच्या खिडकीसमोर नेऊन ठेवत आहोत. मी माझ्या हातातील खिडकीतून इतरांच्या वैयक्तिक, खाजगी आयुष्याला बघतो आणि त्याचवेळी इतर असंख्य लोक त्यांच्या खिडकीतून माझ्या आयुष्यात डोकावतात.

एक काळ होता जेव्हा खिडकीतून बाहेर बघताना जर काही अनुचित असेल तर खिडकी बंद करून घेतली जायची. कुणी बघताना बघू नये याची देखील काळजी घेतली जायची. आता मात्र किती लोक बघतायेत याची चढाओढ सुरू असलेली दिसते. मी माझे फोटो, माझे खाजगी कौटुंबिक सोहळे व असेच काही क्षण सोशल मीडियाच्या खिडक्यांवर प्रसारित करतो, आणि दर काही मिनिटांनी ते किती जगाने बघितले, जगातील किती जणांनी त्याला लाईक केले, किती जणांनी त्यावर कमेंट केली हे बघत बसतो. पूर्वी आनंदाच्या क्षणांना अल्बम मध्ये बंद करून घरात ठेवले जायचे. काही ठराविक जीवाभावाच्या व्यक्ती जेव्हा प्रत्यक्ष घरी यायच्या तेव्हा त्यांना हे असे अल्बम, त्यातील एकेक फोटो नीट दाखवले जायचे. त्यावेळी केवढा उत्साह, केवढा आनंद वाटायचा. प्रत्येक फोटो काढताना काय घडले याचे वर्णन असे फोटो दाखवताना केले जायचे. आणि यात वेळ खूप छान जायचा. बघणाऱ्याचे आणि दाखवणाऱ्याचे दोघांचेही पूर्ण समाधान व्हायचे. आता मात्र सोशल मीडियाच्या त्या खिडकीत असंख्य फोटो क्षणात जगभर विखरून ते कोणी कोणी बघितले या आकड्यावरच आपली नजर असते. प्रत्यक्ष जिव्हाळ्याच्या चार शब्दांपेक्षा कृत्रिम लाईकचा अंगठा आज वरचढ ठरलेला आहे.

प्रत्यक्ष भेट, प्रत्यक्ष संवाद यातील आनंद, उत्सुकता या आधुनिक तंत्रज्ञानाने पूर्णपणे नष्ट केली आहे असे कधी कधी वाटू लागते. पूर्वी वर्षभरात कधीतरी एखाद्या सुट्टीत गावी जाणे, आपल्या आप्तेष्टांना भेटणे, मग उशिरापर्यंत गप्पा, सुखदुःखाच्या गोष्टी हे सर्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. फार क्वचित असे आयुष्य सध्या कुणी जगत असावे. हातातील त्या कृत्रिम खिडकीत अख्ख जग आपण बघू शकतो आणि आपण बघतोय हे कुणीच बघू शकत नाही असा एकेरी संवाद आपल्याला आपल्याच लोकांपासून दूर घेऊन जात आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात ज्या गोष्टी त्या खिडकीतून दिसतात त्या देखील कृत्रिमच असतात. वास्तव कधी कधी वेगळेच असते. असाच एक प्रसंग इतक्यात माझ्यासमोर घडला ज्यामुळे मानवी भावना या खिडकीने किती बोथट केल्या आहेत याचा प्रत्यय आला.

ऑफिसच्या कामानिमित्ताने माझा नागपूर ते मुंबई प्रवास सुरू होता. तो गुरुवारचा दिवस होता. वर्धा स्टेशनवर आठ ते दहा महिला आमच्या रिझर्वेशनच्या डब्यात चढल्या. त्यांचे रिझर्वेशन अर्थातच नव्हते! डब्यात इकडे तिकडे बघत कुठे बसायला जागा आहे का याचा अंदाज घेत त्या डब्यातून पुढे पुढे जात होत्या. आम्ही ज्या कंपार्टमेंट मध्ये होतो तेथून पास होत त्या पुढील कंपार्टमेंट मध्ये गेल्या. पुढे कुठेतरी त्यांना बसायला जागा मिळाली, त्यांचा थोडाफार आवाज येतच होता त्यावरून त्या जवळच कुठेतरी ऍडजस्ट झाले असाव्या हे लक्षात आले. त्या स्थिरस्थावर होईपर्यंत ट्रेन निघाली होती. साधारण दहा-पंधरा मिनिटे गेली असतील अचानक मोठ्याने ओरडण्याचा आवाज येऊ लागला. डब्यातील लोक त्या महिला बसल्या होत्या त्या कंपार्टमेंट कडे बघत होते. त्यांचे काहीतरी भांडण सुरू झाले होते, आणि गोंधळ वाढतच चाललेला होता. थोडा वेळ गेला आणि त्या महिलांपैकी दोघी आमच्या कंपार्टमेंट मध्ये आल्या. माझ्या बाजूला असलेली व्यक्ती ही वरील बर्थ वर झोपायला गेली होती त्यामुळे ती जागा रिकामी होती. तसेच समोर देखील एक जागा रिकामी होती. त्या दोन महिला इथे येऊन बसल्या. आमच्या कंपार्टमेंटमधील एका व्यक्तीला फारच उत्सुकता होती की नेमके काय घडले? त्याने न राहून माझ्या बाजूला बसलेल्या महिलेला विचारलेच की काय झाले? त्यावर त्या महिलेने खास वैदर्भीय शैलीत, “मॅड आहे ती बाई, काहीही बोला लागते का ? आपण का रिजर्वेशन केले आहे का? चुपचाप बसावना तर आगाऊपणा का करा लागते…” वगैरे वगैरे बडबडणे सुरू केले. तिच्यासोबत आलेली दुसरी महिला देखील असेच काहीतरी बोलू लागली. तेवढ्यात मागच्या त्यांच्या कंपार्टमेंट मधून आता जोरजोरात रडण्याचा आवाज येऊ लागला. आणि तिथे आता टीसी व पोलीस देखील आले होते.

या सर्व गोंधळात गाडीने चांदुर क्रॉस केले होते व माझ्या कंपार्टमेंट मध्ये अजून एक जागा रिकामी झाली होती. मागील कंपार्टमेंटमधील रडारड व काहीतरी बोलाचाली अजूनही सुरू होती. इथे ज्या दोन महिला होत्या त्यांच्या बोलण्यावरून आम्हाला इतकेच समजले होते की, या सर्व आठ दहा महिला दर गुरुवारी वर्धाहून विदर्भ एक्सप्रेस ने शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जातात व रात्री सेवाग्राम एक्सप्रेसने वापस वर्धा ला येतात. अशा या दर गुरुवारी वारी करतात. यांचा ठराविक ठरलेला ग्रुप तर आहेच पण जर कुणाला यायचे असेल तर त्यांच्यासोबत त्या येऊ देतात. यावेळी त्यांच्या ग्रुप मधील एका महिलेची एक मैत्रीण जी मुळातच कुणाला फारशी पटत नाही ती या ग्रुपसोबत गजानन महाराजांच्या वारीला दर्शनाला म्हणून आली. आणि इथे रिझर्वेशन च्या डब्यात ज्यांचे रिझर्वेशन आहे त्यांच्यासोबत बसण्यावरून वाद घालू लागली. इतर महिलांचे असे म्हणणे होते की जर आपले रिझर्वेशन नाही तर जिथे कुठे जागा असेल तिथेच बसावे अन्यथा उभे राहावे, पण ही महिला मात्र थेट वादच घालू लागली. मुळात ती महिला ही थोडीशी वेडगळच होती आणि भांडखोर म्हणूनच प्रसिद्ध होती असेही त्यांच्या बोलण्यातून लक्षात आले. आणि तिच्यामुळे संपूर्ण डब्यात या बायका आता चर्चेचा विषय ठरल्या होत्या, त्यामुळे त्यांना अजूनच कसेतरी वाटत होते. या महिला आधीपासूनच तिला सोबत घ्यायला तयार नव्हत्या. पण गजानन महाराजांच्या दर्शनाला कुणाला नाही म्हणू नये म्हणून या गप्प राहिल्या. मात्र शेवटी जे व्हायचे ते झालेच आणि प्रवासात हा तमाशा झाला.

आता त्या मागील कंपार्टमेंटमधील रडण्याचा आवाज वाढला होता. सोबत टीसी आणि पोलीस यांचेही संभाषण ऐकू येत होते. आमच्या कंपार्टमेंटमधील दोन्ही बायका अधिकच अस्वस्थ होत होत्या. थोड्याच वेळात टीसी आणि एक महिला कॉन्स्टेबल सोबत एका बाईला घेऊन आमच्या कंपार्टमेंट पर्यंत आल्या. सोबत आलेल्या महिलेचे रडल्यामुळे डोळे लाल झालेले होते. अर्थात ही तीच महिला आहे हे लक्षात आले. तिला आमच्या कंपार्टमेंटमध्ये बसवून टी सी ने, मॅडम आता तुम्ही इथेच बसा आणि कोणालाही त्रास देऊ नका, असे सांगून तो टीसी तेथून निघून गेला. ही महिला इथे येऊन बसल्याबरोबर आधी आलेल्या दोन्ही महिला तिच्याशी काही न बोलता तेथून उठून निघून गेल्या.
ती महिला शांतपणे डोळे मिटून बसून होती. आता थोड्याच वेळात बडनेरा येणार होते. आमच्याच कंपार्टमेंट मध्ये एक व्यक्ती पत्नी आणि मुलासोबत बडनेरासाठी बसले होते. त्या मुलाला बहुदा भूक लागली होती आणि तो काही ना काही खायला मागत होता. आमच्यासमोर बसलेल्या महिलेने त्याला साबुदाण्याची खिचडी खातो का असे विचारले. त्या मुलाच्या आईने नको नको असे म्हणत त्या मुलाला दटावले. आणि आता आपल्याला उतरायचेच आहे उतरल्यावर तुला खायला देते असे सांगितले. ही महिला जर त्याला खायचे असेल तर देते असे असे म्हणत होती, मात्र त्या मुलाच्या आईने नकारघंटा कायम ठेवली. थोड्याच वेळात या महिलेला तिच्याशी कुणीही बोलत नाहीये हे लक्षात आले. कारण ती जेव्हा कुणाकडे बघून स्मितहास्य करत होती त्यावेळी प्रत्येक जण इकडे तिकडे बघून तिला टाळत होता. बडनेरा आले आमच्या कंपार्टमेंट मधील दुसरी फॅमिली देखील उतरली आणि त्या महिलेने मला साबुदाणा खिचडी खाता का असे विचारले. मी हो किंवा नाही म्हणायच्या आधीच त्या महिलेने बोलायला सुरुवात केली.

“मी ज्या ग्रुप बरोबर आली आहे त्यातल्या या दोघींना ज्या तुमच्या कंपार्टमेंट मध्ये बसल्या होत्या त्यांना माझा स्वभाव आणि मी पटत नाही. मात्र केवळ महाराजांच्या दर्शनासाठी म्हणून मी यांच्यासोबत आली. गुरुवारी आम्ही उपास धरतो या सगळ्या जणींचा उपास आहे, म्हणून मी दिवसभर सर्व कामे बाजूला सारून यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवली. विचार केला होता प्रवासामध्ये साबुदाण्याची खिचडी खाऊ आणि दर्शनानंतर रात्रीचा उपास सोडायचा यासाठी मी सगळ्यांचा जेवणाचा डबा सुद्धा आणलेला आहे.” तिने आणलेला सामानाकडे अंगुली दर्शन करत मला दाखवले.
“काही वर्षांपूर्वी मला वेडाचा झटका आला होता. काही मानसिक तणावात मी होती परंतु या अजूनही मला वेडीच समजतात. केवळ महाराजांचे दर्शन घ्यावे म्हणून मी यांच्यासोबत इथे आली. तर या सगळ्याजणी एका ठिकाणी बसल्या आणि मला बाजूच्या कंपार्टमेंट मध्ये माणसांमध्ये बसवले. यांच्या कंपार्टमेंट मध्ये एका महिलेला केवळ मी विनंती करायला म्हणून आली तर त्या महिलेऐवजी ह्या सगळ्या जणी माझ्यावर भडकल्या. ज्यांचे मुळात रिझर्वेशन होतं त्यांना काहीही त्रास होत नव्हता. आताही दादा तुम्ही जाऊन विचारा त्या कंपार्टमेंट मध्ये ज्यांचं रिझर्वेशन आहे त्यांच्याशी काहीही वाद माझा झाला नाही. या बाकीच्या महिलांना मला त्यांच्यासोबत बसू द्यायचे नाहीये. मी एकटीने दुसरीकडे बसावे यासाठी यांचा आधीपासून प्रयत्न सुरू आहे. मला समजतच नाहीये काही तासांचा प्रवास आणि केवळ दर्शन एवढ्या करता आम्ही एकत्र निघालो तर मग मला एकटीला का टाकताय? मान्य आहे माझी मानसिक स्थिती काही वर्षांपूर्वी ठीक नव्हती परंतु आता तसे नाहीये. तुम्ही महाराजांच्या दर्शनाला येता, त्यांची वारी करता आणि त्यांच्याच भक्तांबरोबर असे वागतात हे योग्य आहे का ?”

अत्यंत पोट तिडकीने ही महिला बोलत होती. आणि मी शांतपणे तिच्या चेहऱ्याकडे बघत होतो. तिच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा मला जाणवत होता. कधीकधी मेजॉरिटी इज लॉ असे नसते. सर्वांनी मिळून हिला चुकीचे ठरवले याचा अर्थ ही चुकीची होती असे नाही हे माझ्या लक्षात आले. पिशवीतून सर्वांसाठी बनवलेली साबुदाण्याची खिचडी त्या माऊलीने काढली. तिने सोबत डिश सुद्धा आणल्या होत्या. एका डिशमध्ये तिने साबुदाण्याची खिचडी भरली माझ्याकडे बघितले, मी हात पुढे केला आणि तिने बनवलेली खिचडी घेतली. महाराजांच्या दर्शनाला निघालेली एक माऊली, तिने तयार केलेली ही खिचडी म्हणजे माझ्यासाठी गुरुवारच्या वारीचा प्रसादच होती. खिचडी खाताना मी ट्रेनच्या खिडकीबाहेर बघू लागलो.
क्रमशः

— लेखन : किरण आचार्य. बदलापूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 98694 84800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments