“विश्रामबाग वाडा”
पुणे म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी.! छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांच्या परीस स्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी ! कला,साहित्य आणि संस्कृती यांचा सुरेख संगम पुण्यात बघायला मिळतो. मध्यकाळातील पुढारी , समाजसेवक आणि ज्ञानवंतांची जन्मभूमी..! पेशव्यांची राजधानी म्हणजेच आजची पतितपावन भूमी पुणे ..!
आयुर्विमा महामंडळात नागपूर येथे प्रशासकिय अधिकारी असल्याने कार्यालयीन कामानिमित्त तसेच आयुर्विमा महामंडळाचे क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्र व आयुर्विमा विमा मुख्य संस्थान पुण्याला असल्याने पुण्याला अनेक वेळा प्रशिक्षणाकरिता जावे लागत असे. तसेच खेळाच्या निमित्ताने आणि नातेवाईकांकडे प्रसंगानुरूप जाणेयेणे होत असल्याने पुणे हे “ओळखीचे शहर” झालेले आहे.याच काळात एकदा निवांत वेळ काढून विशेष बसने “संपूर्ण पुणे दर्शन” झाले.
तसे बघितले तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर पुण्याला खरी ओळख बाजीराव पेशव्यांनी आणि त्यांच्या घराण्याने करून दिली. विविध पेठांची , सुंदर बगीच्यांची , मोठमोठ्या वाड्यांची, विहिरींची आणि पुलांची निर्मितीही पेशव्यांच्या कार्यकाळात झालेली दिसते. पेशवे राज्यकर्ते म्हणुन जितके लढाऊ बाण्याचे होते तितकेच स्वत:च्या आवडीनिवडीनुसार सुंदर राहणीमान आणि प्रतिष्ठा जोपासणारे सुद्धा होते. त्यांनी स्वतःची, कुटुंबाच्या राहण्याची सुंदर व्यवस्था मोठमोठ्या आकर्षक वाड्यांच्या स्वरूपात केलेली होती. त्यांची हि आवड आजही आपल्याला पुण्याचे काही वाडे बघितल्यावर दिसायला लागते.
असेच एकदा पुण्यात फिरत असताना अचानकपणे एका प्राचीन भव्य वास्तुकडे लक्ष गेले..! नजर वर फिरवली तर लिहिले होते “विश्रामबाग वाडा” .वाड्याचे बाह्य स्वरूप बघिल्यावर याच्या मध्य युगाची प्रचिती येते. आत गेल्यावर कळले कि येथील डागडुजी सुरु असल्याने पर्यटकांकरिता काही दिवस प्रवेश बंद होता. परंतु नागपूर वरून विशेष रुपाने इतिहास अभ्यासासाठी आल्याचे सांगितल्याने त्यांनी वाड्यात प्रवेश दिला.
आत शिरल्यावर मध्ययुगीन प्राचीन वाड्यात वावरण्याची अनुभूती होत होती. इतिहासातल्या घटनांचे आपण साक्षीदार झालो याची प्रचिती आल्यासारखे वाटत होते. या वाड्याचा भिंतीचे रंग उडालेले होते. प्रशस्त रस्त्यांची लया गेलेली होती. इतिहासाच्या अनेक खाणाखुणा या वास्तुने आणि भिंतींनी जपून ठेवल्या आहेत हे प्रत्यक्ष दिसत होते. कधी काळी अतिशय गर्भ श्रीमंत असलेला आणि राजेशाही थाट भोगलेला हा वाडा आज अतिशय एकाकी पडलेला दिसला,जणु काही कोपऱ्यात बसून रडत असलेला म्हातारा माणुस..! एकाकी पडलेला आत्मा आज आपल्या नशिबावर रडत होता ..! दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा हा लाकडी “विश्रामबाग वाडा” आज मलुल झालेला दिसला.
आज या वाड्यात महानगर पालिकेची कार्यालये आहेत. पोस्ट ऑफिस आहे. वाडयाच्या एका भागात कलाकारांना आपली कला दाखवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. येथे शासकीय ग्रंथालय आहे. हजारो पुस्तके ग्रंथप्रेमींच्या वाचनासाठी उपलब्ध आहेत. पूर्वी पेशवाईच्या अखेरच्या काळातले वैभव म्हणून गणला जाणारा हा वाडा आता मात्र रस्त्यावरील वाहतूक कोंडीची शिकार बनला आहे.अवती भवती शिस्तीचा आणि स्वच्छतेचा प्रचंड अभाव दिसला .
आत तैनात असलेल्या महिला पोलिसांनी आणि काही सहकाऱ्यांनी या वाड्याच्या संदर्भात बरीच माहिती दिली.काही चित्रे दाखवली आणि पुण्यातला अर्धवट टिकून असलेली आणि जीर्ण झालेल्या अर्धवट वास्तुची एक अद्भुत कहाणी जिवंत झाली.
शनिवार वाड्यात राहत असताना दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना नारायणराव पेशव्यांच्या शनिवारवाड्यात झालेल्या निर्घुण वधामुळे दुसरे बाजीराव त्या ठिकाणी राहण्यास तयार नव्हते.म्हणुन अजून विश्रामपूर्ण जीवन जगण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था आवश्यकता वाटली. म्हणुन त्यांनी शनिवार वाड्या जवळची बाग खरेदी करून तिथे हा ऐतिहासिक राजवाडा बांधला.

हा वाडा तयार होण्यापूर्वी येथे गावाबाहेर मोकळ्या जागेवर एक सुंदर विशाल बगीचा होता. फारशी वस्ती नसल्याने हि जागा बाजीरावांना खूप आवडली .या बागेची निगराणी करणारा एक माळी होता.त्या माळ्याचे नाव होते “विश्राम”. दुसऱ्या बाजीरावांनी राहण्यासाठी म्हणून १८०७ रोजी २ लाख रुपये खर्चून हा वाडा बांधला. वाडा बांधण्यासाठी ६ वर्ष गेली. २६ मार्च १८०३ रोजी वाड्याच्या बांधकामाला सुरूवात झाली. २० नोव्हेंबर १८०८ रोजी वाड्याची वास्तूशांत झाली. ३९ हजार चौरस फुटांची ही वास्तू आहे. वाड्याची मूळ जागा पेशवाईतील सरदार हरिपंत फडके यांची. हा वाडा शनिवारवाडा तसेच तुळशी बाग आणि मंडईच्या जवळ आहे. ‘विश्राम’ नावाचा माळी आणि ‘विश्राम’ करण्याकरिता नवीन जागा यांच्या संयुक्त परिस्थिती मुळे याचे नाव ”विश्रामबाग वाडा” पडले आणि तेच नाव आजतागायत कायम आहे.
बाजीरावांचे सासरे सरदार दाजीबा ऊर्फ हरिपंत फडके यांच्या मुलीचे; राधाबाई हिचे लग्न १६ फेब्रुवारी १७९७ रोजी झाले. त्यावेळी
हुंड्याच्या स्वरुपात ही जागा दिली गेली. पुढे रीतसर बांधकाम होऊन या तीन मजली भव्य लाकडी वाड्याची निर्मिति झाली. अनेक सुंदर ,आकर्षक सागवानी खांब, त्यावर नेत्रदिपक कोरीव नक्काशी आणि भव्य आंगणासहित भव्य चौकांची निर्मिती या वाडयात बघायला मिळते.त्या काळात येथे कारंजे होते आणि तिसऱ्या मजल्यावर अनेक रंगीत पडद्यांनी सजविलेल्या खिडक्या , दरवाजे छत होते. पायवाटा होत्या. छत रंगीत कापडांनी सजविलेले होते.

सध्या येथे एक छोटे संग्रहालय आणि ‘पुनवडी ते पुण्यनगरी’ प्रदर्शन पाहता येते. वाड्याच्या पहिल्या मजल्यावर एक भव्य दरबार हॉल आहे. वाड्याचे लाकडी कोरीव काम, घुमटाकार छते आणि प्रवेशद्वार पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. हा वाडा २६० फूट लांब व ९० फूट रुंद आहे. दुर्दैवाने या वाड्याचा उपभोग बाजीरावास फक्त ८ वर्षे घेता आला. वाड्याच्या पहाऱ्यासाठी जो बंदोबस्त ठेवला जात असे त्यासाठी मासिक खर्च हा ४०० रुपये इतका येत होता. इंग्रजांनी सन १८१८ साली पुणे ताब्यात घेतल्यावर पुढे २ वर्षे या वाड्यास कुलूप होते. त्यानंतर सन १८२१ साली इंग्रज सरकारकडून या वाड्यात संस्कृत कॉलेजची स्थापना करण्यात आली. सन १८७९ मध्ये एका माथेफिरूने हा वाडा पेटवून दिल्यामुळे वाड्याचे दोन चौक जळून खाक झालेत. त्या नंतर काही सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन वर्गणी गोळा केली .नगरपालिकेने त्यात भर टाकुन वाडा दुरुस्त करण्यात आला आणि नगरपालिकेने तो ताब्यात घेतला.
दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे वास्तव्य या ठिकाणी फारसे नव्हते. साधारणतः फक्त आठ वर्षे ते येथे राहिले .कारण जास्त वेळ ते शुक्रवार वाड्यातच राहत होते.त्या मुळे विश्रामबाग या वाड्याचा उपयोग नाच गाणे,खाजगी बैठका,पाहुणे,चर्चा, विश्राम याच करिता होत असे. पुढे १८१७ च्या इंग्रज आणि पेशवे यांच्या युद्धानंतर बाजीराव पेशवे परत पुण्यात आले नाही आणि त्यानंतर पुणे ओस पडले.इंग्रजांनी त्यांना पकडून ब्रम्ह्वर्त या उत्तरेच्या ठिकाणी रवानगी केली.त्यांची पत्नी वाराणशीबाई १८१९ मध्ये काही दिवस विश्रामबाग वाड्यात रहात होती. पुढे त्यांचीही रवानगी ब्रम्हवर्त येथे करण्यात आली. त्यामुळे पेशवे साम्राज्याचा अंत झाला
पण खुणा कायम राहिल्या.
त्या नंतर असंख्य कुटुंबे उदरनिर्वाहाकरिता पुण्याबाहेर पडलीत. श्रीमंत सावकार कंगाल झाले.मोठमोठे वाडे ओस पडले. पण या काळात विश्रामबाग वाड्याचे भाग्य उजळले ..! तो पुन्हा झगमगायला लागला. इंग्रजांनी या वाड्याची भरपूर काळजी घेतली आणि वैभव कायम राखले.संस्कृत पाठशाळा आणि व्याकरणाचे ज्ञान देणारी पहिली सार्वजनिक पाठशाळा इंग्रजांनी सुरु केली सुरु केली आणि वाड्याला रौनक आली.! श्रावण महिन्यात थोरले पेशवे योग्यतेनुसार विद्वान ब्राम्हणांना भरपूर दक्षिणा देत. लोकांना आपले करून घेण्याकरिता हि प्रथा इंग्रजांनी सुरु ठेवली आणि “दक्षिणा फंड” नावाची योजना माउंट स्टुअर्ट एलफिस्टन याने सुरु करून वाड्यात संस्कृत पाठशाला ६ ऑक्टोबर १८२१ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरु केली. कृष्णशास्त्री चिपळूणकर या शाळेत सहाय्यक प्राध्यापक होते. पुण्याचे जिल्हाधिकारी या शाळेचे काही काळ मुख्याध्यापक होते.
या वाड्यात दिवाळी , गणपती उत्सव आणि इतर सार्वजनिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे व्हायचे.
पुढे याच विश्रामबाग वाड्यातील शाळेचे रुपांतर इंग्रजीसहित अन्य शिक्षण देणाऱ्या “पुना कॉलेज” मध्ये करण्यात येऊन भूगोल, खगोलशास्त्र आणि पदार्थविज्ञान हे विषय शिकवणे सुरु झाले. शाळाप्रमुख म्हणून श्री.इस्डेल नावाचे विद्वान प्राध्यापक काम करत होते.

याच वाड्यात १६ ऑक्टोबर १८५२ रोजी विश्रामबाग वाड्यात एक अभूतपूर्व घटना घडली. भारतीय स्त्री शिक्षणाचे आद्य जनक महात्मा ज्योतिबा फुले यांचा इंग्रज सरकार तर्फे भव्य सत्कार तत्कालीन पूना कॉलेजचे प्राचार्य मेजर कांडी यांच्या हस्ते करण्यात आला . दोनशे रुपयांची शालजोडी त्यांना पुण्याच्या जनतेच्या साक्षीने अर्पण करण्यात आली. त्या काळात इंगज अधिकाऱ्याना पंधरा ते पंचवीस रुपये मासिक पगार होता. या वरून दोनशे रुपयाचे महत्व आणि महात्मा फुले यांच्या कार्याचे महत्व लक्षात येते. विश्रामबाग वाड्याच्या इतिहासातील हा अभूतपूर्व प्रसंग होता.
या नंतर या दोन्ही संस्थानचे विलीनीकरण करून इ.स.१८६८ मध्ये खडकी येरवड्याच्या मोकळ्या जागेत एक प्रशस्त ,देखणी , भव्य इमारत बांधण्यात येऊन तिथे विश्रामबाग वाड्यातील शाळा कॉलेज बंद करून या नव्या जागेत ‘डेक्कन कॉलेज’ सुरू करण्यात आले.
असा हा दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा हा इतिहास कालीन “विश्रामबाग वाडा”. आजही गतकाळातले वैभव राखत ताठ मानेने पुण्यात उभा आहे. काळाच्या पडद्याआड गेलेल्या अनेक वास्तू, त्यांच्या खुणा सांगतात आणि आपले डोळे पाणवल्या जातात. ‘पुनवडी ते पुण्यनगरी’ या प्रदर्शनात पुण्याचा पुनवडीपासून १७७२ पर्यंतचा इतिहास मांडण्यात आला आहे. त्यानंतर १८५५ पर्यंतचा इतिहास, माहिती चित्रे, नकाशे, छायाचित्रे यांच्या साहाय्याने मांडण्यात आला आहे. शनिवारवाडयाचा जुना नकाशा, पहिले बाजीराव, नानासाहेब पेशव्यांनी वसविलेल्या पुण्यातील पेठा, बंदीस्त नळयोजने साठी कात्रजवरून आणलेला पाणीपुरवठा, पुण्यातील विविध देवस्थाने, घाट, वाड्यातील ही सर्व माहिती बघून मन इतिहासकाळात जाते आणि आपण नकळत पणे दुसऱ्या बाजीरावांच्या विश्रामबाग वाड्याच्या असंख्य आठवणी साठवून सुन्न मनाने विश्रामबाग वाड्याच्या बाहेर पडतो.

— लेखन : श्रीकांत पवनीकर. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
