Homeपर्यटनपर्यटन

पर्यटन

“शहाणे उंदीर !”

सध्या राजस्थान ट्रिप सुरू आहे. वाळवंटातला प्रवास. एकीकडे प्रचंड उन्हाळा. अन् हिवाळ्यात उणें तापमान देखील! राजस्थान म्हणजे सगळीकडे वाळूच वाळू अशी समजूत झालेली. पण असे पसरलेले वाळवंट कुठेच दिसले नाही. राजस्थान लक्षात राहते ते महाराजा राणा प्रताप मुळे. हल्दी घाटी च्या युद्धामुळे. चेतक घोड्याच्या पराक्रमामुळे. अन् हो, इथल्या प्राचीन जोहार सती प्रथेमुळे देखील. स्वतःच्या शरीराचे पावित्र्य श्रेष्ठ मानणाऱ्या राजस्थानी स्त्रियांचा जोहार म्हणा, किंवा इथली राजा राम मोहन रॉय यांच्या प्रयत्नाने बंद झालेली सती प्रथा म्हणा,हे वेगळेपण या प्रदेशाबद्दल आगळी वेगळी उत्सुकता निर्माण करते.

या ट्रीप मध्ये माझ्या लक्षात राहिले ते बिकानेर जवळील करणी माता मंदीर. हे चौदाव्या शतकातील आश्चर्य कारक देवस्थान उंदराचे देवस्थान (Rat temple) म्हणूनही ओळखले जाते. एकूणच या मंदिराचा इतिहास स्तिमित करणारा आहे.अगदी अश्रद्ध माणसाला देखील विचार करायला भाग पाडणारा असाच आहे.

या करणी मातेच्या मंदिरात साधारण २५ हजार उंदराचे वास्तव्य आहे. हे उंदीर कायमचे या मंदिर परिसरातच वास्तव्याला असतात. ते मंदिर परिसरा बाहेर जात नाहीत. अन् बाहेरचे उंदीर आत येत नाहीत. आश्चर्य म्हणजे मंदिर परिसरात मांजर सर्प अशा या उंदराना धोकादायक ठरतील अशा प्राण्यांचा वास नाही. त्यामुळं हे हजारो उंदीर बिनधास्त इथे तिथे फिरत असतात. एरवी सामान्य व्यक्तीला उंदीर झुरळ पाली अशा प्राण्यांची भीती वाटते. काहीना तर किळस देखील येते. पण या मंदिरात प्रवेश करताच या भावना कुठल्या कुठे पळून जातात ते आपल्याला कळत देखील नाही. लांबच लांब असलेल्या रांगातील भाविकांना हे उंदीर मुळीच त्रास देत नाहीत. ते अवती भवती फिरत असतात. प्रसाद धान्य खात असतात. रांगेत चालताना भक्तांना मुद्दाम सूचना देण्यात येते. पाय घासत घासत चला. एरवी एखादा ही उंदीर चुकून देखील तुमच्या पायाखाली यायला नको. भक्त गण देखील ही दक्षता घेतात. कारण असे म्हणतात की जर चुकूनही एखादा उंदीर पायाखाली आला, अन् त्याचा मृत्यू झाला तर त्या भक्ताला सोन्याचा किंवा चांदीचा उंदीर या मंदिरात अर्पण करावा लागतो करणी देवीला.. शिक्षा म्हणून, प्रायश्चित्त म्हणून !

करणी माता मंदिर

करणी मातेचे मूळ नाव रिध्हू बाई. ती दुर्गेचा अवतार समजली जाते. चरण कुटुंबात सुवाप खेड्यात फालोदी जवळ तिचा जन्म झाला. ही चौदाव्या शतकातली गोष्ट. त्यावेळी अगदी लहान पणी लग्न करून सासरी पाठविण्याची प्रथा होती. या परंपरे नुसार दिपाजी यांच्याशी तिचे लग्न ठरवले गेले. तिचा अध्यात्माकडे जास्त ओढा होता. भक्ती भाव जास्त प्रबल होता. त्यामुळे संसाराच्या चक्रात अडकायचे नव्हते. पण परंपरे पुढे नाईलाज होता. तिने धीर धरून पहिल्याच दिवशी नवऱ्याला सर्व काही सांगितले आणि आपल्याच खान बहिणी शी लग्न करायला त्याला भाग पाडले. ती स्वतः देवीच्या चरणी लीन व्हायला मोकळी झाली. समाज सेवेसाठी स्वतंत्र झाली.
तिच्या बहिणीला चार मुले झालीत. त्यांचा तिने स्वतः आपल्या मुलांसारखाच सांभाळ केला. त्यांच्यावर माया केली. या पैकीचं एक लक्ष्मण नावाचा मुलगा कपिल सरोवरात अचानक बुडून, त्याचा मृत्यू झाला. हा सर्वांसाठीच एक मोठा धक्का होता. करणी मातेच्या भक्तीवर, श्रद्धेवर सर्वांचा विश्वास होता. करणी देवीने सरळ यमराजाना च दाद मागितली. मला माझा मुलगा परत द्या. पण यमराजाने देवीला समजावण्याचा प्रयत्न केला. “जो जन्माला आला त्याचा मृत्यू अटळ आहे. निसर्गचक्राचा हा नियम आहे. तो कुणालाही मोडता येणार नाही मलाही नाही !.”

यमराजाच्या या वक्तव्याने करणी देवीचे समाधान झाले नाही. तिने आपली साधना सुरूच ठेवली. त्याचे फलित म्हणा किंवा देवीच्या तपश्चर्येचे फळ म्हणा, देवीला आशीर्वाद रूपाने साक्षात्कार झाला. जेव्हा केव्हा चरण कुटुंबातील कुणाचा मृत्यू होईल तेव्हा त्या व्यक्ती पवित्र काबा (उंदीर) रुपात पुन्हा जन्माला येतील. करणी देवीने तपश्चर्या केली त्या मंदिरातच कायमचे वास्तव्याला असतील. तेव्हापासून या मंदिरात हजारो उंदीर वास्तव्याला आहेत. त्याच्या मुळे कुणालाही त्रास नाही. कसलीही रोगराई पसरली नाही. मागे एवढा मोठा प्लेग चा उद्रेक झाला होता भारतात. पण या पवित्र मंदिर क्षेत्रात कुणालाही काहीही त्रास झाला नाही. इथे कधीच रोगराई पसरली नाही. विद्वानांच्या दृष्टीत विद्याना च्या कसोटीवर हे आश्चर्यच समजले जाते. कुणीही मांजर सर्प असे प्राणी देवळात येऊ शकत नाहीत. तर मंदिरातले उंदीर कधीही मंदिर परिसरा बाहेर जात नाहीत.

या हजारो नॉर्मल उंदराबरोबर इथे फक्त चार पाच पांढरे उंदीर देखील आहेत. त्यांचे दर्शन अतिशय दुर्लभ मानले जाते. त्यासाठी भक्तगण तासन् तास रांगेत उभे राहून वाट देखील बघतात. पण फार क्वचित हे मोजके पांढरे उंदीर दर्शन देतात. माझे एकट्याचे भाग्य असे की मला हे पांढऱ्या उंदराचे म्हणजेच श्रद्धेनुसार प्रत्यक्ष देवीचे दर्शन झाले! मी ते व्हिडिओ कॅमेऱ्यात चित्रित देखील केले ! सगळेच अदभुत, अनाकलनीय एव्हढे मात्र खरे !

सध्या विद्यानंद बापट यांच्या मुळे आस्तिक नास्तिक, सनातन, धार्मिक असे वाद सुरू झाले आहेत. देव धर्मावर श्रद्धा असणारा, वर उल्लेखित चमत्कारासारख्या कथा वर विश्वास ठेवणारा फार मोठा समाजवर्ग आहे आपल्यात. या सगळ्याच कथा, श्रद्धा नाकारता येत नाहीत सहजासहजी. देव आहे म्हटले तर तो अवती भवतीचा युद्धात होणारा मानवी संहार का थांबवू शकत नाही ? यात्रेला देव दर्शनाला निघालेल्या एकच कुटुंबातील अनेकांचा अचानक अपघाती मृत्यू का होतो ? पूजा अर्चना भक्ती भावाने करणाऱ्याच्या आयुष्यात एकसारखी संकटे का येतात ? देवाची भक्ती करणारेच समाजाची लूट, फसवणूक कशी काय करतात? काही चमत्कार विद्यानाच्या कसोटीवर उतरणार नसले तरी त्याचे तार्किक, वैचारिक स्पष्टीकरण का देता येत नाही ?
असे अनेक प्रश्न या राजस्थान ट्रीपने, करणी माता मंदिराच्या दर्शनाने निर्माण झाले.अनेक प्रश्नांना उत्तरेच नसतात हेही समजले! ठराविक प्रश्नांची ठराविक उत्तरे अन् ठराविक गुण या चक्रात फिरणाऱ्या प्राध्यापकाच्या श्रीमुखात चपराक बसल्या सारखे झाले. या वयात हेही सगळ्यांना सांगावेसे वाटते !!
छायाचित्रे सौजन्य : गुगल

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : विजय पांढरीपांडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments