Homeलेखस्वयंपाक गॅस : समस्या आणि पर्याय

स्वयंपाक गॅस : समस्या आणि पर्याय

इराण, इजराइल आणि अमेरिका युद्धाचा थेट परिणाम जागतिक स्तरावर सगळ्याच देशांवर झाला आहे. पश्चिम आशियातील सध्याच्या संघर्षामुळे व्यापार, ऊर्जापुरवठा, अर्थव्यवस्था यावर परिणाम होत आहे. कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि प्रक्रिया होऊन आलेले पेट्रोलियम उत्पादन यांची धमनी असलेले आखाती देश या युद्धाच्या खाईत सापडले आहेत आणि त्याचा थेट परिणाम भारतातील तेल उत्पादक कंपन्यांवर झाल्याचे दिसते.

जागतिक तेल वापराच्या अंदाजे 20% तेलाची वाहतूक आखाती देशांमधून होत असते. भारतातील तेल कंपन्यां, परदेशातील तेल उत्पादक कंपन्यांवर अवलंबून राहावे लागते. विशेषतः आखाती देशांमधून मोठ्या प्रमाणात आपला व्यापार होत असतो.

होर्मुन्सची सामुद्रधुनी हा जहाजांचा महत्त्वाचा मार्ग तोच युद्धामुळे बंद झाल्यामुळे आपली बरीचशी जहाजे त्यामध्ये अडकून पडली. बर इतर देशांशी व्यापार करायचं म्हटले तर प्रवासासाठी लागणारा अधिकचा वेळ आणि होर्मुन्सची समुद्रध्वनीत अडकलेली आपली तेलाची जहाजे त्यामुळे युद्धात प्रत्यक्ष सहभाग नसून सुद्धा त्याची झळ भारताला लागली. त्याचा थेट परिणाम खत कारखाने, वीज प्रकल्प तसेच तेल व गॅसवर अवलंबून असणाऱ्या अनेक उद्योग, तसेच स्वयंपाकाचा गॅस यांच्यावर झाला.

स्वयंपाकासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅस चा पुरवठा अचानक विस्कळीत झाल्यामुळे गृह व्यवस्थेचे गणित पूर्णतः कोलमडले. भारतात एलपीजीचे उत्पादन पस्तीस ते चाळीस टक्के होते तर देशाला 60 ते 65 टक्के एलपीजी बाहेरून आयात करावा लागतो. मागील काही वर्षात, ग्रामीण भागात एलपीजी चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच शहरीकरणामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. मात्र देशात कच्च्या तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन मर्यादित असल्याने आपल्याला आयातीवर अवलंबून राहावे लागते.

इराण बरोबरच्या शिष्टाईमुळे काही प्रमाणात मार्ग जरी निघाला असला तरी अध्यापि स्थिरता आलेली नाही व ती येणाऱ्या काळातील येईल याचीही शाश्वती नाही. एलपीजी आयातीसाठी आफ्रिका अमेरिका, रशिया हे पर्याय आहेत परंतु लागणारा वेळ व मालवाहतुकीचा वाढणारा खर्च यामुळे आर्थिक गणित बिघडू शकते.

एलपीजी चा वापर कमी करून नैसर्गिक वायू तसेच बायोगॅस पर्यायी पर्यायी इंधन म्हणून उपलब्ध होत आहेत ही समाधानाची बाब म्हणावी लागेल. मागील काही वर्षात मागणी सातत्याने वाढत असली तरी आपण सुद्धा स्वयंपूर्णतेकडे मार्गक्रमण करीत आहोत. पेट्रोलियम कंपन्या सातत्याने उत्पादन वाढ करीत आहे तसेच नवीन संशोधन, पर्यायी इंधन, बायो गॅसचे उत्पादन सातत्याने वाढत आहे.

शहरांमध्ये पाईपलाईन द्वारे नैसर्गिक नैसर्गिक वायुचा वापर वाढत चाललेला आहे. सध्या सहा ते सात टक्के असलेला वापर, 15% पर्यंत पुढील एक दोन वर्षात वाढण्याची शक्यता आहे. देशांतर्गत नैसर्गिक वायूंचे मोठे साठे सापडलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात निम्म्याहून अधिक गरज देशांतर्गत वायूमुळे भागवता येईल.

दुसरीकडे बायोगॅस हा सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारा नूतनीकरणक्षम ऊर्जा स्तोत्र आहे. शेण, अन्न कचरा आणि शेतीतील अवशेष यापासून बायोगॅस तयार केला जातो. बायोगॅस ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी वापरल्यास एलपीजी ची गरज कमी होऊ शकेल. या प्रकल्पामुळे शेतातील कचऱ्याचा पुनर्वापर होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत मिळेल तसेच शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न देखील मिळेल. हे दोन्ही इंधन स्वच्छ, स्वस्त आणि पर्यावरण पूरक आहेत.

सध्या बऱ्याच प्रायव्हेट कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात बायोगॅस उत्पादनावर भर दिलेला आहे. आतापर्यंत दोनशेच्या वर कंपन्या बायोगॅस उत्पादन करीत आहेत व येणाऱ्या काही काळात त्याच्यात लक्षणीय वाढ संभवनीय आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करता केवळ एलपीजी आयातीवर अवलंबून न राहता. देशांतर्गत नैसर्गिक वायूचे उत्पादन वाढवणे तसेच भविष्यातील बायोगॅस क्षेत्रातील वाढीमुळे स्वयंपूर्णतेची शक्यता नक्कीच वाढीस लागू शकते.

लेखक – तेल क्षेत्रात सुरक्षा आणि पर्यावरण विभागात कार्यरत आहेत.

सुधीर थोरवे.

— लेखन : सुधीर थोरवे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments