जेष्ठ, श्रेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे काल निधन झाले. या निमित्ताने त्यांना वाहिलेल्या या २ शब्द सुमनांजली…
– संपादक
१
मानवतेचा सूर्य मावळला
सुवर्ण युगाचा अस्त झाला.
असामान्यतील, असामान्य
हिरा कोहिनूरचा एकमेव अद्वितीय
सुपुत्र भारताचा रतन, टाटांचा
देखणे रूप, रुबाबदार व्यक्तिमत्त्व
बुद्धीचे तेज, उद्योगात तरबेज
नेकीचे व्यवहार, कुशल कारभार
दिनांचा कैवार, जीवाभावाचे कामगार
पराकोटीची लीनता,
वागण्यात नम्रता
कलियुगात अवतरला एक
पुण्यवान देवता
साऱ्या विश्वाला जिंकले
नाव अजरामर केले,
ईश्वरालाही लाडके झाले
निगर्वी निस्वार्थी वृत्तीने
अलविदा झाले
सारे जग हळहळले,
अश्रूंनी डोळे पाणावले
निरोपालाही गलबलून आले
सदगत्या मनाने नतमस्तक झाले
विचार थांबले, भावना गोठल्या
पराधीनतेचे भान आले
विज्ञानानेही हात टेकले
दिव्यात्वाची ज्योत निमाली
पंचत्वात विलीन झाली
शांत निरामय जीवन संपले
जगाला पोरके करून गेले
उपकृत होऊन, कृतज्ञ होऊ या
वारसा युगपुरुषाचा पुढे चालवूया
हीच खरी श्रद्धांजली वाहू या

— रचना : मीरा जोशी. नवी मुंबई.
२
तुम्ही दीपस्तंभ देशाचे,
झळाळला हा देश,
उद्योगांच्या महामार्गा वरती,
उभारला विश्वास।
सोप्या शब्दांतले शहाणपण,
होती मृदू भाषा,
उंच केली भारतीय संस्कृती,
घडवली नवी आशा
सामाजिकतेची बांधिलकी,
होती तुमची प्रतिमा,
निर्माणाची स्वप्ने साकारली,
नव्या भारताच्या प्रेमा
तुमच्या हातून झालेले
उद्योग निर्माण निरंतर,
माणुसकीच्या सेवेसाठी,
अर्पिले दान सर्वत्र।
मान तुमच्या कार्याला,
देशाचा शतशः प्रणाम,
दिला तुम्ही आम्हाला
महान अमूल्य ठेवा।
हळुच निघून गेले
करूनी तुम्ही ‘टाटा’
अवघड होतील आता
उद्योग जगताच्या वाटा
आत्म्यास शांती लाभो
सर्वांची हीच प्रार्थना,
स्मरणात सदैव राहील
तुमचा वारसा आणि प्रेरणा ।

— रचना : ओमप्रकाश शर्मा. नाशिक
३. || तेच नाव सर्वत्र ||
अंधकार पसरलेल्या तुमच्या, आमच्या आयुष्यात
लख्ख प्रकाश उजळणाऱ्या
वीजेवर तेच नाव
वाया जाऊ नयेत तुमच्या आयुष्यातील कित्येक तास
म्हणून सुखकर केला ज्यांनी तुमचा प्रवास
त्या वाहनांवर तेच नाव
काळ काम वेगाचं जे त्रेराशिक
तुम्ही मनगटावर बांधता
त्यावर तेच नाव
तुमचा भार वाहून नेणाऱ्या
गाड्यांवर तेच नाव
तुमची घर बांधणाऱ्या, विटा साधणाऱ्या
सिमेंटवरही तेच नाव
जीवनाची पुंजी जमा करून
सुखदुःखाच्या क्षणांना गोठवून
शरीरावर रुबाबात, दिमाखात मिरविणाऱ्या
दागिन्यांवरही तेच नाव
उंची हॉटेलमध्ये कधी त्यांना
प्रवेश नाकारला गेला
आता भारतीय नागरिक
अभिमानाने ज्याच्या पायऱ्या चढतो
त्या होटेलवरही तेच नाव
आयुष्यात लौकिक मिळवावा
रंगविलेली स्वप्ने साकार व्हावीत म्हणून
ताठ मानेने युवक ज्या शिड्या दिमाखात चढतात
त्या इमारतींवरही तेच नाव
सुरुवात कुठूनही करा
अन्नापासून करा
हवं तर दानापासून करा
डावीकडून किँवा उजवीकडून करा
तेच नाव
अशा नावात नवल एवढं की,
त्यांना मुजरा, सलाम, अभिवादन करताना
जोडले जावेत तस्सेच
सर्वच हात निरोपाचा टाटा करताना दिसतात…

— रचना : सुधीर शालीनी ब्रह्मे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
तिन्ही कविता खूप छान 👌👌👌