Homeलेखबाल मजुरी, करू या बंद !

बाल मजुरी, करू या बंद !

आज जागतिक बालकामगार विरोधी दिवस आहे. या निमित्ताने आपल्या संवेदनशीलतेला जागे करणारा हा विशेष लेख…
– संपादक

बऱ्याच दिवसांनी आज पोहायला गेले. पोहोत असतांनाच आभाळ भरून आलं आणि काही मिनिटातच पाऊस पडू लागला. पावसात पहिल्यांदाच पोहत होते आणि खूप मज्जा वाटली.

लहानपणी पहिला पाऊस पडू लागला की घरातून सुसाट धावत जायचे आणि मनसोक्त भिजायचे. आजूबाजूची सारी लहान मुले नाचत असू.मोठे झाल्यावर मात्र त्या पहिल्या पावसात भिजायची मजा सहसा मिळाली नाही. पावसात पोहत असताना पूर्वीच्या दिवसांची आठवण होऊन बालपणाच्या रम्यकाळामध्ये कितीतरी वेळ हरवून गेले. परत घरी येतांना शब्द ओठी आलेच…. लहानपण देगा देवा आणि रात्री सहज बातम्या वाचत असताना एका बातमीकडे लक्ष दिले उद्या १२ जून:उझबेकिस्तानमध्ये जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे आयोजन
आयोजक: आयएलओ राइज फॉर इम्पॅक्ट प्रोजेक्ट, फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स ऑफ उझबेकिस्तान आणि इतर घटक!
जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त, आयएलओ राइज फॉर इम्पॅक्ट प्रोजेक्ट, फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स ऑफ उझबेकिस्तान आणि इतर घटकांसोबत मिळून, ताश्कंद प्रदेशातील एका बाल आरोग्य शिबिरात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. यामध्ये सरकार, मालक आणि कामगार संघटना, विकास भागीदार, मुले आणि तरुण सहभागी होतील. या उपक्रमांमध्ये मुलांचे हक्क आणि बालमजुरी प्रतिबंधाला प्रोत्साहन देणारे शैक्षणिक, संवादात्मक आणि मनोरंजक उपक्रम समाविष्ट असतील.

जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त नायजेरिया NECA ची मोहीम :
आयोजक: नायजेरिया एम्प्लॉयर्स कन्सल्टेटिव्ह असोसिएशन (NECA)
NECA जागतिक बालकामगार विरोधी दिन एका संवाद मोहिमेद्वारे साजरा करेल, ज्यामध्ये त्यांच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आणि व्हॉट्सॲप चॅनेलवर शेअर केलेले एक स्मरणीय पोस्टर, NECA कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली एक व्हिडिओ मोहीम आणि निवडक वृत्तपत्रांसाठी एक प्रसिद्धीपत्रक यांचा समावेश असेल.

येकेमी, इबाला आणि इडोका येथे बालकामगार विरोधी सामुदायिक रॅली.
बातमी वाचत गेले आणि मन सुन्न झाले. काही तासापूर्वी मी बालपणाच्या सुरेख आठवणींमध्ये रमले होते आणि जगभर किती कोवळ्या जिवांना केवळ पोटासाठी दिवसभर उन्हा-पावसात, थंडीवाऱ्यातही राबायला लागते आहे! पैशांच्या मागे लागलेले लोक किती निष्ठुर आहेत.

या दिनाची सुरुवात आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) २००२ मध्ये केली. यामागचा हेतू जगातील बालमजुरीची भीषण परिस्थिती आणि त्याविरोधात करायच्या प्रयत्नांवर जागतिक लक्ष केंद्रित करणे हा आहे.
याची ३ उद्दिष्टे आहेत
१) बालपण वाचवणे: बालकांना कामाच्या ओझ्यापासून मुक्त करून त्यांना शिक्षणाच्या आणि विकासाच्या प्रवाहात आणणे.
२) कायद्यांची अंमलबजावणी: १४ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवणे हा कायदेशीर गुन्हा असून, त्याबाबत समाजाला कठोर संदेश देणे.
३) जागरूकता: सरकार, कामगार संघटना, नागरिक आणि उद्योगांना एकत्र आणून त्यांचे समुपदेशन करून बालकामगार प्रथा नष्ट करण्यासाठी कटिबद्ध करणे.
माराकेश येथे झालेल्या बालमजुरी निर्मूलनावरील सहाव्या जागतिक परिषदेनंतर २०२६ चा जागतिक दिनासाठी “बालमजुरीला लाल कार्ड: मुलांसाठी न्याय, प्रौढांसाठी सन्मानजनक काम”( “Red card to child labour: Fair play for children, decent work for adults) हे घोषवाक्य ठरविले गेले. घोषवाक्याखाली, ही मोहीम दर्जेदार शिक्षण, सामाजिक संरक्षण, सन्मानजनक काम, अधिक कठोर कायदे आणि त्यांची अंमलबजावणी, तसेच बालमजुरीच्या मूळ कारणांवर उपाययोजना करणाऱ्या इतर उपायांवर अधिक मजबूत कृती करण्याचे आवाहन करणार आहे.

आश्चर्याची आणि दुःखाची गोष्ट अशी की आजच्या या प्रगत जगातही १३८ दशलक्ष मुले बालमजुरीत आहेत, ज्यात जवळपास ५४ दशलक्ष मुले धोकादायक कामांमध्ये गुंतलेली आहेत.
जगभरातील एकूण बालकामगारांपैकी सर्वाधिक ६१% मुले शेती आणि शेतीशी संबंधित (कृषी क्षेत्रात) कामात आहेत. यानंतर २७% मुले सेवा क्षेत्रात (हॉटेल, दुकाने, घरकाम) आणि १३% मुले औद्योगिक क्षेत्रात (खाणी, कारखाने, बांधकाम) काम करतात.

आफ्रिका खंडात बालमजुरीचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्याखालोखाल आशिया-पॅसिफिक आणि लॅटिन अमेरिका या देशांचा क्रमांक लागतो.

भारतात बालकामगारांची (बालमजुरी) समस्या अत्यंत गंभीर आणि गुंतागुंतीची आहे.अधिकृत आकडेवारीनुसार, भारतात ५ ते १४ वर्षे वयोगटातील सुमारे १ कोटींहून अधिक (१०.१ दशलक्ष) बालकामगार आहेत. तर १५ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मजुरांची संख्या विचारात घेतली, तर हा आकडा २ कोटी ३० लाखांच्या वर जातो. दक्षिण आशियाई देशांमध्ये बालकामगारांची सर्वाधिक संख्या दुर्दैवाने भारतातच आहे.

भारतातील ही समस्या नेमकी कुठे, कशी आणि कोणत्या राज्यांत जास्त आहे, याचा सविस्तर ताळेबंद खालीलप्रमाणे आहे:
भारतातील एकूण बालकामगारांपैकी ५०% पेक्षा जास्त बालमजूर
५ राज्यांमध्ये एकवटलेले आहेत.
१)उत्तर प्रदेश : देशातील सर्वाधिक म्हणजेच जवळजवळ २०% बालकामगार एकट्या उत्तर प्रदेशात काम करतात.
२)राजस्थान: वीटभट्ट्या आणि शेतीकामात मुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
३)मध्य प्रदेश: दुर्गम आणि आदिवासी भागातील मुले बालमजुरीत ओढली जातात. ४)बिहार: गरिबीमुळे या राज्यात बालमजुरीचे प्रमाण खूप मोठे आहे.
५)महाराष्ट्र: प्रगत राज्य असूनही महाराष्ट्रात मुंबई, ठाणे आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमधील हॉटेल्स, गॅरेज आणि घरांमध्ये बालकामगारांचे प्रमाण लक्षणीय आहे.

भारतात मुले नेमकी कुठे आणि काय काम करतात याचा शोध घेतांना संघटित क्षेत्रापेक्षा असंघटित आणि अनधिकृत क्षेत्रांमध्ये बालकामगार सर्वाधिक आढळतात.

भारतात मुले नेमकी कुठे आणि काय काम करतात याचा शोध घेतांना भारतात बालकामगार संघटित क्षेत्रापेक्षा असंघटित आणि अनधिकृत क्षेत्रांमध्ये सर्वाधिक आढळतात.
भारतातील बालकामगार क्षेत्रनिहाय विभागणी :
कृषी व शेती क्षेत्र (ग्रामीण भाग) ─── सर्वाधिक (सुमारे ६०%+)
सेवा क्षेत्र (शहरी भाग) ────────── हॉटेल्स, ढाबे, घरकाम
औद्योगिक व धोकादायक क्षेत्र ────── फटाके, वीटभट्ट्या, खाणी.
शेती आणि पशुपालन (ग्रामीण भाग): ग्रामीण भागात मुले मुख्यतः पालकांसोबत शेतात, कापूस वेचणी, चहाच्या बागा आणि जनावरे चरण्याच्या कामात गुंतलेली असतात.
धोकादायक कारखाने: तामिळनाडूतील शिवकाशी (फटाके उद्योग), उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद (काच आणि बांगड्यांचे कारखाने), आणि मिर्झापूर (गालिचा उद्योग) ही बालमजुरीची प्रमुख केंद्रे आहेत.शहरी सेवा क्षेत्र: शहरांमध्ये लहान मुले प्रामुख्याने हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या, गॅरेज, भंगार गोळा करणे आणि बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करतात.
घरगुती नोकर (Domestic Help): अनेक श्रीमंत आणि मध्यमवर्गीय घरांमध्ये स्वयंपाक, साफसफाई किंवा लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी १४ वर्षांखालील मुलींना ‘लिव्ह-इन नोकर’ म्हणून ठेवले जाते, जिथे त्यांचे शारीरिक व मानसिक शोषण होण्याची शक्यता जास्त असते.

बालमजुरीची प्रमुख कारणे म्हणजे काम करणाऱ्या मुलांपैकी बहुतांश मुले एकतर कधी शाळेत गेलेली नसतात किंवा प्राथमिक शिक्षणानंतर शाळा सोडतात आणि जातीव्यवस्था आणि गरिबी: भारतातील बालकामगारांमध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि अल्पसंख्याक समाजातील मुलांचे प्रमाण सर्वात जास्त आहे, कारण हे समाज आर्थिकदृष्ट्या कमालीचे मागासलेले आहेत. परंतु आणखी एक धक्कादायक बाब समोर अली ती म्हणजे, आधुनिक गुलामगिरी आणि तस्करी (Trafficking): बिहार, झारखंड आणि ओडिशामधील गरीब मुलांची तस्करी करून त्यांना मुंबई, दिल्ली किंवा सुरतसारख्या मोठ्या शहरांमधील कारखान्यांमध्ये डांबून ठेवले जाते. त्यांना अत्यंत कमी मोबदल्यात किंवा फक्त खाण्यावर दिवसरात्र काम करावे लागते.
या विरोधात सरकार काही करते का याचे उत्तर होय असे आहे. ‘ऑपरेशन मुस्कान’ (Operation Muskaan) आणि ‘ऑपरेशन स्माइल’ ही केंद्रीय गृह मंत्रालयाची (MHA) अत्यंत यशस्वी देशव्यापी मोहीम आहे, जी महाराष्ट्रातही राज्य पोलिसांद्वारे अतिशय प्रभावीपणे राबवली जाते. या मोहिमेचा मुख्य उद्देश हरवलेल्या मुलांचा शोध घेणे, मानवी तस्करीतून (Human Trafficking) मुलांची सुटका करणे आणि बालमजुरी तसेच भिकेच्या विळख्यातून बालकांना मुक्त करून त्यांना त्यांच्या पालकांकडे सुखरूप पोहोचवणे हा आहे.

महाराष्ट्रातील या विशिष्ट मोहिमेबद्दल माहिती पुढीलप्रमाणे :
यासाठी विशेष पोलीस पथक (Special Drives) तैनात असून प्रत्येक पोलीस ठाण्यात आणि जिल्हा स्तरावर ‘विशेष बाल संरक्षण पथक’ (Special Juvenile Police Unit – SJPU) तयार केले जाते. हे पथक रेल्वे स्थानके, बस स्थानके, धार्मिक स्थळे, धाबे आणि सिग्नलवर नजर ठेवते.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सापडलेल्या मुलांची माहिती आणि फोटो केंद्र सरकारच्या TrackChild पोर्टलवर आणि DarpanApp वर अपलोड केले जातात. याद्वारे चेहेरा ओळखणारे तंत्रज्ञान (Face-Recognition Software) वापरून देशभरातील हरवलेल्या मुलांच्या डेटाबेसशी जुळणी केली जाते.
वाचकहो, महाराष्ट्रात या मोहिमेअंतर्गत दरवर्षी हजारो मुलांची बालमजुरी आणि मानवी तस्करीच्या विळख्यातून यशस्वी सुटका करण्यात आली आहे (उदा. मुंबई पोलिसांनी एकाच वर्षात ५,००० पेक्षा जास्त अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना पुनर्वसित केले होते). पण नागरीक म्हणून प्रत्येकाचे याबाबतीत कर्तव्य आहे.
स्वतः कधीही लहान मुलांना मजदूर म्हणून कामावर ठेवू नका.

नागरिक म्हणून तुम्ही कशी मदत करू शकता ?
जर तुम्हाला तुमच्या परिसरात कुठेही बालमजुरी किंवा मुलांचे शोषण होत असल्याचे दिसले, तर घाबरण्याची गरज नाही. तुम्ही खालील मार्गांनी कायदेशीर मदत करू शकता :
१) १०९८ (Childline) : या २४ तास मोफत उपलब्ध असलेल्या राष्ट्रीय हेल्पलाइनवर फोन करा. तुमचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाते.
२) स्थानिक पोलीस ठाणे: तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यातील ‘बाल कल्याण पोलीस अधिकारी’ (CWPO) यांच्याकडे तक्रार नोंदवा.
याचा काही उपयोग आहे का, असा प्रश्न तुमच्या मनांत आलाच असेल तर त्याचे उत्तर होय असेच आहे.

बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) सुधारणा कायदा, २०१६ नुसार कडक शिक्षेची तरतूद आहे :
१४ वर्षांखालील मुलाला कामावर ठेवल्यास, ६ महिने ते २ वर्षे तुरुंगवास आणि ₹२०,००० ते ₹५०,००० दंड (किंवा दोन्ही) दुसऱ्यांदा हाच गुन्हा केल्यास, १ वर्ष ते ३ वर्षे अनिवार्य तुरुंगवास.

आज या जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त, बालमजुरीला लाल कार्ड दाखवा आणि माराकेशमधील वचनबद्धतेचे जगभरातील मुले, कुटुंबे आणि समुदायांसाठी खऱ्या बदलात रूपांतर करण्यास मदत करा हे कळकळीचे आवाहन साऱ्या जगभरातील लोकांना आहे.हा लेख वाचून नुसतेच न हळहळता किंवा आजचा एक दिवस बालमजुरी विरोधात नुसता साजरा न करता एक जागृत नागरिकाचे कर्तव्य पार पाडणार ना तुम्ही ?

नीला बर्वे

— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 98694 84800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments